

India-Pakistan Asia Cup final : टाळलेल्या हस्तांदोलनापासून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप, आक्षेपार्ह हातवारे, त्यावरून आयसीसीपर्यंत तक्रार, दंडात्मक कारवाई असे आतापर्यंत बरेच नाट्य रंगत आले असून आज रात्री ८ वाजता भारत-पाकिस्तान यांच्यासारखे कट्टर, पारंपरिक प्रतिस्पर्धी आशिया चषक अंतिम सामन्यात आमनेसामने येणार आहेत. जाणून घेवूया दुबईतील खेळपट्टीबाबत...
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. भारताने ‘अ’ गटातील तिन्ही सामने आणि ‘सुपर-४’ गटातील तिन्ही सामने जिंकून अंतिम फेरी गाठली आहे. सलग तिसऱ्या रविवारी भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येणार आहेत. शुक्रवारी श्रीलंकेविरुद्धचा भारताचा सामना सुपर ओव्हरपर्यंत गेला होता, त्यामुळे यंदाची खेळपट्टी कशी असेल आणि पावसाने सामना रद्द झाल्यास काय होईल, असे प्रश्न चाहत्यांच्या मनात आहेत. दुबईमध्ये पाऊस पडण्याची शक्यता जवळजवळ नाहीच, त्यामुळे चाहत्यांना आणखी एक रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो. सामना रद्द झाला तरी 'राखीव दिवसा'मुळे (Reserve Day) ट्रॉफीचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
दुबईमध्ये पाऊस पडण्याची शक्यता खूपच कमी आहे, पण एखाद्या दुर्मिळ परिस्थितीत पावसाने सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर एशियन क्रिकेट कौन्सिलने (ACC) २९ सप्टेंबर हा दिवस अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस म्हणून ठेवला आहे. मुख्य दिवशी आणि राखीव दिवशीही सामना होऊ शकला नाही किंवा त्याचा निकाल लागला नाही, तर एसीसीच्या नियमांनुसार आशिया कप २०२५ चे विजेतेपद दोन्ही संघांमध्ये विभागले जाईल. आशिया कपच्या ४१ वर्षांच्या इतिहासात विजेतेपद कधीही विभागले गेलेले नाही. त्यामुळे यंदा पावसाने सामना दोन्ही दिवस होऊ शकला नाही, तर पहिल्यांदाच ट्रॉफी दोन्ही संघांना संयुक्तपणे दिली जाईल.
'अक्युवेदर'च्या (Accuweather) रिपोर्टनुसार, आज दुबईमध्ये पावसाची शक्यता नाही. या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना पावसामुळे रद्द झालेला नाही आणि अंतिम सामन्यातही पाऊस व्यत्यय आणण्याची शक्यता नाही. राखीव दिवशी (सोमवार) देखील हवामान अंदाजात पावसाचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आशिया कप २०२५ चा अंतिम सामना त्याच खेळपट्टीवर खेळवला जाईल, ज्यावर भारत आणि श्रीलंका यांच्यातील सुपर-४ चा सामना झाला होता. तो सामना मोठ्या धावसंख्येचा ठरला. तसेच सुपर ओव्हरही झाली. त्यामुळे अंतिम सामनादेखील मोठ्या धावसंख्येचा होण्याची अपेक्षा आहे. स्पर्धेदरम्यान दुबईतील खेळपट्ट्या अबू धाबीच्या खेळपट्ट्यांपेक्षा थोड्या संथ राहिल्या आहेत. मात्र, शुक्रवारी झालेल्या भारत-श्रीलंका सामन्यात बदल दिसून आला. त्या सामन्यात दोन्ही संघांनी २०० हून अधिक धावा केल्या होत्या. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना रोमांचक आणि मोठ्या धावसंख्येचा होण्याची शक्यता आहे.