पुढारी ऑनलाईन डेस्क : Yashasvi Jaiswal Record : भारताने कानपूर कसोटीत जिंकून बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप नोंदवला. या विजयात संपूर्ण संघाचे योगदान असले, तरी संघाचा डावखुरा सलामीवीर यशस्वी जैस्वालने सर्वात महत्त्वाची भूमिका बजावली. ग्रीन पार्कमध्ये शानदार फलंदाजी करत त्याने संघाला विजय मिळवून दिलाच पण दोन महान भारतीय फलंदाजांनाही मागे टाकले.
यशस्वी जैस्वालने कानपूर कसोटीच्या दोन्ही डावात अर्धशतक झळकावले. या खेळीदरम्यान त्याने 100 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने धावा वसूल करून वीरेंद्र सेहवागच्या क्लबमध्ये एन्ट्री घेतली. कसोटी क्रिकेटच्या दोन्ही डावात 100 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटने अर्धशतक झळकावणारा सेहवाग हा भारताचा एकमेव खेळाडू आहे. जैस्वालने आपल्या 12 व्या कसोटी सामन्यात ही कामगिरी नोंदवली आहे.
रोहित शर्मा, विराट कोहली यांसारख्या दिग्गज कसोटी फलंदाजांनाही अशी कामगिरी जमलेली नाही. वीरेंद्र सेहवागने 2011 मध्ये हा पराक्रम केला होता. दिल्लीत वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात सेहवागने 46 चेंडूत 55 धावा केल्या होत्या तर दुसऱ्या डावात त्याने 55 चेंडूत 55 धावा केल्या होत्या. तर यशस्वीने कानपूर कसोटीच्या पहिल्या डावात 72 (51 चेंडू) आणि दुसऱ्या डावात 51 (45 चेंडू) धावा केल्या.
जैस्वाल 2024 मध्ये कसोटीत एक हजार धावा करण्याच्या उंबरठ्यावर पोहचला आहे. या कॅलेंडर वर्षात त्याच्या खात्यात एकूण 929 धावा जमा झाल्या आहेत. वय वर्षे 23 पूर्ण होण्यापूर्वी एका वर्षात सर्वाधिक कसोटी धावा करण्याच्या बाबतीत त्याने सुनील गावस्कर यांना मागे टाकले आहे. गावस्कर यांनी त्यांचे वय 23 होण्यापूर्वी एका वर्षात भारतासाठी सर्वाधिक कसोटी धावा करण्याचा विक्रम केला होता. त्यांनी 1971 च्या कॅलेंडर वर्षात एकूण 918 धावा केल्या होत्या.
कानपूर कसोटीत भारताने नाणेफेक जिंकून बांगलादेशला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. त्यानंतर पावसामुळे अडीच दिवसांचा खेळ रद्द करण्यात आला. बांगलादेशने पहिल्या डावात 233 धावा केल्या होत्या. त्यानंतर भारताने स्फोटक सुरुवात केली आणि 52 धावांच्या आघाडी मिळवून 9 बाद 285 धावांवर पहिला डाव घोषित केला. त्यानंतर बांगलादेशचा दुसरा डाव 146 धावांत गारद झाला. भारताला 95 धावांचे लक्ष्य मिळाले. यानंतर भारताने 17.2 षटकात 3 विकेट गमावून 98 धावा केल्या आणि सामना खिशात घातला. या विजयासह टीम इंडियाने मालिका 2-0 ने जिंकली.