IND vs ZIM T20 : भारताचा धमाकेदार विजय, पहिल्या टी२० सामन्यात झिम्बाब्वेचा ७ गडी ४० चेंडू राखून पराभव

Vibhav Sooryavanshi Fifty : ३ सामन्यांच्या मालिकेत भारताची १-० ने आघाडी
IND vs ZIM T20 Team India Won
Published on
Updated on

हरारे : युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने आपल्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात धडाकेबाज कामगिरी करत केवळ १९ चेंडूंत ५० धावांचे स्फोटक अर्धशतक ठोकले. त्याच्या या तुफानी फलंदाजीच्या जोरावर भारताने हरारे स्पोर्टस्‌ क्लब येथे खेळवण्यात आलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात झिम्बाब्वेचा ७ गडी आणि ४० चेंडू राखून पराभव केला. या विजयासह भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

दरम्यान, १५ वर्षीय वैभव सूर्यवंशी याने या अर्धशतकी खेळीने आंतरराष्ट्रीय पुरुषांच्या क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. पहिल्याच टी-२० सामन्यात अवघ्या अर्धशतक फटकावून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात (कसोटी, एकदिवसीय आणि टी-२०) अर्धशतक झळकवणारा जगातील सर्वात कमी वयाचा (१५ वर्षे) पुरुष खेळाडू ठरला आहे.

मयांक यादव आणि प्रिन्स यादव यांच्या शिस्तबद्ध आणि भेदक माराच्या जोरावर झिम्बाब्वेला २० षटकांत ७ बाद १२५ धावांवर रोखले होते. प्रत्युत्तरादाखल १२६ धावांचे लक्ष्य भारताने अवघ्या १३.२ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात पार केले.

झिम्बाब्वेची सुरुवातीलाच दाणादाण

नाणेफेक जिंकून भारताने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि मयांक यादवने पहिल्याच चेंडूवर ब्रायन बेनेटला बाद करून भारताला अप्रतिम सुरुवात करून दिली. मैदानातील पंचांनी सुरुवातीला नाबाद घोषित केले होते. परंतु, भारताने यशस्वी ‘डीआरएस’ घेत हा निर्णय फिरवला. यानंतर प्रिन्स यादवने बेन करनला (१०) वैभव सूर्यवंशीकरवी झेलबाद केले, तर मयांक यादवने डियान मायर्सला (६) शिवम दुबेकरवी झेलबाद करत झिम्बाब्वेची अवस्था ३ बाद २० अशी केली. झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रजा अवघ्या ४ धावांवर असताना शिवम दुबेच्या चेंडूवर बदली खेळाडू सूर्यांश शेडगेकडे सोपा झेल देऊन बाद झाला, त्‍यामुळे झिम्बाब्वेची ४ बाद ३२ अशी दयनीय अवस्था झाली.

मधेवेरे आणि मरुमानीची झुंज

सुरुवातीला झटके बसल्यानंतर रायन बर्ल (२६) आणि वेस्ली मधेवेरे यांनी ३२ धावांची भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रवी बिष्णोईने बर्लला तिलक वर्माकरवी झेलबाद करत ही जोडी फोडली. यानंतर मधेवेरेने यष्टिरक्षक ताडीवनाशे मरुमानी (नाबाद २७) सोबत सहाव्या गड्यासाठी ५७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. मधेवेरेने ३४ चेंडूंत ३ चौकार आणि १ षटकारासह ३९ धावा केल्या. भारताकडून मयांक यादव (१८ धावांत २) आणि प्रिन्स यादव (१९ धावांत २) भेदक मारा केला, तर रवी बिष्णोई आणि शिवम दुबे यांनी प्रत्येकी १ बळी मिळवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news