

टीम इंडियाने इंग्लंडविरुद्धच्या लीड्स कसोटी सामन्यात दमदार सलामी दिली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी ऐतिहासिक कामगिरी करत लीड्सच्या मैदानावर भारताकडून सर्वात मोठ्या सलामी भागीदारीचा विक्रम आपल्या नावे केला. दोघांमध्ये पहिल्या गड्यासाठी 91 धावांची महत्वपूर्ण भागीदारी झाली. याच धावसंख्येवर केएल राहुल 42 धावांवर बाद झाला.
लीड्सच्या मैदानावर भारतीय सलामी जोडीने केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. यापूर्वी हा विक्रम महान फलंदाज सुनील गावस्कर आणि कृष्णम्माचारी श्रीकांत यांच्या नावावर होता. त्यांनी 1986 सालच्या ऐतिहासिक कसोटी सामन्यात पहिल्या गड्यासाठी 64 धावांची भागीदारी केली होती. परंतु, जैस्वाल आणि राहुल या जोडीने तब्बल 39 वर्षांनंतर हा विक्रम मोडीत काढत नवा इतिहास रचला आहे.
इतकेच नव्हे तर, लीड्सच्या मैदानावर कोणत्याही विदेशी सलामी जोडीने पहिल्या किंवा दुसऱ्या डावात 50 हून अधिक धावांच्या भागीदारीचा विक्रमही या दोघांनी आपल्या नावे केला आहे. यापूर्वी हा पराक्रम 2013 मध्ये न्यूझीलंडच्या पीटर फुल्टन आणि हामिश रदरफोर्ड या जोडीने केला होता, जेव्हा त्यांनी पहिल्या गड्यासाठी 55 धावा जोडल्या होत्या.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या बहुप्रतिक्षित मालिकेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. इंग्लंड संघाचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यशस्वी आणि राहुल मैदानात या सलामी जोडीने अत्यंत संयमी आणि प्रभावी फलंदाजीचे प्रदर्शन केले. दोघांच्या जबाबदार खेळीने भारतीय संघाला भक्कम सुरुवात मिळाली.
91 धावा : केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल, 2025*
64 धावा : सुनील गावस्कर आणि क्रिस श्रीकांत, 1986
39 धावा : फारोख इंजिनिअर आणि रमेश सक्सेना, 1967
34 धावा : रोहित शर्मा आणि केएल राहुल, 2021
18 धावा : दत्ता गायकवाड आणि पंकज रॉय, 1952
केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल यांच्यात कसोटी क्रिकेटमध्ये 50+ अधिक धावांची भागीदारी होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी, या जोडीने नोव्हेंबर 2024 मध्ये पर्थच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात पहिल्या गड्यासाठी 201 धावांची विक्रमी भागीदारी केली होती. जैस्वाल हा इंग्लंडमध्ये आपला पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहे, तर दुसरीकडे केएल राहुलला इंग्लंडमधील खेळपट्ट्यांवर खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. अशा परिस्थितीत, या सलामी जोडीची कामगिरी भारतीय संघासाठी या मालिकेत अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे, यात शंका नाही.