शकिब हसनला खूनप्रकरणी अटक होण्याची भीती? अचानक जाहीर केली निवृत्ती

Shakib Al Hasan Retirement : टेस्ट, T20 क्रिकेटला अलविदा
Shakib Al Hasan Retirement
शकिब अल हसनTwitter
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Shakib Al Hasan Retirement : बांगलादेशचा अनुभवी अष्टपैलू शकिब अल हसनने कसोटी क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जाहीर केली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या एक दिवस आधी त्याने ही घोषणा केली. उभय संघांमध्ये 27 सप्टेंबरपासून कानपूरमध्ये दुसरी कसोटी सुरू होणार आहे. सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत शाकिबने आपल्या निवृत्तीची घोषणा केली.

तर कानपूर कसोटी शेवटची..

बांगलादेशची पुढील कसोटी मालिका ऑक्टोबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आहे. मालिकेतील एकमेव कसोटी सामना मीरपूर येथे खेळवला जाणार आहे. तो सामना शकिबच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना असेल. पण जर तो सामना खेळला गेला नाही तर भारताविरुद्धची कानपूर कसोटी हिच त्याची शेवटची कसोटी ठरेल.

टी-20 मधूनही निवृत्ती

शाकिब अल हसनने कसोटी फॉर्मेटमधून निवृत्ती घेण्याबरोबरच टी-20 क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर केली आहे. 2024 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये त्याने बांगलादेशकडून शेवटचा टी-20 सामना खेळला होता. म्हणजेच टी-20 मधून निवृत्ती घेतल्या जाहीर केल्याने तो भारताविरुद्धच्या अगामी तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत खेळणार नाही. याबाबत त्याने खुलासा करत म्हटले की, ‘मी माझा शेवटचा टी-20 सामना खेळला आहे. याबाबत बांगलादेश क्रिकेट बोर्डाशी मी बोललो आहे.’

तुरुंगात जाण्याची भीती आहे का?

बांगलादेशात अनेक महिने विद्यार्थ्यांची निदर्शने सुरू राहिली. त्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. देशातील निषेध तीव्र बनला होता आणि दरम्यान, रफीकुल इस्लाम नावाच्या व्यक्तीने त्याचा मुलगा रुबेलच्या हत्येसाठी शाकिब अल हसनसह 156 लोकांची नावे घेतली. तथापि, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने एक निवेदन जारी केले होते की, कोणताही आरोप सिद्ध होईपर्यंत शाकिबला क्रिकेट खेळण्यापासून रोखले जाणार नाही.

कारवाई होणार?

पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत खेळल्यानंतरही शाकिब मायदेशी न परतल्याने दुबईमार्गे लंडनला गेला होता. म्हणजे गेल्या दीड महिन्यापासून तो बांगलादेशला परतलेला नाही. शाकिबला तुरुंगात जाण्याची भीती आहे का, ज्यामुळे तो अद्याप आपल्या देशात परतला नाही? बांगलादेशात एफआयआर दाखल झाल्यामुळे आणि तुरुंगात जाण्याच्या भीतीने शाकिबने आपल्या कारकिर्दीला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे का? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बांगलादेशात परतल्यानंतरच शाकिबवर दाखल केलेल्या एफआयआरवर काय कारवाई होते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

शाकिब म्हणाला, ‘मी बांगलादेशचा नागरिक आहे, त्यामुळे मला बांगलादेशात परत जाण्यात कोणतीही अडचण येणार नाही. पण मला आणि माझ्या कुटुंबाला तिथल्या आमच्या सुरक्षेची काळजी वाटत आहे. मला आशा आहे की परिस्थिती सुधारेल आणि त्यावर काहीतरी उपाय निघेल.’

शाकिबची कसोटी आणि टी-20 क्रिकेट कारकीर्द

37 वर्षीय शाकिबने 2007 मध्ये भारताविरुद्ध चितगाव येथे कसोटी पदार्पण केले होते. त्याच वेळी, 2006 मध्ये पहिला एकदिवसीय आणि टी-20 सामना खेळला. तेव्हापासून तो बांगलादेश संघाचा महत्त्वाचा भाग आहे. त्याच्या नावावर 70 कसोटी सामन्यांमध्ये 4600 धावा आणि 242 विकेट आहेत. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने 247 सामन्यात 7570 धावा केल्या आहेत. त्याने 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये 300 हून अधिक बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. टी-20 क्रिकेटमध्ये त्याने 129 सामने खेळताना 2551 धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये त्याच्या नावावर 149 विकेट्स आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 14000 धावा आणि 600 विकेट्स घेण्याचा पराक्रम करणारा शाकिब हा क्रिकेटच्या इतिहासातील एकमेव क्रिकेटर आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news