T20WC INDvsENG Live: 10 वर्षांनंतर भारत फायनलमध्ये

'परतफेड'साठी टीम इंडिया सज्‍ज! क्रिकेट जगताचे लक्ष सेमी फायनलकडे
T20WC INDvsENG Live
दुसऱ्या इनिंगमध्ये भारताचे फिरकीपटू कहर करत आहेत.ICC 'X' Handle

Ind vs Eng T20 WC Semi Final Live Score :

पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत गतविजेत्या इंग्लंडचा 68 धावांनी पराभव केला. तसेच तिसऱ्यांदा आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता शनिवारी (दि.29) संघाचा सामना जेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. 2007 मध्ये भारताने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. आता विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्याची संधी भारताला असेल.

इंग्लंडचा संघ :

फिल सॉल्ट, जोस बटलर (कर्णधार आणि यष्टिरक्षक), जॉनी बेअरस्टो, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस जॉर्डन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, रीस टोपली.

भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंग.

बटलरने नाणेफेक जिंकले

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार बटलरने प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्याचवेळी समालोचक रवी शास्त्री यांनी भारतीय कर्णधार रोहितला विचारले की, नाणेफेक जिंकल्यानंतर त्याने काय निर्णय घेतला असता? यावर रोहित म्हणाला की नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता. भारतीय कर्णधार रोहितनेही प्लेइंग-11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही.

भारतीय डावाला सुरुवात

भारतीय डावाला सुरुवात झाली भारतीय डाव सुरू झाला आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली फलंदाजीसाठी मैदानात उतरले आहेत. रीस टोपलीने इंग्लंडच्या गोलंदाजीची कमान सांभाळली. त्याने पहिल्या षटकात 6 धावा दिल्या ज्यात एका लेग बायचा समावेश होता. रोहितने दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला आणि पुढच्या चेंडूवर एकच धाव घेतली.

रोहित शर्माचा चौकार

रोहित शर्माच्या बॅटमधून आणखी चार धावा झाल्या आहेत. दुसरे षटक टाकायला आलेल्या जोफ्रा आर्चरविरुद्ध त्याने चौकार मारला. कोहलीने एक धाव घेत आपले खाते उघडले.

भारताला पहिला धक्का

भारताला पहिला धक्का तिसऱ्या षटकात 19 धावांवर बसला. रीस टोपलीने विराट कोहलीला क्लीन बोल्ड केले. या संपूर्ण स्पर्धेत ओपनिंग करताना विराटचे प्रदर्शन खूपच खराब राहिले आहे. विराटने नऊ चेंडूत नऊ धावा केल्या.

पाच षटकांचा खेळ संपला

पाच षटकांचा खेळ संपला. भारताने एक विकेट गमावून 40 धावा केल्या. रोहित शर्मा 17 चेंडूत 25 धावा तर ऋषभ पंत 4 चेंडूत 4 धावा केल्या.

'हिटमॅन' रोहितची झंझावाती फलंदाजी

टोपलीने पाचव्या षटकात 11 धावा दिल्या. 'हिटमॅन' रोहितने त्याची झंझावाती शैली दाखवली. त्याने दुसऱ्या चेंडूवर डीप स्क्वेअर लेग आणि चौथ्या चेंडूवर कव्हरकडे चौकार मारला.

भारताला दुसरा धक्का

सहाव्या षटकात 40 धावांवर भारताला दुसरा धक्का बसला. सॅम करनने ऋषभ पंतला बेअरस्टोकरवी झेलबाद केले. त्याला चार धावा करता आल्या. पंत बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव मैदानात उतरला.

पावसामुळे सामना थांबला

पावसामुळे सामना थांबवण्यात आला. खेळ थांबला तोपर्यंत टीम इंडियाने 8 षटकांत दोन गडी गमावून 65 धावा केल्या. रोहित शर्माने 26 चेंडूत 37 धावा आणि सूर्यकुमार यादव सात चेंडूत 13 धावा केल्या.

थोड्याच वेळात सामना सुरू

रात्री 11.10 वाजता सामना पुन्हा सुरू होईल. पावसामुळे सुमारे तासभर खेळ थांबला होता. पावसामुळे सामना थांबला तोपर्यंत भारताने आठ षटकांत दोन गडी गमावून ६५ धावा केल्या होत्या. सध्या रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव क्रीजवर नाबाद आहेत.

सामना पुन्हा सुरू झाला आहे

भारताने आठ षटकांत दोन बाद 65 धावांवर खेळण्यास सुरुवात केली. सूर्यकुमार आणि रोहित क्रीजवर आहेत. पावसाच्या व्यत्ययानंतर लियम लिव्हिंगस्टोनने नववे षटक टाकले. या षटकातून चार धावा आल्या. नऊ षटकांनंतर भारताची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात ६९ धावा आहे. रोहित 39 आणि सूर्या 15 धावा करून क्रीजवर आहे.

12 षटकांचा खेळ संपला

12 षटकांनंतर भारताने 2 बाद 91 धावा केल्या आहेत. सध्या सूर्यकुमार यादव 27 आणि रोहित शर्मा 49 धावांवर खेळत आहेत. दोघांमध्ये आतापर्यंत 51 धावांची भागीदारी झाली आहे.

रोहितने षटकार मारुन अर्धशतक पूर्ण केले

रोहितने 13व्या षटकात सॅम कुरनच्या चेंडूवर षटकार मारून आपल्या T20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 32 वे अर्धशतक पूर्ण केले. त्याचे हे सलग दुसरे अर्धशतक आहे. याआधी त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९२ धावांची इनिंग खेळली होती. रोहितला अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 36 चेंडू लागले. 13 षटकांनंतर भारताची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात 110 धावा आहे. सध्या रोहित 37 चेंडूत 56 धावा करून क्रीजवर आहे आणि सूर्यकुमार 26 चेंडूत 39 धावा करून क्रीजवर आहे.

भारताला तिसरा धक्का, कर्णधार रोहित शर्मा बाद

कर्णधार रोहित शर्मा अर्धशतक पुर्ण केल्यानंतर मोठी खेळी करु शकला नाही. 14 व्या शतकात आदिल रशीदच्या चौथ्या चेंडूवर त्रिफळाचीत बाद झाला आहे. आता भारताची धावसख्या 14 षटकानंतर 3 बाद 113 अशी धावसंख्या आहे.

सुर्यकुमार यादव बाद भारताला चौथा झटका

124 धावांवर भारताला चौथा धक्का बसला. 16व्या षटकात जोफ्रा आर्चरने सूर्यकुमार यादवला ख्रिस जॉर्डनकरवी झेलबाद केले. तो 36 चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 47 धावा करून बाद झाला आणि त्याचे अर्धशतक हुकले. तत्पूर्वी, कर्णधार रोहित 57 धावा करून बाद झाला. 16 षटकांनंतर भारताची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात 126 धावा आहे. हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा क्रीजवर आहेत.

हार्दिक पांड्या झेलबाद, भारताला पाचवा धक्का

146 धावांवर भारताला पाचवा धक्का बसला आहे. कर्णधार हार्दिक पांड्या 13 चेंडूमध्ये 23 धावा करुन क्रिस जॉर्डनच्या गोलंदाजीवर बाद झाला आहे. सध्या संघाची धावसंख्या 5 बाद 146 धावा अशी आहे. तर शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा खेळत आहेत.

जॉर्डनची हॅटट्रिक हुकली

18 व्या षटकात 146 धावांवर भारताला दोन धक्के बसले. या षटकात ख्रिस जॉर्डन गोलंदाजी करत होता. हार्दिक पांड्याने ओव्हरच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या चेंडूवर सलग दोन षटकार ठोकले. यानंतर तिसऱ्या चेंडूवरही षटकार मारण्याच्या प्रयत्नात हार्दिक झेलबाद झाला. त्याने 13 चेंडूत 23 धावा केल्या. यानंतर शिवम दुबे पुढच्याच चेंडूवर यष्टिरक्षक बटलरच्या हाती जॉर्डनकरवी झेलबाद झाला. तो गोल्डन डकचा बळी ठरला. सध्या अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा क्रीजवर आहेत. 18 षटकांनंतर भारताची धावसंख्या सहा गड्यांच्या मोबदल्यात 147 धावा आहे.

भारताने 171 धावा केल्या

भारताने इंग्लंडसमोर १७२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत सात गडी गमावून 171 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ५७ धावा केल्या. तर, सूर्यकुमार यादवने ४७ धावांची खेळी केली. इंग्लंडकडून ख्रिस जॉर्डनने सर्वाधिक तीन बळी घेतले. मात्र, भारतीय डावाच्या 18व्या षटकात जॉर्डनची हॅटट्रिक हुकली. त्याने सलग दोन चेंडूंवर हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांना बाद केले होते. जॉर्डनने या टी-20 विश्वचषकात आधीच हॅट्ट्रिक घेतली आहे.

प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. विराट कोहली (9) आणि ऋषभ पंत (4) विशेष काही करू शकले नाहीत. यानंतर रोहितने सूर्यासोबत तिसऱ्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी केली. या काळात रोहितने त्याच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 32 वे अर्धशतक झळकावले. सॅम कुरनच्या चेंडूवर षटकार ठोकत त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, यानंतर तो लगेचच बाहेर पडला. आदिल रशीदने रोहितला क्लीन बोल्ड केले. हिटमॅनने ३९ चेंडूंत सहा चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ५७ धावांची खेळी केली. सूर्याही 36 चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 47 धावा करून बाद झाला. हार्दिक पांड्याने 13 चेंडूत 1 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 23 धावा केल्या. दुबे हा गोल्डन डकचा बळी ठरला. अक्षर पटेलने सहा चेंडूंत एका षटकाराच्या मदतीने 10 धावा केल्या. रवींद्र जडेजाने नऊ चेंडूंत दोन चौकारांच्या मदतीने १७ धावा केल्यानंतर नाबाद राहिला.

इंग्लंडला पहिला धक्का

172 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना इंग्लंडला चौथ्या षटकाच्या सुरुवातीला पहिला धक्का बसला आहे. कर्णधार जॉस बटलर 15 चेंडूमध्ये 23 धावा बनवून अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर बाद झाला आहे. सध्या मोईन अली आणि फिलिप्स साल्ट खेळत आहेत. संघाची धावसंख्या 1 बाद 33 धावा अशी आहे.

इंग्लंडला दुसरा धक्का

इंग्लंडला पाचव्या षटकात 34 धावांवर दुसरा धक्का बसला. जसप्रीत बुमराहने फिल सॉल्टला क्लीन बोल्ड केले. सॉल्टला पाच धावा करता आल्या. यापूर्वी कर्णधार जोस बटलर २३ धावा करून अक्षर पटेलचा बळी ठरला होता. पाच षटकांनंतर इंग्लंडची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात ३५ धावा आहे. सध्या मोईन अली आणि जॉनी बेअरस्टो क्रीजवर आहेत.

इंग्लंडला तिसरा धक्का

इंग्लंडला 35 धावांवर तिसरा धक्का बसला आहे. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात म्हणजेच सहाव्या षटकात अक्षर पटेलने जॉनी बेअरस्टोला क्लीन बोल्ड केले. बेअरस्टो खातेही उघडू शकला नाही. अक्षरचा हा दुसरा बळी ठरला आहे. यापूर्वी त्याने कर्णधार जोस बटलरला (23) बाद केले होते. त्याचवेळी बुमराहने फिल सॉल्टला क्लीन बोल्ड केले होते. सहा षटकांनंतर इंग्लंडची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात ३९ धावा आहे. सध्या हॅरी ब्रूक आणि मोईन अली क्रीजवर आहेत.

इंग्लंडला चौथा झटका

इंग्लंडला चौथा झटका 46 धावांवर बसला. अक्षर पटेलने मोईन अलीला यष्टिरक्षक पंतकरवी त्रिफळाचीत केले. या विश्वचषकात पंतचा विकेटमागचा हा 12वा बळी ठरला. त्याचवेळी अक्षरला तिसरे यश मिळाले. यापूर्वी त्याने बटलर आणि बेअरस्टो यांना बाद केले होते. आठ षटकांनंतर इंग्लंडची धावसंख्या चार गड्यांच्या मोबदल्यात ४९ धावा आहे. सध्या हॅरी ब्रूक आणि सॅम करन क्रीजवर आहेत.

इंग्लंडचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला

इंग्लंडला 49 च्या स्कोअरवर पाचवा धक्का बसला. कुलदीप यादवने सॅम कुरनला एलबीडब्ल्यू आऊट केले. त्याला दोन धावा करता आल्या. सध्या हॅरी ब्रूक आणि लियाम लिव्हिंगस्टोन क्रीजवर आहेत. भारतीय फिरकीपटूंनी कहर केला आहे. अक्षरने तीन विकेट घेतल्या आहेत. तर, कुलदीपला यश मिळाले आहे. बुमराहने एक विकेट घेतली आहे.

ब्रूक पॅव्हेलियनमध्ये परतला

मनगटाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने शानदार गोलंदाजी करत इंग्लंडला सहावा धक्का दिला. हॅरी ब्रूकच्या गोलंदाजीवर कुलदीपने भारताला आणखी एक यश मिळवून दिले. ब्रूक 19 चेंडूत 25 धावा करून बाद झाला. ब्रूक बाद झाल्यानंतर ख्रिस जॉर्डन क्रीझवर आला असून त्याच्यासोबत लियाम लिव्हिंगस्टोनही उपस्थित आहे. इंग्लंडने 11 षटकं संपल्यानंतर 6 बाद 68 धावा केल्या असून त्यांना विजयासाठी 54 चेंडूत 104 धावा करायच्या आहेत.

कुलदीपला तिसरे यश मिळाले

मनगटी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने पुन्हा एकदा आपल्या शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन करत ख्रिस जॉर्डनला बाद करून भारताला सातवे यश मिळवून दिले. पाच चेंडूत एक धाव घेत बाद झालेल्या जॉर्डनला कुलदीपने एलबीडब्ल्यू देऊन त्याचा डाव संपवला.

लिव्हिंगस्टोन धावबाद

अक्षर पटेलच्या षटकात लियाम लिव्हिंगस्टोन धावबाद झाला. अक्षरच्या चेंडूवर आर्चरने शॉट खेळला आणि लिव्हिंगस्टोन धावाला, पण आर्चर आपल्या जागेवरून हलला नाही आणि अक्षर लिव्हिंगस्टोनला धावबाद केले. लिव्हिंगस्टोन 16 चेंडूत 11 धावा करून बाद झाला. भारतीय संघ आता अंतिम फेरीत पोहोचण्यापासून दोन विकेट्स दूर आहे, तर गतविजेत्या इंग्लंडचा डाव आता पूर्णपणे फसला आहे.

भारत विजयापासून एक पाऊल दूर

अक्षर पटेलने शानदार क्षेत्ररक्षण करत आदिल रशीदला धावबाद करून भारताला नववे यश मिळवून दिले. भारत आता विजयापासून एक पाऊल दूर आहे, तर इंग्लंडसाठी अडचणी वाढल्या आहेत.

10 वर्षांनंतर भारत अंतिम फेरीत

कर्णधार रोहित शर्माच्या शानदार खेळीनंतर कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्या दमदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने उपांत्य फेरीत इंग्लंडचा 68 धावांनी पराभव करत टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. आता शनिवारी विजेतेपदाच्या लढतीत भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. अशाप्रकारे भारतीय संघाने 10 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारताने याआधी 2014 मध्ये टी-20 विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली होती. भारतीय संघ टी-20 विश्वचषक स्पर्धेतील विजेतेपदाचा सामना तिसऱ्यांदा खेळणार आहे. यापूर्वी 2007 आणि 2014 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. भारताने 2007 मध्ये जेतेपद पटकावले होते, तर 2014 मध्ये ते विजेतेपदाला मुकले होते.

रोहित शर्माच्या 39 चेंडूत 57 धावा आणि सूर्यकुमार यादवच्या 47 धावांच्या जोरावर भारताने 20 षटकात 7 गडी गमावून 171 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 16.4 षटकांत 103 धावांत गडगडला. भारताकडून मनगटी फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने 19 धावांत तीन बळी घेतले, तर अक्षर पटेलने 23 धावांत तीन बळी घेतले. या कामगिरीसाठी अक्षरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने सर्वाधिक 25 धावा केल्या. त्यामुळे भारताने स्पर्धेतील विजयी मोहीम सुरू ठेवली. आता अंतिम फेरीत त्याचा सामना अशा संघाशी होईल जो पहिल्यांदाच विश्वचषकाच्या विजेतेपदाच्या लढतीत पोहोचला आहे आणि अशाप्रकारे अजिंक्य आहे.

logo
Pudhari News
pudhari.news