

पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंडने मुंबई कसोटी अवघ्या 25 धावांनी जिंकून टीम इंडियाचा तीन कसोटी सामन्यांत ऐतिहासिक व्हाईटवॉश केला. विजयासाठी 147 धावांची गरज असताना भारताचा संघ 121 धावांत गारद झाला. एजाज पटेलने दुस-या डावात सहा विकेट घेत टीम इंडियाचे कंबरडे मोडले. त्याला ग्लेन फिलिप्सची सुरेख साथ मिळाली. त्याने तीन बळी मिळवले. तर मॅट हेन्रीला एका फलंदाजाला माघारी धाडण्यात यश आले.
मायदेशात झालेल्या दोन किंवा अधिक सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला दुसऱ्यांदा क्लीन स्वीप मिळाला आहे. यापूर्वी फेब्रुवारी 2000 मध्ये दक्षिण आफ्रिकेने दोन सामन्यांच्या मालिकेत भारताचा 2-0 असा पराभव केला होता. त्याचबरोबर घरच्या मैदानावर तीन किंवा त्याहून अधिक सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताला प्रथमच क्लीन स्वीप मिळाला आहे.
न्यूझीलंड संघाने इतिहास रचला. त्यांनी भारतात पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकली इतकेच नाही तर टीम इंडियाला क्लीन स्वीपही दिला. न्यूझीलंडने 12 वर्षांनंतर भारताला घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावण्यास भाग पाडले. यास टीम इंडियाची घरच्या मैदानावर सलग 18 मालिका विजयांची मालिकाही खंडित केली. विशेष बाब म्हणजे न्यूझीलंडने ही कसोटी मालिका केन विल्यमसनशिवाय खेळली आहे. तसेच, टॉम लॅथम प्रथमच संघाचे नेतृत्व करत होता.
डॅरिल मिशेलच्या (82) खेळीमुळे न्यूझीलंडने पहिल्या डावात 235 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने शुभमन गिलच्या (90) खेळीच्या जोरावर 263 धावा करत आघाडी घेतली. पहिल्या डावाच्या जोरावर पिछाडीवर पडलेला किवी संघ दुसऱ्या डावात 174 धावांत गडगडला. प्रत्युत्तरात लहान लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने 29 धावा होईपर्यंत 5 विकेट गमावल्या होत्या. यानंतर ऋषभ पंतने जडेजाच्या स्थाने 42 धावांची भागिदारी केली. पंतचे अर्धशतक झाले. पण तो बाद झाल्यानंतर संघाचा पराभव झाला.
आपल्या पहिल्या डावात गिलने 146 चेंडूंचा सामना करत 90 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून 7 चौकार आणि 1 षटकार आला. दरम्यान, त्याने पंतसोबत डावाची धुरा सांभाळली आणि दोघांमध्ये 114 चेंडूत 96 धावांची भागीदारी झाली. न्यूझीलंडविरुद्धची ही त्याची दुसरी अर्धशतकी खेळी होती. तो दुसऱ्या डावात केवळ 1 धावा काढून बाद झाला.
यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने पहिल्या डावात 59 चेंडूत 60 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 8 चौकार आणि 2 षटकार मारले. यानंतर त्याने दुसऱ्या डावातही अर्धशतक झळकावले. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीच्या दोन्ही डावांत अर्धशतके झळकावणारा तो तिसरा भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे. त्याच्या आधी महेंद्रसिंग धोनी (वेलिंग्टन, 2009) आणि वृद्धिमान साहा (कोलकाता, 2016) यांनी ही कामगिरी केली आहे.
एजाज पटेलने पहिल्या डावात 5 तर दुस-या डावात 6 बळी घेतले. तो आता भारतातील कोणत्याही मैदानावर सर्वाधिक विकेट घेणारा विदेशी गोलंदाज ठरला आहे. त्याने या बाबतीत इंग्लंडच्या इयान बॉथम यांला मागे टाकले आहे. बोथम यांनी वानखेडेमध्येच 22 विकेट घेतल्या होत्या. विशेष म्हणजे एजाजने वानखेडे स्टेडियमवर एका डावात 10 विकेट्स घेण्याचा पराक्रमही केला आहे.
जडेजाने पहिल्या डावात 65 धावा देत 5 तर दुसऱ्या डावात 55 धावा देत 5 बळी घेतले. आपल्या अविश्वसनीय कसोटी कारकिर्दीत प्रथमच त्याने दोन्ही डावात 5 विकेट्स घेतल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या दोन्ही डावांत 5 बळी घेणारा तो भारताचा दुसरा गोलंदाज ठरला आहे. अश्विनने हा पराक्रम दोनदा केला आहे. जडेजाने या कसोटीत 120 धावा देत एकूण 10 बळी मिळवले.
जडेजाने आपल्या कसोटी कारकिर्दीत तिसऱ्यांदा 10 विकेट्स घेतल्या आहेत. तो आता भारताकडून सर्वाधिक 10 बळी घेणारा चौथा गोलंदाज ठरला आहे. या यादीत त्याच्या पुढे अनिल कुंबळे (8), अश्विन (8) आणि हरभजन सिंग (5) आहेत. जडेजाने न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटीत पहिल्यांदाच 10 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने या संघाविरुद्ध 11 कसोटी सामन्यांच्या 22 डावांत 27.48 च्या सरासरीने एकूण 41 बळी घेतले आहेत.
मुंबईत विराट कोहलीने पहिल्या डावात 4 धावा आणि दुसऱ्या डावात 1 धावा केली. प्रथमच घरच्या मैदानावर खेळताना त्याला दोन्ही डावांत दुहेरी आकडा गाठता आला नाही. चालू मालिकेत त्याने 6 डावात केवळ 93 धावा केल्या.