लंडन; वृत्तसंस्था : एफआयएच प्रो लीग हॉकी स्पर्धेच्या लंडन लेगमध्ये भारतीय पुरुष संघाने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ७-१ असा धुव्वा उडवला. ली व्हॅली हॉकी अँड टेनिस सेंटरवर शुक्रवारी झालेल्या या सामन्यात सुरुवातीला एक गोलने मागे पडल्यानंतर भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केले आणि पाकिस्तानच्या संरक्षणाला खिंडार पाडले. भारताच्या या दणदणीत विजयात मध्यरक्षक हार्दिक सिंगने अष्टपैलू कामगिरी बजावत 'सामनावीर' किताब पटकावला.
पहिल्या ९० सेकंदातच मनदीप सिंगच्या चपळाईमुळे भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला, मात्र त्याचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. १३ व्या मिनिटाला पाकिस्तानच्या संघाने काऊंटर-अटॅक करत पेनल्टी कॉर्नर मिळवला. भारताने घेतलेला व्हिडीओ रेफरल अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा कर्णधार अबू बकर महमूदने उत्कृष्ट ड्रॅग-फ्लिक करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये २० व्या मिनिटाला सुखजित सिंगने भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली. यानंतर २६ व्या मिनिटाला हरमनप्रीतने स्वतः गोल करत मध्यंतरापर्यंत भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.
उत्तरार्धात ३४ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकवर हार्दिक सिंगने अचूक गोल करत धावसंख्या ३-१ केली. यानंतर ३५ व्या मिनिटाला जुगराज सिंग, ४१ व्या मिनिटाला अभिषेक आणि ४४ व्या मिनिटाला राज कुमार पाल यांनी लागोपाठ मैदानी गोल केले. ५४ व्या मिनिटाला दिलप्रीत सिंगने सातवा गोल नोंदवला.