IND vs PAK : वर्षभरात १० वेळा भिडणार भारत-पाक! वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा उडवणार धुरळा

India Pakistan Cricket Rivalry : पाकिस्तानची झोप उडणार! टीम इंडियाचे युवा शिलेदार उतरणार मैदानात
IND vs PAK : वर्षभरात १० वेळा भिडणार भारत-पाक! वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा उडवणार धुरळा
Published on: 
Updated on: 

जागतिक क्रिकेटमधील पारंपरिक आणि सर्वाधिक रोमांचक मानल्या जाणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान या हायव्होल्टेज लढतींसंदर्भात एक अत्यंत मोठी माहिती समोर येत आहे. येत्या वर्षभरात हे दोन्ही कट्टर प्रतिस्पर्धी तब्बल १० एकदिवसीय (वनडे) आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आमनेसामने येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या संभाव्य ब्लॉकबस्टर लढतींमध्ये भारताचे युवा आणि स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशी तसेच अभिषेक शर्मा आपल्या आक्रमक फटकेबाजीने मैदानावर वर्चस्व गाजवण्यासाठी सज्ज झाले असून, चालू नोव्हेंबर महिन्यातच या खेळाडूंना पाकिस्तानच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील या थराराची सुरुवात सर्वात आधी अंडर-१९ आशिया चषक स्पर्धेपासून होणार आहे. या स्पर्धेतील उभय संघांमधील पहिला साखळी सामना ८ नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. दोन्ही युवा संघांनी आपली विजयी घोडदौड कायम राखत जर अंतिम फेरीपर्यंत मजल मारली, तर या एकाच स्पर्धेत उभय देशांत दोनदा चुरशीची लढत पाहायला मिळू शकते.

त्याचप्रमाणे नुकतीच 'रायझिंग स्टार आशिया कप' या स्पर्धेसाठीही भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा यांच्यासारख्या युवा शिलेदारांचा समावेश करण्यात आला आहे. या स्पर्धेत २२ नोव्हेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना रंगणार आहे. इथेही दोन्ही संघांनी २९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अंतिम फेरीत धडक मारल्यास या स्पर्धेतही दोन लढती निश्चित मानल्या जात आहेत. परिणामी, या सुरुवातीच्या दोन स्पर्धांच्या माध्यमातूनच चालू महिन्यात दोन्ही संघ तब्बल चार वेळा एकमेकांशी भिडण्याची संधी निर्माण होऊ शकते.

त्यानंतर पुढील वर्षी जून आणि जुलैदरम्यान आशिया चषक स्पर्धेचा थरार रंगणार आहे. पुढील वर्ष हे एकदिवसीय विश्वचषकाचे असल्याने ही आशिया चषक स्पर्धाही ५० षटकांच्या म्हणजेच वनडे फॉरमॅटमध्येच आयोजित केली जाणार आहे. अद्याप या स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक व गटांची घोषणा झालेली नसली तरी पारंपरिक पद्धतीनुसार भारत आणि पाकिस्तान यांना एकाच गटात स्थान मिळणे जवळपास निश्चित मानले जात आहे. आशिया चषकाच्या सध्याच्या स्वरूपानुसार उभय संघ प्रथम साखळी फेरीत, त्यानंतर सुपर-४ टप्प्यात आणि अखेर दोन्ही संघांनी दमदार खेळ केल्यास थेट अंतिम फेरीत, अशा एकूण तीन वेळेस आमनेसामने येऊ शकतात.

दरम्यान, २०२७ चा आयसीसी एकदिवसीय विश्वचषक हा दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया यांच्या संयुक्त यजमानपदाखाली पार पडणार आहे. या महाकुंभाच्या नव्या आणि चुरशीच्या रचनेनुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात प्राथमिक साखळी फेरी, नवा 'सुपर-७' टप्पा आणि त्यानंतर बाद फेरी किंवा अंतिम सामना, अशी एकूण तीन वेळा ऐतिहासिक महाटक्कर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा प्रकारे विविध स्पर्धांमधील गणिते पाहता आगामी वर्षभरात चाहत्यांना भारत-पाकदरम्यान तब्बल १० एकदिवसीय सामन्यांची पर्वणी अनुभवायला मिळू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.