

झाग्रेब : झाग्रेब येथे सुरू असलेल्या जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अंतिम पांघलने कांस्यपदक जिंकले. तिने 53 किलो वजनी गटातील कांस्यपदकाच्या लढतीत स्विडनच्या एम्मा माल्मग्रेनचा 9-1 असा पराभव केला. या विजयासह या वर्षी भारताची ती पहिली आणि एकमेव फ्रीस्टाईल पदक विजेती ठरली आहे. अंतिमने 2023 च्या बुडापेस्ट येथील गेल्या स्पर्धेतही कांस्यपदक जिंकले होते.
एका बाजूला ग्रीको-रोमन प्रकारात भारताच्या चारही मल्लांना पहिल्याच फेरीत पराभवाचा सामना करावा लागला, तर दुसर्या बाजूला अंतिम पांघलने भारतासाठी आनंदाची बातमी दिली. बुधवारी 21 वर्षीय अंतिमला उपांत्य फेरीच्या अटीतटीच्या सामन्यात पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेत्या इक्वाडोरच्या लुसिया येपेझकडून पराभव पत्करावा लागला होता.
येपेझ अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे अंतिमला कांस्यपदकासाठी पुन्हा संधी मिळाली. कांस्यपदकाच्या लढतीत अंतिमने उत्कृष्ट आक्रमण, अचूक फुटवर्क आणि बचावाचे तंत्र दाखवत माल्मग्रेनला प्रभावीपणे रोखले. पहिल्या फेरीत अंतिमने 3-0 अशी आघाडी घेतली. दुसर्या आणि अंतिम फेरीत अंतिमने प्रति-आक्रमण आणि टेकडाऊन्सच्या मदतीने आपली आघाडी वाढवली. विनेश फोगाटनंतर जागतिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी ती दुसरी भारतीय महिला कुस्तीपटू बनली. विनेशने देखील दोन कांस्यपदके जिंकली आहेत.
अंतिमने 2023 च्या बुडापेस्ट येथील मागील स्पर्धेतही कांस्यपदक जिंकले होते, जिथे तिने याच प्रतिस्पर्धकाचा 16-6 असा पराभव केला होता. मात्र, 2024 मध्ये हंगेरी रँकिंग सीरिजमधील त्यांच्या सर्वात अलीकडील सामन्यात, माल्मग्रेनने अंतिमचा 4-0 ने पराभव केला होता. अंतिमच्या या कांस्यपदकामुळे 2018 पासून जागतिक स्पर्धेत भारताने किमान एक पदक जिंकण्याची मालिका कायम ठेवली आहे.
या व्यतिरिक्त, कांस्यपदकासाठी झालेल्या इतर दोन लढतींमध्ये, मनीष भानवालाला 62 किलो वजनी गटात बल्गेरियाच्या बिल्याना डुडोवाने 0-9 ने हरवले, तर प्रिया मलिकला 76 किलो वजनी गटात क्युबाच्या पॅरिस ऑलिम्पिक पदक विजेती मिलाइमिस मारिनने पराभूत केले. यामुळे प्रिया मलिकला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले.