Vaibhav Sooryavanshi चे ‘वर्ल्ड रेकॉर्ड’! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५व्या वर्षी ‘ही’ कामगिरी करणारा जगातला पहिलाच फलंदाज

IND vs ZIM 3rd T20 : १५ व्या वर्षी सर्वाधिक ५०+ धावांची खेळी
Vaibhav Sooryavanshi चे ‘वर्ल्ड रेकॉर्ड’! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५व्या वर्षी ‘ही’ कामगिरी करणारा जगातला पहिलाच फलंदाज
Published on
Updated on

हरारे : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात पार पडलेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने इतिहास रचला आहे. अवघ्या १५ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात दोन अर्धशतके झळकावणारा तो जगभरातील पहिला फलंदाज ठरला असून, त्याने स्वतःच्या नावावर आणखी एका जागतिक विक्रमाची नोंद केली आहे. यापूर्वी क्रिकेट जगतात एकाही फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही.

रविवारी, २६ जुलै रोजी पार पडलेल्या या लढतीत सूर्यवंशीने ३१ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. या मालिकेतील पहिल्याच सामन्यातही त्याने धडाकेबाज अर्धशतक ठोकून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वयाच्या १५ व्या वर्षी अर्धशतक करणारा पहिला खेळाडू होण्याचा मान मिळवला होता. याआधी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेपाळच्या कुशल मल्ला याने वयाच्या १५ व्या वर्षी अर्धशतक झळकावले होते. मात्र, त्याच्या नावावर या वयात केवळ एकच अर्धशतक आहे. सूर्यवंशीने मात्र दोन अर्धशतके पूर्ण करत या विक्रमाला आपल्या नावे केले आहे. क्रिकेटच्या शेकडो वर्षांच्या इतिहासात १५ व्या वर्षी अशी किमया करणारा तो एकमेव फलंदाज बनला आहे.

पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ व्या वर्षी सर्वाधिक ५०+ धावांची खेळी

वैभव सूर्यवंशी (भारत) : २

कुशल मल्ला (नेपाळ) : १

संयम आणि आक्रमकतेचा सुरेख संगम

झिम्बाब्वेविरुद्धच्या या तिसऱ्या सामन्यात वैभवने ४९ चेंडूंत ८१ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. या खेळीदरम्यान त्याने ८ चौकार आणि ४ उत्तुंग षटकार मारले. सहसा २०० हून अधिकच्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करणाऱ्या वैभवने या सामन्यात खेळपट्टीचा अंदाज घेत अत्यंत संयमी फलंदाजी केली आणि १६५.३५ च्या स्ट्राईक रेटने धावा जमवल्या.

अखेर वेस्ली मधेवेरेच्या चेंडूवर ब्रॅड इवांसने त्याचा झेल टिपला. पहिल्या सामन्यात अवघ्या १९ चेंडूंत अर्धशतक झळकावणाऱ्या वैभवकडून या सामन्यात शतकाची अपेक्षा केली जात होती. अवघ्या १५ वर्षे १२१ दिवस वयाचा असलेला वैभव जर शतक झळकावण्यात यशस्वी ठरला असता, तर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात तरुण वयात शतक ठोकण्याचा विक्रमही त्याच्या नावावर झाला असता.

शतकाची ही संधी हुकली असली, तरी त्याच्या या ८१ धावांच्या खेळीने संघाला मजबूत स्थितीत पोहोचवले. भारतीय संघाने ही मालिका आधीच २-० अशी जिंकली असून, झिम्बाब्वेला क्लीन स्विप देण्याच्या इराद्याने संघ मैदानात उतरला आहे.

लहान वयात मोठ्या विक्रमांची मालिका

वैभव सूर्यवंशीने २३ जुलै रोजी हरारे येथे झिम्बाब्वेविरुद्ध खेळताना अवघ्या १५ वर्षे ११८ दिवस वयात पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावले होते. अवघ्या १८ चेंडूंत ठोकलेल्या या अर्धशतकामुळे तो पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारांत सर्वात कमी वयात अर्धशतक करणारा खेळाडू बनला होता. त्यानंतर लागोपाठ दुसरे अर्धशतक ठोकत त्याने आपल्या कौशल्याची छाप पुन्हा एकदा जगावर पाडली आहे.

अंतिम टी-२० सामन्यासाठी दोन्ही संघांची Playing XI

भारत : वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा (उपकर्णधार), सूर्यांश शेडगे, रिंकू सिंह, रवी बिश्नोई, अशोक शर्मा, यश ठाकूर, मयंक यादव.

झिम्बाब्वे : ब्रायन बेनेट, बेन कुरेन, डायोन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), रयान बर्ल, वेस्ली मधेवेरे, तदिवानाशे मारुमनी (यष्टीरक्षक), ब्रॅड इवांस, न्यूमन न्यामुरी, वेलिंगटन मसाकाद्झा, ब्लेसिंग मुझाराबानी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news