

अल अमिरात (ओमान) : भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाने आशिया चषक स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात नेपाळचा १० गडी राखून पराभव करत आपल्या मोहिमेची अगदी दिमाखात सुरुवात केली. भारताच्या या विजयात आर्यवीर सेहवाग आणि कर्णधार लक्ष्य रायचंदानी यांच्या अर्धशतकांचा प्रामुख्याने वाटा राहिला.
प्रारंभी, इशान सूद (३/१८) आणि अर्जुन राजपूत (३/८) यांच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर भारताने नेपाळचा डाव १२८ धावांत संपुष्टात आणला. प्रत्युत्तरात आर्यवीर सेहवाग (नाबाद ७०) आणि रायचंदानी (नाबाद ५३) यांच्या अर्धशतकांच्या बळावर हे लक्ष्य सहज गाठले. भारताने १९.१ षटकांत बिनबाद १२९ धावांसह विजयावर शिक्कामोर्तब केले.
वीरेंद्र सेहवागचा सुपुत्र असलेल्या आर्यवीर सेहवागने ५२ चेंडूंत ७ चौकार, ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ७० धावांची तुफानी खेळी केली. दुसरीकडे, रायचंदानीने ६३ चेंडूंत ७ चौकारांसह नाबाद ५३ धावांचे योगदान दिले.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रण मिळालेला नेपाळ संघाला एका टप्प्यावर ५१ धावांतच ४ गडी गमवावे लागले होते. दर्श सोनारने ९३ चेंडूंत १ चौकार, १ षटकारासह ४३, तर आशिष लुथारने २९ धावांची खेळी केली. मात्र, संपूर्ण संघ ४२.३ षटकांत १२८ धावांत गारद झाला.
नेपाळ युवा संघ : ४२.३ षटकांत सर्वबाद १२८ (दर्श सोनार ४३; इशान सूद ३/१८, अर्जुन रजपूत ३/८). भारतीय युवा संघ : १९.१ षटकांत बिनबाद १२९ (लक्ष्य रायचंदानी नाबाद ५३, आर्यवीर सेहवाग नाबाद ७०).
भारतीय युवा संघ येथील लढतीत विजयश्रीवर शिक्कामोर्तब केल्यानंतर आता रविवारी (दि. ८) पुढील सामन्यात पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार आहे. ही लढत अल अमिरात याच ठिकाणी भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी १०.३० वाजता खेळवली जाईल.