

India A squad announced for England tour Abhimanyu Easwaran captain
मुंबई : ‘आयपीएल 2025’ हंगाम पुन्हा सुरू होण्याच्या एक दिवस आधी, भारतीय बोर्डाने इंग्लंड दौर्यावर 2 प्रथम श्रेणी सामने आणि टीम इंडियासोबत एका सराव सामन्यासाठी इंडिया ‘अ’ संघाची घोषणा केली.
अपेक्षेप्रमाणे, बंगालचा अनुभवी सलामीवीर अभिमन्यू ईश्वरनकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. यापूर्वी, ऋतुराज गायकवाडने ऑस्ट्रेलिया दौर्यावर इंडिया ‘अ’ संघाचे नेतृत्व केले होते; पण यावेळी तो संघाचे नेतृत्व करत नाही. त्याची संघात निवड झाली आहे.
30 मेपासून सुरू होणार्या या मालिकेसाठी निवडलेल्या संघाची खास गोष्ट म्हणजे, अनुभवी फलंदाज करुण नायरला अनेक वर्षांनी भारतीय संघात परतण्याची संधी मिळाली आहे. गेल्या देशांतर्गत हंगामात प्रथम श्रेणी आणि लिस्ट-वन क्रिकेटमध्ये 1,600 हून अधिक धावा आणि 9 शतके झळकावणार्या करुणला टीम इंडियामध्ये बोलावण्याची मागणी सतत होत होती.
अशा परिस्थितीत, भारत-इंग्लंड कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी भारत ‘अ’मध्ये संधी मिळणे खूप महत्त्वाचे आहे. जर त्याने येथे चांगली कामगिरी केली, तर तो कसोटी संघात पुनरागमन करू शकतो.
त्याच्याशिवाय, राष्ट्रीय निवड समितीने इशान किशनला पुन्हा एकदा संधी दिली आहे. डिसेंबर 2023 मध्ये अचानक टीम इंडिया सोडून परतलेल्या इशानला निवडकर्त्यांनी दीड वर्षानी संधी दिली आहे.
एवढेच नाही, तर या मालिकेसाठी टीम इंडियाच्या काही नियमित खेळाडूंचीही निवड करण्यात आली आहे, ज्यामध्ये शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल ही सर्वात मोठी नावे आहेत.
शुभमनला नवा कसोटी कर्णधार बनवण्याची चर्चा आहे; पण दुसर्या प्रथम श्रेणी सामन्यापूर्वी त्याला संघात सामील होण्यास सांगण्यात आले आहे. दुसरा सामना 6 जूनपासून सुरू होईल.
इंग्लंड दौर्यासाठी भारत ‘अ’ संघ
अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), ध्रुव ज्युरेल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, करुण नायर, नितीशकुमार रेड्डी, शार्दूल ठाकूर, इशान किशन, मानव सुथार, तनुष कोटियन, मुकेश कुमार, आकाश दीप, हर्षित राणा, अंशुल कम्बोज, खलील अहमद, ऋतुराज गायकवाड, सर्फराज खान, तुषार देशपांडे, हर्ष दुबे, शुभमन गिल आणि साई सुदर्शन. (दोघेही दुसर्या सामन्यापासून उपलब्ध होतील.)