पुढारी ऑनलाईन डेस्क : IND vs BAN Test Series : भारतीय संघ पुन्हा ॲक्शनमध्ये दिसणार आहे. 19 सप्टेंबर पासून रोहितसेना बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी सज्ज झाली आहे. चाहते या कसोटी मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत. ऋषभ पंत तब्बल 21 महिन्यांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. तर विराट कोहलीही जानेवारी 2024 नंतर कसोटी क्रिकेट खेळताना दिसणार आहे. याशिवाय सर्वांच्या नजरा जसप्रीत बुमराहवर असतील. बुमराह टी-20 वर्ल्ड कप 2024 नंतर टीम इंडियासाठी खेळताना दिसणार आहे. यादरम्यान बुमराहला इतिहास रचण्याची संधी असेल.
वास्तविक, बुमराह चेन्नईत खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीत इतिहास रचण्यापासून 3 विकेट्स दूर असेल. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याने 3 विकेट्स घेतल्यास तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 बळी पूर्ण करणारा 10वा भारतीय गोलंदाज ठरेल. त्याने भारतासाठी आतापर्यंत 36 कसोटी सामने खेळले आहेत. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर 159 विकेट्स आहेत. याशिवाय वनडेत 149 आणि टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 89 विकेट्स घेतल्या आहेत. अशप्रकारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एकूण 397 विकेट्स जमा झाल्या आहेत. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये आतापर्यंत भारतासाठी केवळ 6 वेगवान गोलंदाजांनी 400 किंवा त्याहून अधिक बळी घेण्याचा पराक्रम केला आहे, असा उल्लेख इंडिया टीव्हीच्या वृत्तात केला आहे.
अनिल कुंबळे : 956
आर अश्विन : 744
हरभजन सिंग : 711
कपिल देव : 687
झहीर खान : 610
रवींद्र जडेजा : 568
जवागल श्रीनाथ : 551
मोहम्मद शमी : 448
इशांत शर्मा : 434
जसप्रीत बुमराह : 397
बुमराहशिवाय रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांनाही विक्रम करण्याची मोठी संधी आहे. वास्तविक, भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजा कसोटी क्रिकेटमध्ये 300 विकेट्सच्या जवळपास आहे. चेन्नई कसोटीत 6 बळी घेताच तो कसोटीत 300 बळी पूर्ण करेल. जडेजाप्रमाणेच कुलदीप यादवकडेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 300 बळी पूर्ण करण्याची सुवर्णसंधी आहे. कुलदीप त्याच्या 300 आंतरराष्ट्रीय विकेट्सपासून फक्त 6 विकेट दूर आहे. आता पहिल्या कसोटीत कोणता गोलंदाज इतिहास रचण्यात यशस्वी ठरतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.