IND vs ENG Semi-Final | सर करा आव्हानांचा डोंगर..!

4 वेळा सामनावीर ठरलेल्या जॅक्ससह आर्चरचाही बीमोड करण्याचे लक्ष्य
 IND vs ENG Semi-Final |
IND vs ENG Semi-Final | सर करा आव्हानांचा डोंगर..!
Published on
Updated on

एकीकडे, स्पर्धेत भारतातर्फे सर्वाधिक 231 धावा रचणारा सूर्यकुमार, दुसरीकडे इंग्लंडतर्फे सर्वाधिक 11 बळी घेणारा आदिल राशीद... एकीकडे संजू सॅमसन, इशानसारखे केव्हाही तळपून एकहाती सामना फिरवणारे धुरंधर, तर दुसरीकडे एकाच स्पर्धेत तब्बल 4 वेळा सामनावीर ठरणारा विल जॅक्स... एकीकडे, जगातील सर्वोत्तम फलंदाजी लाईनअप, तर दुसरीकडे जोफ्रा आर्चरसारखा कोणत्याही फलंदाजीच्या चिंधड्या उडवू पाहणारा वेगवान स्पीडस्टार.... एकापेक्षा एक असे धुरंधर खेळाडू आपल्या ताफ्यात असलेले भारत व इंग्लंडचे संघ आज ‘आयसीसी’ टी-20 विश्वचषकात आमनेसामने भिडतील, त्यावेळी अवघे वानखेडे स्टेडियम दुमदुमल्याशिवाय राहणार नाही!

मुंबई; वृत्तसंस्था : गतविजेता भारतीय संघ ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर आज (दि. 5) ‘आयसीसी’ टी-20 विश्वचषकाच्या हायव्होल्टेज उपांत्य फेरीत इंग्लंडशी मुकाबला करेल, त्यावेळी प्रामुख्याने आव्हानांचा डोंगर सर करण्याचे लक्ष्य सूर्यकुमार सेनेसमोर असणार आहे.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या उत्तम बहरात आहे. भारताला उपांत्य फेरीपर्यंतच्या प्रवासात थोडेफार झगडावे लागले असले, तरी विंडीजविरुद्ध संघाने उंचावलेला खेळ लक्षवेधी ठरला. विशेषत:, संजू सॅमसनच्या नाबाद 97 धावांच्या खेळीने अवघ्या संघाचे मनोबल उंचावले आहे. अभिषेक शर्माला आतापर्यंत मोठी धावसंख्या उभारता आली नसली, तरी या सामन्यात त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. जोफ्रा आर्चर, आदिल राशीद व लियाम डॉसन यांच्या गोलंदाजीचा ताफा निष्प्रभ करण्याची जबाबदारी प्रामुख्याने इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा आणि हार्दिक पंड्या यांच्यावर असेल. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह हा भारताचा हुकमी एक्का आहे. इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक आणि विल जॅक्स या फॉर्मात असलेल्या फलंदाजांना रोखण्यासाठी बुमराहचा सुरुवातीचा स्पेल निर्णायक ठरेल. दुसरीकडे, जोस बटलरला या स्पर्धेत अद्याप सूर गवसलेला नाही.

कशी असेल खेळपट्टी?

आजच्या महत्त्वाच्या लढतीसाठी वानखेडे स्टेडियमवरील सातवी खेळपट्टी निवडण्यात आली आहे. मैदानाच्या मध्यभागी असलेल्या या खेळपट्टीवर दोन्ही बाजूंच्या सीमारेषा (बाऊंड्रीज) समान अंतरावर असल्याने गोलंदाजांची कसोटी लागणार आहे. 12 फेब्रुवारीनंतर या खेळपट्टीवर एकही सामना झालेला नाही, हे देखील लक्षवेधी आहे. याच खेळपट्टीवर इंग्लंडला वेस्ट इंडिजकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता, तर नेपाळलाही इटलीविरुद्ध अनपेक्षित हार पत्करावी लागली होती. मात्र, सध्या खेळपट्टीवर गवताचा हलका थर असून, मुंबईतील कडाक्याच्या उन्हामुळे तो कायम राहण्याची शक्यता आहे. खेळपट्टीवर चांगला बाऊन्स अपेक्षित असल्याने चेंडू बॅटवर व्यवस्थित येईल, असे संकेत आहेत.

इंग्लंडची गोलंदाजीतील भिस्त आर्चरवर!

इंग्लंडचा जलद गोलंदाज जोफ्रा आर्चर सध्या प्रचंड फॉर्मात आहे. त्याने घेतलेल्या 10 बळींपैकी 8 बळी हे पॉवरप्लेमध्ये (पहिल्या 6 षटकांत) मिळाले आहेत. विशेष म्हणजे, त्याने पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक ‘डॉट बॉल्स’ टाकण्याचा विक्रमही केला आहे. सुरुवातीला विकेटस् गमावण्याची भारताची कमजोरी पाहता आर्चर भारतीय सलामीवीरांना घाम फोडू शकतो. त्यामुळे अर्थातच भारताने त्याच्याविरुद्ध सावध राहणे क्रमप्राप्त असेल.

जसप्रीत बुमराह ठरणार भारताचे ‘ट्रम्प कार्ड’

सुपर-8 फेरीपासून बुमराहने सर्वात किफायतशीर गोलंदाजी केली असून, संपूर्ण स्पर्धेत त्याला केवळ तीन षटकार लागले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्य प्रशिक्षक गंभीर म्हणतात, जेव्हा एखादे षटक महागडे ठरते, तेव्हा आम्ही पुन्हा बुमराहकडे जातो. टी-20 मध्ये सलग दोन षटकांत प्रतिस्पर्धी फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली, तरी सामन्याचा निकालही बदलू शकतो. आतापर्यंतचा अनुभव पाहता, आजही बुमराह ‘ट्रम्प कार्ड’च ठरेल.

काय आहेत इंग्लंडचे कच्चे दुवे?

कमकुवत फलंदाजी : इंग्लंडची आघाडीची फळी या स्पर्धेत अपयशी ठरली आहे. टॉप-6 फलंदाजांची सरासरी केवळ 21.9 असून, दर 16 चेंडूंना ते विकेट गमावत आले आहेत. हॅरी ब्रूक आणि विल जॅक्स वगळता इतर फलंदाजांमध्ये सातत्याचा अभाव दिसून येत आहे.

डाव्या हाताच्या फलंदाजांचे आव्हान : भारतीय संघात पहिल्या 8 खेळाडूंमध्ये 5 डावखुरे फलंदाज असू शकतात. आदिल राशीद आणि लियाम डॉसन या इंग्लंडच्या मुख्य फिरकीपटूंसाठी हे मोठे आव्हान असेल. अभिषेक शर्मासारखे खेळाडू फिरकीवर तुटून पडण्यात माहीर आहेत.

भारतीय संघाची ताकद आणि ‘वानखेडे’चा इतिहास : 2017 पासून भारताने वानखेडे स्टेडियमवर एकही टी-20 सामना गमावलेला नाही. याउलट, इंग्लंडचा या मैदानावरचा रेकॉर्ड खराब आहे. भारताने झिम्बाब्वेविरुद्ध 256 धावांचा डोंगर उभा करून आपली ताकद दाखवून दिली आहे.

4 वेळा सामनावीर ठरलेल्या जॅक्सला कोण रोखणार?

सध्याच्या इंग्लिश संघातील सध्याचा सर्वात बहरातील खेळाडू म्हणजे विल जॅक्स. आश्चर्य म्हणजे हा फलंदाज सातव्या क्रमांकावर उतरतो आणि तरीही त्याच्या खात्यावर डेथ ओव्हर्समध्ये 161 धावा नोंद आहेत. इतके कमी की काय म्हणून यंदाच्या मोसमात त्याने नेपाळ, इटली, श्रीलंका आणि न्यूझीलंडविरुद्ध चक्क चार वेळा ‘सामनावीर’ पुरस्कार पटकावले आहेत. शेन वॉर्ननंतर एकाच विश्वचषकात चार वेळा हा किताब मिळवणारा तो दुसराच खेळाडू. साहजिकच, या दिग्गजाला कोण रोखणार, त्याचे उत्तर आजच्या लढतीत अपेक्षित आहे.

संधी मिळाल्यास अभिषेकचा धावांचा दुष्काळ संपुष्टात येणार?

टी-20 क्रिकेटमध्ये जगातील ‘नंबर वन’ फलंदाज असा लौकिक असलेल्या अभिषेक शर्माला आजच्या लढतीत खेळवले जाणार का? व खेळवल्यास त्याचा धावांचा दुष्काळ संपुष्टात येणार का, हे आज पाहावे लागेल. अभिषेकने या विश्वचषकात आतापर्यंत खेळलेल्या 6 डावांमध्ये अवघ्या 80 धावा केल्या आहेत. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात अर्धशतकी खेळी करत त्याने फॉर्ममध्ये परतण्याचे संकेत दिले होते; मात्र वेस्ट इंडिजविरुद्ध त्याची बॅट तळपली नव्हती. त्यामुळे आज त्याच्याबाबतीत काय रणनीती ठरवली जाईल, याची उत्सुकता असणार आहे.

‘ही’ आहेत भारताची बलस्थाने!

41 पैकी 33 सामन्यांत विजय : 2024 च्या विश्वचषकानंतर भारतीय संघाने खेळलेल्या 41 सामन्यांपैकी 33 सामने जिंकून कमालीचे सातत्य दाखवले आहे. याशिवाय, भारताचे पहिल्या 8 पैकी 5 फलंदाज डावखुरे असल्याने इंग्लंडचे मुख्य फिरकीपटू आदिल राशीद, लियाम डॉसन त्यांच्यासमोर झगडू शकतात.

‘वानखेडे’चा अभेद्य बालेकिल्ला : 2017 पासून भारताने ‘वानखेडे’वर एकही टी-20 सामना गमावलेला नाही. याउलट, इंग्लंडसाठी हे मैदान प्रतिकूल ठरत आले आहे. गेल्या वर्षी याच मैदानावर अभिषेक शर्माच्या 54 चेंडूंत 135 धावांच्या खेळीमुळे भारताने इंग्लंडचा 150 धावांनी धुव्वा उडवला होता.

मुंबईचे तापमान इंग्लंडसाठी ‘ताप’दायक : इतकी सारी समीकरणे प्रतिकूल असताना भरीत भर म्हणून गुरुवारी मुंबईचे तापमान 39 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. ही उष्णता इंग्लंडच्या खेळाडूंची सत्त्वपरीक्षा घेणारी ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news