पुढारी ऑनलाईन डेस्क : India vs New Zealand Test Cricket : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. बंगळुरू कसोटीच्या पहिल्या डावात भारताला 46 धावांत गुंडाळल्यानंतर न्यूझीलंडने चांगली फलंदाजी केली आणि पहिल्या डावात 3 बाद 180 धावा करून 134 धावांची आघाडी घेतली. रचिन रवींद्र (22*) आणि डॅरिल मिशेल (14*) नाबाद परतले आहेत.
पावसामुळे पहिल्या दिवशी टॉसही झाला नाही तसेच एकही चेंडू खेळता आला नाही. सामन्याच्या दुस-या दिवशी भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय चुकीचा ठरला आणि संपूर्ण संघ 31.2 षटकांत 46 धावांत पॅव्हेलियनमध्ये परतला. भारतीय संघाकडून ऋषभ पंतने सर्वाधिक 20 धावा केल्या. भारताचे 5 फलंदाज खाते न उघडताच बाद झाले. मॅट हेन्रीने सर्वाधिक 5 बळी घेतले. प्रत्युत्तरात डेव्हॉन कॉनवेच्या (91) शानदार खेळीच्या जोरावर न्यूझीलंडचा संघ आता मजबूत स्थितीत आहे.
भारतीय संघ पहिल्यांदाच मायदेशात 50 पेक्षा कमी धावसंख्येवर ऑलआऊट झाला आहे. त्यामुळे 46 ही टीम इंडियाची मायदेशातील मैदानावरची निच्चांकी धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी भारतीय संघाची घरच्या मैदानावर सर्वात कमी धावसंख्या 75 होती. 1987 मध्ये भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध 75 धावांत ऑलआऊट झाला होता. तो सामना दिल्लीत खेळला गेला होता. याशिवाय 2008 मध्ये अहमदाबाद कसोटीत दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाचा 76 धावांत ऑलआऊट केला होता.
कसोटी क्रिकेटच्या इतिहासात भारतीय संघ 50 पेक्षा कमी धावसंख्येवर ऑलआऊट होण्याची ही तिसरी वेळ आहे. कसोटीच्या इतिहासात भारताची ही तिसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. 2020 मध्ये ॲडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध भारतीय संघ 36 धावांत ऑलआऊट झाला होता. तर 1974 मध्ये इंग्लंडने लॉर्ड्स कसॉटीत टीम इंडियाचा संपूर्ण 42 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवला होता.