

india vs england odi and t20 series schedule announced
मुंबई : भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर असून, तिथे पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. यापैकी तीन सामने झाले असून, चौथा सामना मँचेस्टर येथे सुरू आहे. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेअंतर्गत (World Test Championship) खेळवली जात आहे. दरम्यान, आता दोन्ही देशांमध्ये एकदिवसीय आणि आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांच्या मालिकेचीही घोषणा करण्यात आली आहे.
इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) पुढील वर्षी, म्हणजेच 2026 च्या उन्हाळी हंगामातील सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. यानुसार इंग्लंडचा संघ न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंकेव्यतिरिक्त भारतीय संघाशीही दोन हात करेल. भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच टी-20 सामन्यांची मालिका होणार असून, त्यानंतर तीन एकदिवसीय सामने खेळवले जातील. याचे सविस्तर वेळापत्रकही आता समोर आले आहे.
भारतीय संघ जवळपास संपूर्ण जुलै महिना इंग्लंडमध्येच वास्तव्यास असेल. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला 1 जुलै 2026 पासून सुरुवात होईल. त्यानंतर 4, 7 आणि 9 जुलै रोजी पुढील सामने खेळले जातील. मालिकेतील पाचवा आणि अखेरचा टी-20 सामना 11 जुलै रोजी होईल.
दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर एकदिवसीय मालिकेला प्रारंभ होईल. मालिकेतील पहिला सामना 14 जुलै, दुसरा सामना 16 जुलै, तर तिसरा आणि अंतिम एकदिवसीय सामना 18 जुलै रोजी खेळवला जाईल. यासह या दौऱ्याची सांगता होईल. ही एकंदरीत मोठी मालिका असून, यात एकूण 8 सामने खेळले जातील.
1 जुलै : पहिला टी-20 सामना
4 जुलै : दुसरा टी-20 सामना
7 जुलै : तिसरा टी-20 सामना
9 जुलै : चौथा टी-20 सामना
11 जुलै : पाचवा टी-20 सामना
14 जुलै : पहिला एकदिवसीय सामना
16 जुलै : दुसरा एकदिवसीय सामना
18 जुलै : तिसरा एकदिवसीय सामना