‘Jasprit Bumrah माझ्‍यापेक्षा हजार पटींनी सरस गोलंदाज’, कपिल देव यांचे प्रशंसोद्‍गार

टी-20 विश्‍वचषकात उपांत्‍य लढतीपूर्वी बुमराहचे 23 षटकात 4.08 च्‍या इकॉनॉमीने 11 बळी
Jasprit Bumrah Kapil Dev
बुमराह माझ्‍यापेक्षा एक हजार पटींनी अधिक सरस आहे, असे प्रशंसोद्‍गार विश्‍वचषक जेते माजी कर्णधार कपिल देव यांनी काढले. File Photo

नवी दिल्‍ली, वृत्तसंस्‍था : Jasprit Bumrah : कारकिर्दीच्‍या सर्वोच्‍च शिखरावर मी जितका तिखट मारा केला, त्‍या तुलनेत बुमराह माझ्‍यापेक्षा एक हजार पटींनी अधिक सरस आहे, असे प्रशंसोद्‍गार विश्‍वचषक जेते माजी कर्णधार कपिल देव यांनी काढले. बुमराहने यंदाच्‍या विश्‍वचषकात उपांत्‍य लढतीपूर्वी 23 षटकात 4.08 च्‍या इकॉनॉमीने 11 बळी घेतले आहेत. त्‍या पार्‍श्वभूमीवर 65 वर्षीय कपिलनी हे मत मांडले.

बुमराहने भारतातर्फे आतापर्यंत 26 कसोटी सामने खेळत त्‍यात 159 बळी घेतले. शिवाय, 89 वन डे लढतीत 149 बळी घेतले आहेत. टी20 मध्‍ये 68 सामन्‍यात 85 बळी, अशी त्‍याची कामगिरी आहे. सर्वकालीन सर्वोत्तम अष्‍टपैलू असा लौकिक असणार्‍या कपिल देवनी आपल्‍या प्रदीर्घ कारकिर्दीत कसोटीत 434 तर वन डे क्रिकेटमध्‍ये 253 बळी घेतले आहेत.

कपिल देव म्हणाले, ‘आपण फक्त रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या किंवा कुलदीप यादव यांच्याबद्दलच का बोलावे? प्रत्येकाची भूमिका आहे. स्पर्धा जिंकणे हे त्यांचे काम आहे. सामना जिंकण्यासाठी एका खेळाडूची कामगिरी महत्त्वाची ठरू शकते, परंतु स्पर्धा जिंकण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम केले पाहिजे. आम्ही फक्त बुमराह किंवा अर्शदीपवर अवलंबून राहिलो तर आम्हाला विजयाची नोंद करणे कठीण होईल’, असेही मत त्यांनी नोंदवले.

‘बुमराह माझ्यापेक्षा 1000 पटीने चांगला गोलंदाज आहे. ही तरुण मुलं आमच्यापेक्षा खूप चांगली आहेत. आमच्याकडे अधिक अनुभव होता. तो मेहनती तर आहेच पण स्वत:ला त्याने फिट बनवले आहे. ज्यामुळे तो उत्कृष्ट प्रदर्शन करत आहे’, असेही त्यांनी म्हटले.

इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यापूर्वी कपिल देव यांनी टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, संघाला माझ्या शुभेच्छा. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ चांगला खेळ करत आहे. मला आशा आहे की सेमीफायनलमध्येही ते सर्वोत्तम खेळ करतील. आम्ही त्यांच्या खेळाचा आनंद घेत आहे. त्यांना सलाम. मी त्यांच्या विजयासाठी प्रार्थना करतो.’

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news