

पुढारी ऑनलाईन डेस्क : Tim Southee Sixes Record : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्याच सामन्यात अनेक विक्रम झाले आहेत. भारतात आल्यानंतर न्यूझीलंडचा संघ एवढा चांगला खेळ करेल, अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. किवींनी प्रथम यजमान टीम इंडियाचा पहिला डाव अवघ्या 46 धावांवर गारद केला. त्यानंतर त्यांनी 402 धावा करून 356 धावांची आघाडी घेतली. यामुळे टीम इंडिया बॅकफूटवर गेली. दरम्यान, टीम साऊदीने भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवाग याचा षटकांचा विक्रम मोडीत काढला आहे.
टीम साऊदी हा वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जातो. असे असले तरी त्याचे कसोटी क्रिकेटमधील फलंदाजीतील प्रदर्शन लक्षवेधी आहे. त्याने कसोटी करिअरमध्ये भरपूर षटकार मारले आहेत. टेस्टमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या टॉप 10 बॅट्समनमध्ये साऊदीचा समावेश आहे. दरम्यान, आता सौदीने भारताचा माजी स्फोटक फलंदाज सेहवागचाही विक्रम मोडीत काढला आहे.
इंग्लंडचा बेन स्टोक्स सध्या कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज आहे. त्याने 106 कसोटी सामने खेळले असून 131 षटकार मारले आहेत. यानंतर दुस-या स्थानी न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅक्युलमचा आहे. त्याने 101 कसोटी सामन्यांमध्ये 107 षटकार मारले आहेत. ॲडम गिलख्रिस्टने 96 कसोटी सामन्यांमध्ये 100 षटकार मारले आहेत. या तीन फलंदाजांशिवाय कोणीही 100 हून अधिक षटकार मारलेले नाहीत.
टिम साऊदीने आतापर्यंत 103 कसोटी सामने खेळले आहेत. यासह त्याने 92 षटकारांचा टप्पा गाठला आहे. आज त्याने बेंगळुरू कसोटीत टीम इंडियाविरुद्ध तीन षटकार ठोकले. यासह तो सेहवागच्या पुढे गेला आहे. सेहवागने त्याच्या कसोटी कारकिर्दीत 104 सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर 91 षटकार आहेत.
टीम साऊदी सध्या 35 वर्षांच्या आसपास आहे. अशा स्थितीत त्याचा फिटनेस चांगला राहिला तर तो नक्कीच पुढील काही वर्षे कसोटी क्रिकेट खेळू शकेल. अशा प्रकारे त्याला येणा-या काळात षटकांचे शतक पूर्ण करण्याची संधी आहे. असे केल्यास तो दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस आणि वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल यांना मागे टाकेल. कॅलिसच्या नावावर 97 तर गेलच्या नावावर 98 षटकार आहेत.