Women’s Asia Cup Hockey | हॉकीत भारताची जेतेपदाची हॅट्‌ट्रिक

चीनला नमवून जेतेपदावर शिक्‍कामोर्तब; काेल्हापूरच्या सानिका मानेचा एकमेव गोल निर्णायक
Women’s Asia Cup Hockey |
Women’s Asia Cup Hockey | हॉकीत भारताची जेतेपदाची हॅट्‌ट्रिक
Published on
Updated on

मोकी; वृत्तसंस्‍था : भारतीय महिला संघाने रविवारी यजमान चीनचा १-० असा पराभव करत महिला ज्युनिअर आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या जेतेपदाची ऐतिहासिक हॅट्‌ट्रिक पूर्ण केली. मोकी ट्रेनिंग बेसवर झालेल्या या अटीतटीच्या अंतिम सामन्यात सानिका चंद्रकांत माने हिने नोंदवलेला एकमेव गोल निर्णायक ठरला. सानिकाने १७ व्या मिनिटाला गोल मारत भारताला आघाडी मिळवून दिली आणि १-० असाच गोलफरक अखेरपर्यंत कायम राहिला.

भारताचे हे सलग तिसरे ज्युनिअर आशिया चषक जेतेपद असून, यापूर्वी संघाने २०२३ आणि २०२४ मध्येही ही स्पर्धा जिंकली होती. या जेतेपदासह भारताने आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या ज्युनिअर विश्वचषकातील आपले स्थानही निश्चित केले आहे.

या मोहिमेत भारतीय ज्युनिअर महिला खेळाडूंनी आशियाई पातळीवर आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. संपूर्ण स्पर्धेत भारताचे आक्रमक आणि संयमी असे दोन्ही पैलू पाहायला मिळाले. बहुतांशी सामन्यांत प्रतिस्पर्ध्यांवर आक्रमक चढाया करणाऱ्या भारतीय संघाने अंतिम फेरीत मात्र संयम आणि बचावात्मक शिस्तीचे उत्कृष्ट प्रदर्शन करत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. यापूर्वी इलिट पूलच्या साखळी सामन्यात चीनने भारताला गोलशून्य बरोबरीत रोखले होते. संपूर्ण स्पर्धेत भारत केवळ याच सामन्यात गोल करण्यात अपयशी ठरला होता. तरीही तीन विजय आणि एका बरोबरीसह १० गुणांची कमाई करत भारताने पूलमध्ये अव्वल स्थान पटकावले होते. अंतिम लढतीत मात्र विजेतेपद पणाला लागलेले असताना आणि चीन घरच्या मैदानावर खेळत असताना आव्हान अधिक खडतर होते. मात्र, सानिकाने दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच १७ व्या मिनिटाला गोल नोंदवत कोंडी फोडली आणि हीच आघाडी अखेरपर्यंत निर्णायक ठरली.

अशी राहिली फायनलपर्यंतची वाटचाल

भारताची अंतिम फेरीपर्यंतची वाटचाल अत्यंत वर्चस्वपूर्ण राहिली. आपल्या जेतेपदाच्या मोहिमेची सुरुवात भारताने दक्षिण कोरियाविरुद्ध ४-१ अशा विजयाने केली. त्यानंतर मलेशियाचा ११-१ असा फडशा पाडला. जपानचा ७-० असा धुव्वा उडवल्यानंतर चीनविरुद्धचा सामना बरोबरीत सोडवत भारताने अव्वल स्थानासह आगेकूच केली.

उपांत्यपूर्व फेरीत पाकिस्तानविरुद्धच्या एकतर्फी लढतीत भारताने चारही सत्रांत गोल डागत १९-० असा ऐतिहासिक विजय नोंदवला. त्यानंतर उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यापेक्षाही अधिक प्रभावी खेळ करत भारताने कोरियावर ५-१ ने मात केली. यामध्ये ड्रॅग-फ्लिक तज्ज्ञ सुप्रियाने तीन पेनल्टी कॉर्नरचे गोलात रूपांतर करत शानदार हॅट्‌ट्रिक नोंदवली, तर मधू सिदार आणि सुखवीर कौर यांनी प्रत्येकी एक गोल करत गतविजेत्या भारताला अंतिम फेरीत पोहोचवले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news