Ind Vs NZ 2nd T20 | भारताचा शेवटच्‍या षटकात रोमांचक विजय; तिलक वर्माची विजयी खेळी

दुसरी टी-२० :; न्यूझीलंडला ४ गडी राखून नमवले
Ind Vs NZ 2nd T20 |
Ind Vs NZ 2nd T20 | भारताचा शेवटच्‍या षटकात रोमांचक विजय
Published on: 
Updated on: 

ख्राईस्‍टचर्च; वृत्तसंस्‍था : तिलक वर्मा (२६ चेंडूंत नाबाद ५१), नमन धीर (१७ चेंडूंत ३१), नितीश कुमार रेड्डी (१३ चेंडूंत नाबाद २६) यांच्‍या निर्णायक टप्‍प्‍यातील तडाखेबंद फलंदाजीच्‍या बळावर भारताने येथील दुसर्‍या टी-२० सामन्‍यात न्‍यूझीलंडचा ४ गडी राखून पराभव केला आणि ५ सामन्‍यांच्‍या मालिकेत २-० अशी भक्‍कम आघाडी घेतली. न्‍यूझीलंडने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्‍यानंतर ५ बाद १८० अशी आव्‍हानात्‍मक धावसंख्‍या उभारली तर भारतानेही तोडीस तोड प्रत्‍युत्तर देत १९.५ षटकांत ६ बाद १८१ धावांसह विजय खेचून आणला.

विजयासाठी १८१ धावांचे आव्‍हान असताना अभिषेक शर्मा (२७) व संजू सॅमसन (१४) यांनी ४.४ षटकांत ४४ धावांचा फ्‍लाईंग स्‍टार्ट मिळवून दिला. डफीने सॅमसनला बाद करत ही जोडी फोडली. त्‍यानंतर वैभव सूर्यवंशी (४) व कर्णधार श्रेयस अय्‍यर (७) अवघ्‍या १६ धावांच्‍या अंतरात बाद झाल्‍याने भारताची ३ बाद ५६ अशी पडझड झाली. वैभवने स्‍मिथच्‍या गोलंदाजीवर मिशेलकडे सोपा झेल दिला, तर श्रेयसचे सँटेनरच्‍या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होणे आणखी निराशाजनक ठरले. अष्‍टपैलू अक्षर पटेल देखील फार काळ टिकून राहू शकला नाही. यावेळी भारताचा निम्‍मा संघ ७० धावांत गारद झाला होता. मात्र, तिलक वर्माने नमन धीरच्‍या साथीने सहाव्‍या गड्यासाठी ४२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारत संघाला विजयाच्‍या ट्रॅकवर आणले.

पुढे नमन धीर (१७ चेंडूंत ३१) सँटेरनच्‍या गोलंदाजीवर बाद झाला, त्‍यावेळी भारताची ६ बाद ११२ अशी स्‍थिती होती. उर्वरित ३१ चेंडूंत ६९ धावा, असे आव्‍हान असताना तिलक वर्मा व नितीश कुमार यांनी जवळपास प्रत्‍येक चेंडूवर तुटून पडण्‍याचा सिलसिलाच सुरू केला आणि शेवटच्‍या षटकातील पाचव्‍या चेंडूवर विजयावर शिक्‍कामोर्तब केले. मिशेल सँटेनरने अनुभव पणाला लावत २१ धावांत ४ बळी घेतले. मात्र, तो भारताचा विजय रोखू शकला नाही.

फिलिप्स, जेकब्जची अर्धशतके

तत्पूर्वी, न्यूझीलंडने ग्लेन फिलिप्स आणि बेवॉन जेकब्‍ज यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ५ बाद १८० अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. फिलिप्सने ४३ चेंडूंत ४ चौकार, ४ षटकारांसह ७० धावांची खेळी केली, तर जेकब्‍जने ४६ चेंडूंत ५ चौकार, एका षटकारासह ५८ धावांचे योगदान दिले. या जोडीने चौथ्या गड्यासाठी ११६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचत न्यूझीलंडचा डाव सावरला होता. फिलिप्सने ३३ चेंडूंत, तर जेकब्‍जने ४० चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्‍यापूर्वी न्‍यूझीलंडची एकवेळ ३ बाद ४१ अशी स्‍थिती होती.

अर्शदीप सिंगने ४ षटकांत ३३ धावांत २ बळी घेतले. प्रिन्स यादव (१/३०), भुवनेश्‍वर (१/५०) व नितीश रेड्डी (१/३१) यांनी प्रत्‍येकी १ गडी बाद केला. एकही बळी घेतला नसला तरी अक्षर पटेलने ४ षटकांत केवळ २८ धावा दिल्‍या. अखेरच्या षटकांत मायकेल ब्रेसवेलने २ चेंडूंत १ चौकार, १ षटकारासह १० धावा फटकावल्‍या.

शेवटच्‍या षटकात काय घडले?

भारताला शेवटच्‍या षटकात ११ धावांची आवश्‍यकता असताना नितीश कुमारला पहिल्‍या चेंडूवर एकेरी धाव घेता आली. त्‍यानंतर तिलक वर्माने दुसर्‍या चेंडूवर चौकार फटकावत तिसर्‍या चेंडूवर आणखी २ धावा घेतल्‍या. तिलकला पुन्‍हा एकदा एकेरी धाव घेता आल्‍यानंतर उर्वरित २ चेंडूंत ३ धावा असे समीकरण होते. यावेळी डफीने एक वाईड टाकल्‍याने समीकरण आणखी आटोक्‍यात आले. पाचव्‍या चेंडूवर नितीश कुमारने लेग साईडकडे महत्त्वाकांक्षी फटका लगावत २ धावा वसूल केल्‍या आणि रोमांचक विजयावर शिक्‍कामोर्तब करून दिले.

कॅलेंडर वर्षात भारतातर्फे सर्वाधिक बळी

कसोटी : कपिल देव

(१९८३ मध्‍ये ७५ बळी)

वन डे : अनिल कुंबळे

(१९९६ मध्‍ये ६१ बळी)

टी-२० : अर्शदीप सिंग

(२०२६ मध्‍ये ३८ बळी)

अर्शदीपने मागे टाकला भुवनेश्‍वरचा विक्रम!

यादरम्‍यान, अर्शदीप सिंगने एकाच कॅलेंडर वर्षात टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक ३८ बळी घेण्याचा नवा विक्रम प्रस्‍थापित केला. टीम सेफर्ट व ग्‍लेन फिलिप्‍स यांना बाद करत २०२६ मध्‍ये त्‍याने टी-२० मध्‍ये सर्वाधिक ३८ बळींची नोंद केली. ५/५१ ही त्याची या वर्षातील सर्वोत्तम गोलंदाजी ठरली आहे. यापूर्वी २०२२ मध्‍ये भुवनेश्‍वरने ३७ बळी घेतले हाेते. तो विक्रम अर्शदीपने येथे मागे टाकला.

तिसरी टी-२० मंगळवारी

५ सामन्‍यांच्‍या या मालिकेत भारतीय संघ तूर्तास २-० फरकाने आघाडीवर असून उभय संघांतील तिसरी टी-२० मंगळवार, दि. २७ रोजी वेलिंग्‍टन येथे खेळवली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news