बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत विराट कोहलीच्या निशाण्यावर ‘हे’ 3 विक्रम!
पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या आपल्या कुटुंबासह लंडनमध्ये आहे. लवकरच तो क्रिकेटच्या मैदानावर दिसणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होत आहे, ज्यामध्ये कोहलीकडून चाहत्यांना मोठ्या अपेक्षा आहेत.
कोहलीच्या निशाण्यावर 3 विक्रम
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत कोहलीच्या निशाण्यावर तीन मोठे विक्रम आहेत. हे विक्रम मोडून खास स्थान मिळवण्यासाठी किंग कोहली सर्वतोपरी प्रयत्न करेल.
कसोटीत 9000 धावांचा विक्रम
बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत कोहलीने 152 धावा केल्या तर तो कसोटी क्रिकेटमध्ये 9000 धावा पूर्ण करेल. त्याचा सध्याचा फॉर्म पाहता तो ही कामगिरी करू शकेल असा विश्वास चाहत्यांना आहे. अशी कामगिरी करताच तो माजी इंग्लिश क्रिकेटपटू ग्रॅहम गूचचा 8900 धावांचा टप्पाही मागे टाकेल.
चेतेश्वर पुजाराला मागे टाकण्याची संधी
कोहलीने 32 धावा केल्याबरोबरच तो चेतेश्वर पुजाराच्या पुढे जाईल. पुजाराने बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत एकूण 468 धावा केल्या आहेत, तर कोहलीच्या नावावर 437 धावा आहेत. अशा स्थितीत कोहलीला पुजाराला मागे टाकण्याची संधी आहे.
डॉन ब्रॅडमन यांचा शतकांचा विक्रम मोडणार?
विराट कोहलीने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 29 शतके झळकावली आहेत. ऑस्ट्रेलियाचे माजी महान क्रिकेटर डॉन ब्रॅडमन यांच्या शतकांची संख्यागी 29 आहे. बांगलादेश कसोटी मालिकेत कोहलीने एक शतक झळकावल्यास तो ब्रॅडमन यांना शतकाच्या बाबतीत मागे टाकेल. तसेच 30 कसोटी शतके झळकावणाऱ्या शिवनारायण चंद्रपॉल (वेस्ट इंडिज) आणि मॅथ्यू हेडन (ऑस्ट्रेलिया) यांची बरोबरी करेल.

