

सेंचुरियन : वृत्तसंस्था
भारतीय संघ बुधवारी (13 नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिकेतील तिसरा सामना खेळणार आहे. चार सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ मालिकेत 1-1 ने बरोबरीत आहेत. भारताने मालिकेतील पहिला सामना 61 धावांनी जिंकला, तर दुसरा सामना द. आफ्रिकेने 3 विकेटस्ने जिंकला. हा सामना जिंकणारा संघ मालिका किमान गमावणार नाही. त्यामुळे मालिकेत अपराजित आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील असतील.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार सामन्याच्या ठिकाणी उद्या 20 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे; तर उद्या 20 डिग्री सेल्सिअस तापमान असेल, जे खेळण्यासाठी उत्तम असेल. त्यामुळे उद्या सामन्यात अडथळा येण्याची शक्यता नाही.
अहवालानुसार सेंच्युरियन मैदानाची खेळपट्टी वेग आणि चेंडूच्या उंच टप्प्यासाठी म्हणजेच वेगवान गोलंदाजाला फायदेशीर ठरते. पण त्याचबरोबर छोट्या सीमारेषेमुळे हे ग्राऊंड हाय स्कोअरिंग म्हणून ओळखले जाते. या खेळपट्टीचा भारतीय गोलंदाज अर्शदीप सिंग, आवेश खान, हार्दिक पंड्या यांना फायदा होईल. त्याचबरोबर टप्पा उंच असल्यामुळे फिरकीपटूंनाही थोड्या प्रमाणात मदत होईल.