

Shubman Gill india vs new zealand 3rd odi
इंदूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वन-डे मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. त्यामुळे आता इंदूरमध्ये होणारा तिसरा सामना निर्णायक ठरणार आहे. मात्र, या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी भारतीय संघ मैदानातील कामगिरीसोबतच मैदानाबाहेरील आरोग्याबाबत कमालीची दक्षता घेत असल्याचे दिसून येत आहे.
देशातील सर्वात स्वच्छ शहर अशी ओळख असलेल्या इंदूरमध्ये सध्या दूषित पाण्यामुळे आरोग्य आणीबाणीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने चक्क ३ लाख रुपये किमतीचे विशेष वॉटर प्युरिफिकेशन मशीन (पाणी शुद्धीकरण यंत्र) सोबत आणले आहे. हे यंत्र 'RO' प्रक्रिया केलेले पाणी आणि बाटलीबंद पाणी देखील पुन्हा शुद्ध करण्यास सक्षम आहे. गिलने हे यंत्र आपल्या हॉटेलमधील वैयक्तिक खोलीत बसवून घेतल्याची माहिती हॉटेलमधील सूत्रांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. दरम्यान, या संदर्भात भारतीय संघाच्या मीडिया मॅनेजरने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. ही खबरदारी शहरातील पाण्याच्या संकटामुळे घेतली आहे की हा खेळाडूंच्या वैयक्तिक सुरक्षेचा भाग आहे, यावर त्यांनी भाष्य केले नाही.
भारतीय क्रिकेटपटूंची आरोग्याबाबतची ही जागरूकता नवीन नाही. टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली हा नेहमी फ्रान्सवरून आयात केलेले 'इव्हियन' नॅचरल स्प्रिंग वॉटरच पितो. आरोग्याबाबत कोणतेही तडजोड करत नसल्याचे त्याने यापूर्वी अनेकवेळा स्पष्ट केले आहे.
इंदूरच्या भगीरथपुरा भागात दूषित पाण्यामुळे आतापर्यंत २३ जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारने उच्च न्यायालयात दुषित पाण्यामुळे १५ नागरिकांचा मृत्यू झाल्याचे म्हटलं आहे. मात्र २१ कुटुंबांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. अद्यापही काही रुग्ण अतिदक्षता विभागात (ICU) उपचार घेत असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे.