India Athletics Flashback 2025 : नीरजची 90 मीटरची झेप ऐतिहासिक! डोपिंग वाढतच राहिल्याने भारताच्या प्रतिमेला तडा

India Athletics Flashback 2025 : नीरजची 90 मीटरची झेप ऐतिहासिक! डोपिंग वाढतच राहिल्याने भारताच्या प्रतिमेला तडा
Published on
Updated on

भारतीय ॲथलेटिक्ससाठी 2025 हे वर्ष संमिश्र ठरले. एकीकडे ‌’गोल्डन बॉय‌’ नीरज चोप्राने 90 मीटरचे बहुप्रतिक्षित शिखर सर करून देशाची मान उंचावली, तर दुसरीकडे उत्तेजक द्रव्य सेवन (डोपिंग) प्रकरणांच्या वाढत्या संख्येमुळे भारतीय क्रीडा क्षेत्राच्या प्रतिमेला मोठा तडा गेला.

देशातील ‌‘मोस्ट एलिजिबल बॅचलर‌’ असलेल्या नीरज चोप्राने हिमाचल प्रदेशातील एका खासगी रिसॉर्टमध्ये टेनिसपटू हिमानी मोर हिच्याशी विवाह करून आयुष्याची नवी इनिंग सुरू केली. वैयक्तिक आयुष्यातील या आनंदासह त्याने क्रीडा मैदानातही नवा इतिहास रचला.

दोहा डायमंड लीगमध्ये 90.23 मीटर भाला फेकून त्याने 90 मीटरचा अडथळा पार केला. असा टप्पा गाठणारा तो तिसरा आशियाई आणि जगातील 25 वा खेळाडू ठरला. त्याने पॅरिस डायमंड लीग, गोल्डन स्पाईक मीट आणि एनसी क्लासिक या स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावले.

मात्र, टोकियो येथील जागतिक अजिंŠयपद स्पर्धेत नीरजला पदकाने हुलकावणी दिली. पाठदुखीच्या त्रासामुळे तो 84.03 मीटरसह आठव्या स्थानावर फेकला गेला. याउलट, नवख्या सचिन यादवने 86.27 मीटर कामगिरीसह चौथे स्थान मिळवून जागतिक स्तरावर भारताची नवी आशा म्हणून स्वतःला सिद्ध केले.

डोपिंगचा विळखा अधिक घट्ट

भारतीय ॲथलेटिक्सला या वर्षीही उत्तेजक सेवनाच्या समस्येने ग्रासले. ॲथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटच्या यादीत भारत जगामध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. ऑलिम्पियन भालाफेकपटू शिवपाल सिंह, आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेती थाळीफेकपटू सीमा पुनिया, धावपटू एस. धनलक्ष्मी आणि हातोडाफेकपटू मंजू बाला यांसारख्या नामवंत खेळाडूंचा समावेश डोपिंगच्या जाळ्यात झाला.

खेळाडूंसोबत प्रशिक्षकांवरही कारवाई

विशेष म्हणजे, प्रथमच खेळाडूंसोबत प्रशिक्षकांवरही कारवाई करण्यात आली. भारतीय ज्युनिअर संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रमेश नागपुरी यांच्यासह कर्मवीर सिंह आणि राकेश या प्रशिक्षकांना खेळाडूंना प्रतिबंधित पदार्थ पुरवल्याप्रकरणी निलंबित करण्यात आले. वाढत्या डोपिंग प्रकरणांची दखल घेत भारतीय ॲथलेटिक्स महासंघाने अँटी-डोपिंग सेल‌’ची स्थापना केली असून, प्रशिक्षकांसाठी नोंदणी अनिवार्य केली आहे.

यजमानपदाकडे वाटचाल

भारताने 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या आयोजनात मोठे यश मिळवले. भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर ‌‘वर्ल्ड ॲथलेटिक्स कॉन्टिनेंटल टूर‌’चे यशस्वी आयोजन करण्यात आले. याशिवाय, 2031 च्या जागतिक ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद भूषवण्यासाठी भारताने अहमदाबादच्या नावाचा प्रस्ताव सादर केला आहे. 2028 च्या आशियाई इनडोअर ॲथलेटिŠस स्पर्धेसाठीही भारताने बोली लावली आहे.

प्रशासकीय बदल

ॲथलेटिक्स महासंघाच्या प्रशासनातही यंदा मोठे बदल झाले. आदिल सुमारीवाला यांचा कार्यकाळ संपल्यानंतर, 2002 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेते गोळाफेकपटू बहादूर सगू यांच्याकडे महासंघाच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news