

चंदीगड : अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ मुल्लांपुर येथे दाखल झाला असून संघाचा सरावही सुरू झाला आहे. मात्र, या सामन्यापूर्वी भारतीय गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याच्या खेळण्यावर सध्या प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, तो या सामन्याला मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सिराजच्या उपलब्धतेबाबतचा अंतिम निर्णय पुढील दोन ते तीन दिवसांत घेतला जाणार आहे.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील हा एकमेव कसोटी सामना ६ जूनपासून सुरू होत आहे. या लढतीसाठी भारतीय खेळाडू न्यू चंदीगडमधील मुल्लांपुर येथे पोहोचले असून त्यांच्या तयारीचे काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत. संघ सज्ज होत असतानाच गोलंदाजीच्या आघाडीवर भारताची चिंता वाढली आहे. मोहम्मद सिराज या सामन्यात खेळणार की नाही, याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. जर सिराज या सामन्यातून बाहेर पडला, तर जम्मू-काश्मीरच्या औकिब नबीला संघात संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
मोहम्मद सिराज गेल्या काही काळापासून सातत्याने क्रिकेट खेळत आहे. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल हंगामात तो गुजरात टायटन्सचा मुख्य गोलंदाज म्हणून खेळत होता. गुजरातच्या संघाने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली आणि सिराजने संघासाठी सर्वच सामन्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रदीर्घ स्पर्धेनंतर त्याची कसोटी संघात निवड करण्यात आली आहे.
भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला या सामन्यासाठी विश्रांती देण्यात आली असल्याने सिराजवर वेगवान गोलंदाजीची मुख्य जबाबदारी आहे. दुसरीकडे, हर्षित राणा आणि आकाश दीप हे खेळाडू दुखापतीमुळे आयपीएललाही मुकले होते. त्यामुळे सिराजची उपस्थिती भारतासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
मोहम्मद सिराज सध्या मुल्लांपुर येथे संघासोबत असला, तरी सततच्या सामन्यांमुळे त्याच्या वर्कलोडचे व्यवस्थापन करणे आवश्यक झाले आहे. याच कारणामुळे त्याला विश्रांती दिली जाऊ शकते. ६ जूनपासून सुरू होणाऱ्या या सामन्याच्या एक दिवस आधी, म्हणजेच ५ जून रोजी भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिल प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहे. त्यावेळी सिराजच्या खेळण्याबाबत अधिकृत घोषणा केली जाऊ शकते. सध्या सिराजच्या तंदुरुस्तीवर वैद्यकीय पथक बारीक लक्ष ठेवून असून, पुढील दोन-तीन दिवसांत चित्र स्पष्ट होईल.
जर मोहम्मद सिराज या सामन्यात खेळू शकला नाही, तर भारताच्या वेगवान गोलंदाजीची धुरा प्रसिद्ध कृष्णाकडे असेल. अशा स्थितीत नेट बॉलर म्हणून संघात सामील झालेल्या औकिब नबीला मुख्य संघात स्थान देऊन आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी दिली जाऊ शकते.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) नुकतीच नबीची नेट बॉलर म्हणून निवड केल्याची घोषणा केली होती. जम्मू-काश्मीरकडून खेळणाऱ्या औकिब नबीने देशांतर्गत क्रिकेटमधील रणजी चषक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली होती. या दमदार कामगिरीच्या जोरावरच तो निवडकर्त्यांच्या नजरेत आला. आता सिराजच्या अनुपस्थितीत नबीचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पदार्पण होणार का, याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.