

हरारे; वृत्तसंस्था : वैभव सूर्यवंशीचे ४९ चेंडूंत ८१ झंझावाती अर्धशतक आणि मयांक-यश ठाकूर यांच्या एकत्रित ५ बळींच्या जोरावर भारताने येथील तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा ३५ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने ३ सामन्यांची ही मालिका ३-० अशी खिशात घालत यजमान संघाला त्यांच्याच भूमीत ‘क्लीन स्वीप’ दिला. भारताचा नवा टी-२० कर्णधार श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाचा हा पहिलाच पूर्ण मालिका विजय ठरला. नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ५ बाद १९२ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेला २० षटकांत ७ बाद १५७ धावांवर समाधान मानावे लागले.
प्रारंभी, युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशीने संथ खेळपट्टीवर गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत अवघ्या चेंडूंत ८१ धावांची चमकदार खेळी केली. त्याला इशान किशनने २९ धावा करत चांगली साथ दिली. ब्रॅड इव्हान्सने २ बळी घेतले. मयांक यादवने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर ब्रायन बेनेटला बाद करून यजमानांना मोठा धक्का दिला. यानंतर यश ठाकूरने चौथ्या षटकात सलग दोन चेंडूंवर डियॉन मायर्स (१९) आणि कर्णधार सिकंदर रजा (०) यांना बाद करून झिम्बाब्वेचे कंबरडे पाडले. त्याने रजाचा घेतलेला झेल अप्रतिम होता.
झिम्बाब्वेकडून रायन बर्लने (नाबाद ५४) आणि वेस्ली मधेवेरेने (२८) ६० धावांची भागीदारी केली. मात्र, मयांक यादवने मधेवेरेला बाद करून ही जोडी फोडली. मयांकने २९ धावांत ३ बळी घेत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. क्षेत्ररक्षणात ५ झेल सुटूनही भारतीय गोलंदाजांनी झिम्बाब्वेला १५७ धावांवर रोखले आणि ३५ धावांनी सामना जिंकला.
या खेळीसह वैभवने आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेटमध्ये वय वर्षे १६ पूर्ण होण्याआधी एकापेक्षा जास्त वेळा ५०+ धावा करण्याचा अनोखा जागतिक विक्रम रचला आहे. या मालिकेत त्याने सचिन तेंडुलकर (१६ वर्षे २१३ दिवस) आणि रोहित शर्मा (२० वर्षे) यांचे सर्वात तरुण अर्धशतकवीरांचे रेकॉर्डस् आधीच मोडीत काढले आहेत.