

पुढारी ऑनलाईन डेस्क : इंग्लंडमध्ये रंगलेल्या कबड्डी वर्ल्ड कप स्पर्धेवरून वाद निर्माण झाला आहे. आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशन (IKF)ने या स्पर्धेची अधिकृत मान्यता नाकारली असून भारतीय कबड्डी महासंघाला या स्पर्धेत भाग घेणाऱ्या भारतीय खेळाडूंवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. स्पर्धेचे आयोजन इंग्लंडच्या वेस्ट मिडलँड्समध्ये येथे करण्यात आले आहे. 17 मार्च रोजी स्पर्धेला सुरुवात झाली असून 23 मार्चला अंतिम सामना रंगणार आहे. (india team kabaddi world cup 2025 controversy)
आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशन (IKF) ने स्पष्ट केले आहे की, इंग्लंडमध्ये आयोजित कबड्डी वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन वर्ल्ड कबड्डी फेडरेशनच्या (WKF) अंतर्गत करण्यात आले आहे. WKF ही संघटना IKF कडून मान्यताप्राप्त नाही.
ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशिया (OCA) ने आंतरराष्ट्रीय कबड्डी फेडरेशन (IKF) ला कबड्डीच्या अधिकृत आंतरराष्ट्रीय संस्थेच्या रूपात मान्यता दिली आहे. OCA, IKF आणि आशियाई कबड्डी महासंघ हे 1990 पासून आशियाई क्रीडा स्पर्धा आणि अन्य आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धांमध्ये पुरुष व महिला गटांसाठी अधिकृत कबड्डी स्पर्धांचे आयोजन करत आहेत.
IKF च्या मते, इंग्लंडमध्ये सुरू असलेली कबड्डी वर्ल्ड कप स्पर्धा ही अधिकृत नाही. तसेच या स्पर्धेत खेळणाऱ्या संघांना त्यांच्या राष्ट्रीय संघटनांकडून पाठिंबा न देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.