IND vs NZ : चॅम्पियन्स ट्रॉफी ते टी-२० वर्ल्ड कप व्हाया WTC..! भारत-न्यूझीलंड 'Final'मध्ये भिडणारे पहिलेच प्रतिस्पर्धी

T20 World Cup Final IND vs NZ : क्रिकेटच्या इतिहासात एका सुवर्ण अध्यायाची नोंद
IND vs NZ T20 World Cup 2026 Final
Published on
Updated on

भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील द्वंद्व पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर पाहायला मिळणार आहे. टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम फेरीत जेव्हा हे दोन दिग्गज संघ एकमेकांशी भिडतील, तेव्हा क्रिकेटच्या इतिहासात एका सुवर्ण अध्यायाची नोंद होईल.

भारत आणि न्यूझीलंडचे संघ पुन्हा एका आयसीसी (ICC) स्पर्धेच्या अंतिम फेरीत जेतेपदासाठी झुंजणार आहेत. ८ मार्च रोजी जेव्हा हे दोन्ही संघ मैदानात उतरतील, तेव्हा असा विक्रम प्रस्थापित होईल जो यापूर्वी आयसीसीच्या इतिहासात कधीही घडलेला नाही. जगातील हे दोन सर्वोत्तम संघ जेव्हा एकमेकांसमोर उभे ठाकतील, तेव्हा क्रिकेटचा थरार शिगेला पोहोचणार हे निश्चित आहे. आयसीसी स्पर्धेत प्रथमच नेमके काय घडणार आहे, यावर एक नजर टाकूया.

तिन्ही फॉरमॅटमध्ये भिडणारे जगातील पहिले दोन संघ

टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात खेळण्यासाठी मैदानात उतरताच भारत आणि न्यूझीलंड हे आयसीसीच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, एकदिवसीय आणि टी-२०) अंतिम सामना खेळणारे जगातील पहिले दोन संघ ठरतील.

पहिल्या ‘अंतिम’ लढतीची सुरुवात सन २००० मध्ये..

या दोन संघांमधील ‘अंतिम’ लढतीची सुरुवात सन २००० मध्ये सुरू झाली. तत्कालीन 'आयसीसी नॉक आऊट' (आजची चॅम्पियंस ट्रॉफी) स्पर्धेच्या अंतिम फेरीत किवींनी भारतीय वाघांची वाट रोखली होती. शेवटच्या दोन चेंडूंचा श्वास रोखणारा थरार आणि ४ विकेट्स राखून न्यूझीलंडने मारलेली ती बाजी भारतीय चाहत्यांच्या आजही काळजात सलतेय. तिथूनच या दोन देशांमधील क्रिकेटच्या 'कोल्ड वॉर'ला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

कसोटीच्या रणांगणावर किवींचे वर्चस्व

२०२१ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद (WTC) स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुन्हा एकदा हे दोन संघ एकमेकांसमोर उभे ठाकले. पावसामुळे लांबलेल्या त्या झुंजीत किवींनी आपल्या अनुभवाच्या जोरावर भारताचे स्वप्न धुळीस मिळवले आणि पहिल्या-वहिल्या कसोटी सम्राटाचा मुकुट परिधान केला.

..आणि भारताचा पलटवार

भारताने दोन अंतिम फेरीतील आपल्या पराभवाच्या ठसठसणाऱ्या जखमांवर अखेर २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीत हिशोब चुकता केला. त्या महाअंतिम युद्धात, भारतीय शिलेदारांच्या जिद्दीपुढे न्यूझीलंडच्या किल्ल्याचे बुरुज कोसळले आणि टीम इंडियाने दिमाखात अजिंक्यपदावर आपले नाव कोरले.

चेंडू आणि बॅटची धुमश्चक्री

थोडक्यात सांगायचे तर, कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० आंतरराष्ट्रीय अशा तिन्ही फॉरमॅटच्या अंतिम सामन्यात परस्परांविरुद्ध खेळणारे हे पहिलेच प्रतिस्पर्धी संघ ठरणार आहेत. असा पराक्रम यापूर्वी जगातील इतर कोणत्याही दोन संघांना करता आलेला नाही. आता या महामुकाबल्यात चेंडू आणि बॅटच्या या धुमश्चक्रीत कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण जगाचे डोळे लागले आहेत. दोन्ही संघांनी आतापर्यंत उत्कृष्ट कामगिरी करत अंतिम फेरी गाठली आहे. ८ मार्चच्या रात्री आपला सर्वोत्तम खेळ करेल, तोच विश्वविजेतेपदाचा चषक उंचावेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news