

पुढारी ऑनलाईन डेस्क : संजू सॅमसन हा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सलग दोन शतके झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने किंग्समीडच्या ऐतिहासिक मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अवघ्या 47 चेंडूत कारकिर्दीतील दुसरे शतक झळकावले. बाद होण्यापूर्वी संजूने 50 चेंडूत 107 धावांची स्फोटक खेळी खेळली, ज्यात सात चौकार आणि 10 षटकारांचा समावेश राहिला. आजच्या डावात त्याने आपल्या टी-20 कारकिर्दीतील 7,000 धावाही पूर्ण केल्या.
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी बांगलादेशी संघ भारतात आला होता. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात त्याने 40 चेंडूत शतक झळकावले. 47 चेंडूत 111 धावांची खेळी करत कारकिर्दीतील पहिले टी-20 शतक झळकावले. त्याने आता सलग दुसऱ्या सामन्यातही शतकी खेळी साकारली आहे.
आता तो या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतकांच्या बाबतीत केएल राहुलसोबत संयुक्तपणे तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. कर्णधार रोहित शर्मा पाच शतकांसह अव्वल, तर सुर्यकुमार यादव चार शतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
डावातील तिसरे षटक टाकण्यासाठी आलेल्या केशव महाराजच्या पहिल्या चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार मारून सॅमसनने चांगल्या लयीचे संकेत दिले. स्फोटक शैलीत फलंदाजी करताना त्याने अवघ्या 27 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यानंतरही त्याने विरोधी गोलंदाजांवर आक्रमण सुरूच ठेवले आणि आपल्या डावाचे शतकात रूपांतर केले. दरम्यान, त्याने कर्णधार सूर्यकुमार यादवसोबत 66 धावांची भागीदारीही केली.
सॅमसनने 2015 मध्ये झिम्बाब्वे क्रिकेट संघाविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. या फॉरमॅटमध्ये तो भारताकडून सातत्यपूर्ण खेळू शकला नाही. आतापर्यंत त्याने 34 सामन्यांच्या 30 डावांमध्ये 650 हून अधिक धावा केल्या आहेत. दरम्यान, 2 शतकांव्यतिरिक्त त्याने 2 अर्धशतके केली आहेत. त्याच्या टी20 आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये तो आतापर्यंत 4 वेळा शून्यावर आऊट झाला आहे.