
टी-२० विश्वचषक २०२६ च्या थरारात आज वानखेडे स्टेडियमवर यजमान अमेरिकेने बलाढ्य भारतीय संघाला चांगलेच झुंजवले. एका क्षणी भारताची अवस्था ४ बाद ४६, तर ६ बाद ७७ धावा अशी असताना कर्णधार सूर्यकुमार यादवने आपल्या बॅटची जादू दाखवत खिंड लढवली. सूर्याच्या झंझावाती ८४ धावांच्या जोरावर भारताने निर्धारित २० षटकांत ९ बाद १६१ धावांपर्यंत मजल मारली आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर अभिषेक शर्मा डावाच्या दुसऱ्याच षटकात 'गोल्डन डक'वर बाद झाला. त्यानंतर इशान किशन (२०) आणि तिलक वर्मा (२५) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र शेडली व्हॅन शालकविकने सहाव्या षटकात वादळ आणले. त्याने एकाच षटकात इशान, तिलक आणि शिवम दुबे (०) या तिघांना बाद करून भारताचे कंबरडे मोडले. पॉवरप्ले संपला तेव्हा भारताची अवस्था ४ बाद ४६ अशी बिकट होती.
प्रमुख फलंदाज एकामागून एक तंबूत परतत असताना कर्णधार सूर्यकुमार यादव मात्र अमेरिकेच्या गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने केवळ ४९ चेंडूंमध्ये १० चौकार आणि ४ उत्तुंग षटकारांच्या मदतीने नाबाद ८४ धावांची खेळी केली. सूर्याने मैदानाभोवती फटक्यांची आतिषबाजी करत १७१.४३ च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्या. त्याला मध्यफळीत अक्षर पटेलने (१४) मोलाची साथ दिली, ज्यांच्यामुळे भारताला शंभरचा टप्पा ओलांडता आला.
अमेरिकेच्या गोलंदाजांनी सुरुवातीला भारतीय फलंदाजांना जखडून ठेवले होते. शेडली व्हॅन शालकविकने ४ षटकांत २५ धावा देत ४ बळी घेण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. हरमीत सिंगने २६ धावांत २ बळी घेत त्याला उत्तम साथ दिली. मात्र, अनुभवी सौरभ नेत्रावळकरला आज लय सापडली नाही, त्याने आपल्या ४ षटकांत ६५ धावांची महागडी गोलंदाजी केली. मोहम्मद मोहसीनने रिंकू सिंगला बाद करून भारताच्या 'फिनिशिंग'ला खिळ घातली.
भारत : १६१/९ (२० षटके)
सूर्यकुमार यादव : ८४* (४९ चेंडू, १० चौकार, ४ षटकार)
शेडली व्हॅन शालकविक : ४-०-२५-४
गडी बाद होण्याचा क्रम : १-८, २-४५, ३-४६, ४-४६, ५-७२, ६-७७, ७-११८, ८-१४०, ९-१६१.
आता १६२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना अमेरिकेचे फलंदाज भारतीय गोलंदाजांचा कसा सामना करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या भारत विरुद्ध अमेरिका सामन्यात नाट्यमय घडामोडींचे सत्र सुरूच आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवने दबावाखाली खेळताना आपले अर्धशतक पूर्ण केले असले, तरी अमेरिकेच्या गोटात मात्र दुखापतींचे सत्र चिंतेचा विषय ठरत आहे. वेगवान गोलंदाज अली खाननंतर आता शुभम रांजणेदेखील मैदानावर जखमी झाला आहे.
डावाच्या १८ व्या षटकाच्या सुरुवातीलाच सूर्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. शुभम रांजणेने टाकलेल्या फुलटॉसवर त्याने आपल्या खास शैलीत 'स्कूप' शॉट मारून चौकार वसूल केला. विशेष म्हणजे, सूर्याने आपल्या अर्धशतकी खेळीतील ३१ धावा या लेग साईडच्या पाठीमागील भागात (Behind square) फटके मारून जमवल्या आहेत. १८ व्या षटकाअखेर सूर्या ३८ चेंडूंत ५२ धावांवर खेळत आहे.
अमेरिकेच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना रोखण्यासाठी सर्वस्व पणाला लावले आहे. १८ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर (१७.५ ओव्हर) अर्शदीप सिंगने मारलेला चेंडू अडवताना गोलंदाज शुभम रांजणेने आपल्या डाव्या बाजूला डायव्ह मारली. या प्रयत्नात त्याच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली. यापूर्वी अली खानही दुखापतीमुळे मैदान सोडून गेला होता. रांजणेवर फिजिओने उपचार केल्यानंतर त्याने कसाबसा षटकाचा शेवटचा चेंडू टाकला.
सात गडी बाद झाल्यानंतर मैदानावर आलेल्या अर्शदीप सिंगने सूर्याला साथ देण्याचा प्रयत्न केला. रांजणेने टाकलेले अचूक यॉर्कर्स खेळताना अर्शदीपला संघर्ष करावा लागला. १८ व्या षटकात भारताने १ चौकार आणि अवांतर धावांच्या मदतीने एकूण ६ धावा वसूल केल्या. सध्या भारताची स्थिती १८ षटकांत ७ बाद १२८ अशी आहे.
भारतीय संघ एका बाजूने कोसळत असताना दुसऱ्या बाजूने कर्णधार सूर्यकुमार यादवने आपला 'क्लास' दाखवत वानखेडे स्टेडियमवर शानदार अर्धशतक झळकावले आहे. आपल्या घरच्या मैदानात सूर्याने प्रतिकूल परिस्थितीत फलंदाजी करत भारताचा डाव सावरला असून संपूर्ण स्टेडियम आता 'सूर्या-सूर्या'च्या जयघोषाने दुमदुमले आहे.
डावाच्या १८ व्या षटकात शुभम रांजणे गोलंदाजीसाठी आला. पहिल्याच चेंडूवर (१७.१ ओव्हर) त्याने टाकलेल्या फुलटॉसचा सूर्याने पुरेपूर फायदा उठवला. आपल्या खास शैलीत गुडघ्यावर बसून त्याने 'स्कूप' शॉट मारला आणि चेंडू फाईन लेग सीमारेषेबाहेर धाडला. या चौकारासह सूर्याने आपले अर्धशतक पूर्ण केले.
भारताने अवघ्या ४५ धावांत ४ गडी गमावले असताना सूर्यकुमार यादव मैदानात आला होता. एका बाजूने विकेट्स पडत असताना त्याने केवळ संयमच राखला नाही, तर योग्य वेळी आक्रमक पवित्रा घेत धावगतीही राखली. या खेळीमुळे भारताला एका आव्हानात्मक धावसंख्येपर्यंत पोहोचण्याची आशा निर्माण झाली आहे.
टी-२० विश्वचषकात अमेरिकेविरुद्ध डाव सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या भारतीय संघाला आणखी एक धक्का बसला. आक्रमक फलंदाजी करत असलेल्या अक्षर पटेलला बाद करून हरमीत सिंगने आपली दुसरी विकेट मिळवली आहे. अक्षर बाद झाल्याने भारताची सातवी विकेट पडली असून सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचण्याचे आव्हान पुन्हा एकदा कठीण झाले आहे.
डावाच्या १७ व्या षटकात (१६.४ ओव्हर) हरमीत सिंगने चेंडूचा वेग वाढवत 'फ्लॅटर' डिलिव्हरी टाकली. अक्षर पटेलने त्यावर 'स्लॉग' फटका मारण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू बॅटच्या खालच्या भागाला लागला. सीमारेषेवर तैनात असलेल्या मोहम्मद मोहसीनने कोणताही चुकार न करता 'रिव्हर्स कप' पद्धतीने सुरेख झेल टिपला.
अक्षर पटेलने ११ चेंडूंत २ चौकारांच्या मदतीने १४ धावांची उपयुक्त भर घातली. सूर्यकुमार यादवला साथ देत त्याने मागील षटकात २१ धावा वसूल केल्या होत्या, मात्र मोक्याच्या क्षणी तो बाद झाला.
विद्यमान विश्वविजेत्या भारतीय संघाला ज्या पद्धतीने अमेरिकेने रोखून धरले आहे, ती या विश्वचषकातील सर्वात प्रेरणादायी कामगिरी ठरत आहे. १७ व्या षटकापर्यंत भारताने केवळ १२४ धावांत ७ गडी गमावले आहेत.
आता सर्व मदार कर्णधार सूर्यकुमार यादववर असून, भारताला उर्वरित २० चेंडूंमध्ये मोठी धावसंख्या उभारण्यासाठी त्याच्या तुफानी फलंदाजीची गरज आहे.
सुरुवातीच्या धक्क्यांनंतर भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन केले आहे. डावाच्या १६ व्या षटकात कर्णधार सूर्यकुमार यादव आणि अक्षर पटेल यांनी अमेरिकेचा प्रमुख गोलंदाज सौरभ नेत्रावळकरवर जोरदार हल्लाबोल करत तब्बल २१ धावा वसूल केल्या. या आक्रमक खेळामुळे भारताने १०० धावांचा टप्पा ओलांडला असून सन्मानजनक धावसंख्येकडे कूच केली आहे.
या षटकात भारतीय फलंदाजांनी मैदानाच्या चहूबाजूला फटकेबाजी केली. षटकाच्या सुरुवातीलाच अक्षर पटेलने सलग दोन चौकार ठोकले. पहिला चौकार बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने, तर दुसरा अत्यंत शिताफीने थर्ड मॅनच्या दिशेला लगावला. शेवटच्या दोन चेंडूंवर सूर्यकुमार यादवने आपला क्लास दाखवला. ५ व्या चेंडूवर स्क्वेअर लेगला चौकार आणि शेवटच्या चेंडूवर आपल्या खास शैलीत धडाकेबाज षटकार खेचून त्याने या षटकाचा शेवट गोड केला.
धावांच्या पावसासोबतच अमेरिकेच्या गोटातून एक चिंतेची बातमी आली. १६ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर क्षेत्ररक्षण करताना वेगवान गोलंदाज अली खानला गंभीर दुखापत झाली. चेंडू अडवताना त्याचे गुडघे जमिनीवर घासले गेले आणि त्याला 'ग्रोइन इंज्युरी' झाल्याचे प्राथमिकरीत्या दिसत आहे. वेदनेने विव्हळणाऱ्या अली खानला फिजिओच्या मदतीने मैदान सोडावे लागले.
१६ षटकांच्या अखेरीस भारताची धावसंख्या ६ बाद ११५ अशी आहे. सूर्यकुमार यादव ४६ धावांवर खेळत असून तो आपल्या अर्धशतकाच्या अगदी जवळ आहे. तज्ज्ञांच्या मते, जर सूर्या शेवटपर्यंत मैदानात टिकला, तर भारतीय संघ १६० धावांचा टप्पा गाठू शकतो.
सूर्यकुमार यादव: ४६ धावा (३३ चेंडू)
अक्षर पटेल: १३ धावा (९ चेंडू)
अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात सुरुवातीच्या पडझडीनंतर भारतीय संघ आता सावरण्याचा प्रयत्न करत आहे. १५ षटकांच्या अखेरीस भारताची धावसंख्या ६ बाद ९४ अशी असून, कर्णधार सूर्यकुमार यादव एकाकी झुंज देत आहे. खेळपट्टीवर फलंदाजी करणे कठीण होत असताना भारताला आता १५० धावांपर्यंत मजल मारण्याचे मोठे आव्हान आहे.
डावाच्या १५ व्या षटकात हरमीत सिंगने गोलंदाजी केली. या षटकात सूर्यकुमार यादवने मिळालेल्या संधीचा फायदा घेत पॉईंटच्या दिशेने एक सुरेख चौकार वसूल केला. सीमारेषेवर क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु त्याचा पाय कुशनला लागल्याने भारताला चार धावा मिळाल्या. या षटकात भारताने एकूण ८ धावा जमवल्या.
दुसऱ्या 'ड्रिंक्स ब्रेक'पर्यंत भारताने ६ गडी गमावून ८६ धावा केल्या होत्या (१४ व्या षटकापर्यंत). खेळपट्टीवर चेंडू बॅटवर नीट येत नाहीये; काही चेंडूंना अतिरिक्त उसळी मिळत आहे, तर काही चेंडू वळत (Spin) आहेत. अशा परिस्थितीत १५० धावा ही देखील एक आव्हानात्मक धावसंख्या ठरू शकते. मात्र, त्यासाठी सूर्यकुमार यादवने शेवटपर्यंत खेळणे भारतासाठी अत्यंत आवश्यक आहे. जर अमेरिकेने ही जोडी फोडली, तर भारताला १३० धावांच्या आत रोखण्यात त्यांना यश येऊ शकते.
भारत: ९४/६
सूर्यकुमार यादव: ३६ धावा (३१ चेंडू)
अक्षर पटेल: २ धावा (५ चेंडू)
हरमीत सिंग: ३-०-१९-१
टी-२० विश्वचषकात भारतीय फलंदाजीची वाताहत सुरूच असून, भरवशाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्यादेखील अमेरिकेच्या फिरकीच्या जाळ्यात फसला आहे. डावाच्या १३ व्या षटकात हार्दिक बाद झाल्याने भारताची स्थिती अत्यंत बिकट झाली असून, यजमान अमेरिकेने सामन्यावर पूर्णपणे पकड मिळवली आहे.
डावाच्या १३ व्या षटकात (१२.४ ओव्हर) फिरकीपटू हरमीत सिंगने हार्दिकला बाद केले. ऑफ-स्टंपच्या बाहेर असलेला 'शॉर्ट पिच' चेंडू पाहून हार्दिकने त्यावर 'लोफ्टेड ड्राईव्ह' मारण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला फटका नीट बसल्याचे वाटले, पण सीमारेषेवर तैनात असलेल्या 'स्वीपर' साईतेजा मुक्कामल्लाने चपळाईने चेंडू खाली येत झेल टिपला.
हार्दिकच्या विकेटमुळे भारताची धावसंख्या आता १२.४ षटकांत ६ बाद ७७ अशी झाली आहे. एका टोकाला कर्णधार सूर्यकुमार यादव खंबीरपणे उभा असला, तरी त्याला साथ देण्यासाठी आता तळाचे फलंदाज मैदानावर येत आहेत. अमेरिकेने ज्या पद्धतीने भारताच्या ६ फलंदाजांना शंभरच्या आत तंबूत धाडले आहे, ते पाहता या विश्वचषकातील हा मोठा उलटफेर ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता अक्षर पटेल फलंदाजीसाठी आला असून, त्याला सूर्यासोबत मोठी भागीदारी करावी लागणार आहे.
टी-२० विश्वचषकात यजमान अमेरिकेने आपला दबदबा कायम राखत भारतीय संघाला पाचवा मोठा धक्का दिला. भारताचा 'फिनिशर' मानला जाणारा रिंकू सिंह आज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला असून, ६ धावा काढून तो माघारी परतला आहे. यामुळे भारतीय संघ आता प्रचंड अडचणीत सापडला आहे.
डावाच्या १२ व्या षटकात फिरकीपटू मोहम्मद मोहसीन गोलंदाजी करत होता. या षटकातील चौथ्या चेंडूवर (११.४ ओव्हर) रिंकूने आक्रमक फटका मारण्याचा प्रयत्न केला. चेंडू बॅटवर नीट न आल्याने रिंकूच्या हातात बॅट फिरली आणि फटक्याची टायमिंग पूर्णपणे चुकली. चेंडू हवेत उंच न जाता सरळ लाँग-ऑनच्या दिशेने गेला आणि तिथे तैनात असलेल्या मिलिंद कुमारने कोणताही चुकार न करता सोपा झेल टिपला.
रिंकू सिंहने १४ चेंडूंचा सामना करताना केवळ ६ धावा केल्या. संपूर्ण डावात तो चेंडू 'टाईम' करण्यासाठी झगडताना दिसला आणि अखेर त्याच संघर्षात त्याने आपली विकेट गमावली.
रिंकू बाद झाल्यामुळे भारताची स्थिती आता ११.४ षटकांत ५ बाद ७२ अशी झाली.
टी-२० विश्वचषकात अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाजी पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळल्यानंतर आता कर्णधार सूर्यकुमार यादवने डावाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. १० षटकांच्या अखेरीस भारताची स्थिती ४ बाद ६३ अशी असून, संघ अजूनही सुरुवातीच्या धक्क्यातून सावरण्यासाठी धडपडत आहे.
डावाच्या १० व्या षटकात मुंबईकर शुभम रांजणे गोलंदाजीसाठी आला. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर (९.६ ओव्हर) सूर्यकुमार यादवला मोठे जीवदान मिळाले. सूर्याने स्लोअर चेंडूवर खेळलेला फटका थेट गोलंदाजाच्या हातात गेला, मात्र 'फॉलो-थ्रू'मध्ये असलेल्या शुभम रांजणेला हा परतीचा झेल पकडण्यात अपयश आले. चेंडू हाताला लागून निसटल्याने सूर्याला नवे आयुष्य मिळाले. यावेळी दोन्ही खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमकही पाहायला मिळाली.
भारतावर अमेरिकेच्या गोलंदाजांनी इतका दबाव टाकला होता की, तब्बल २७ चेंडूंनंतर भारताला एक चौकार मिळाला. सूर्याने १० व्या षटकात दोन देखणे चौकार वसूल करत धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला. त्याने आधी 'लोफ्टेड ड्राईव्ह' मारला आणि त्यानंतर अत्यंत हुशारीने थर्ड मॅनच्या दिशेने चेंडू वळवून चौकार मिळवला.
या सामन्यात भारताने पॉवरप्लेमध्ये ४ गडी गमावले, ही टी-२० विश्वचषकाच्या इतिहासातील भारताची दुसरी सर्वात खराब कामगिरी ठरली. यापूर्वी २०१६ मध्ये नागपूर येथे न्यूझीलंडविरुद्ध भारताची अवस्था २९/४ अशी झाली होती. तसेच, टी-२० विश्वचषकात सहयोगी देशाविरुद्ध पॉवरप्लेमध्ये ४ गडी गमावणारा भारत हा चौथा पूर्ण सदस्य देश ठरला आहे.
भारत: ६३/४
सूर्यकुमार यादव: १५ धावा (१७ चेंडू)
रिंकू सिंग: ३ धावा (९ चेंडू)
आक्रमक पवित्र्यात दिसणाऱ्या इशान किशनला बाद करून अमेरिकेने भारताला दुसरा मोठा धक्का दिला. जीवदान मिळाल्यानंतर इशान मोठी खेळी करेल असे वाटत असतानाच, शेडली व्हॅन शालकविकने त्याला आपल्या जाळ्यात अडकवले.
डावाच्या सहाव्या षटकात (५.२ ओव्हर) व्हॅन शालकविकने जाणीवपूर्वक ऑफ-स्टंपच्या बराच बाहेर चेंडू टाकला. इशानने त्यावर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा फटका जमिनीलगत न राहता सरळ मिड-ऑफवर उभ्या असलेल्या मिलिंद कुमारच्या हातात विसावला. गेल्या षटकात झेल सोडणाऱ्या अमेरिकेने यावेळी कोणतीही चूक केली नाही. इशान किशन १६ चेंडूंत २० धावा (१ चौकार, २ षटकार) काढून माघारी परतला.
इशान बाद झाल्यानंतर आता भारताचा कर्णधार आणि 'मिस्टर ३६०' सूर्यकुमार यादव फलंदाजीसाठी मैदानात आला आहे. वानखेडे हे सूर्याचे घरचे मैदान असल्याने आता त्याच्याकडून एका स्फोटक खेळीची अपेक्षा प्रेक्षक करत आहेत.
भारताची अवस्था ६ व्या षटकात २ बाद ४४.
वानखेडेवर रंगलेल्या सामन्यात पाचव्या षटकात मोठा नाट्यमय थरार पाहायला मिळाला. अमेरिकेने इशान किशनचा झेल सोडण्याची मोठी चूक केली आणि त्याचे परिणाम त्यांना लगेच भोगावे लागले. या जीवदानाचा पुरेपूर फायदा उठवत इशानने पुढच्या दोन चेंडूंवर १० धावा वसूल केल्या.
डावाच्या पाचव्या षटकात अली खान भेदक गोलंदाजी करत होता. षटकातील तिसऱ्या चेंडूवर (४.३ ओव्हर) त्याने इशान किशनला चकवले. इशानने ऑफ-स्टंप बाहेरील चेंडू जोरात 'स्लाईस' केला, जो थेट बॅकवर्ड पॉइंटला उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाकडे गेला. चेंडूचा वेग जास्त असल्याने क्षेत्ररक्षकाला त्याचा अंदाज आला नाही आणि एक सोपा झेल सुटला. हा झेल सुटताच गोलंदाज अली खानने हताश होऊन चेहऱ्यावर हात ठेवला.
मिळालेल्या जीवदानाचा इशानने झटपट फायदा घेतला. षटकाच्या पाचव्या चेंडूवर त्याने कव्हरच्या दिशेने एक सुरेख चौकार लगावला. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर (४.६ ओव्हर) त्याने आपल्या खास शैलीत चेंडू फ्लिक करून षटकार खेचला. अली खानने सुरुवातीच्या चार चेंडूत केवळ १ धाव दिली होती, मात्र शेवटच्या दोन चेंडूंवर इशानने त्याची आकडेवारी बिघडवली.
पाच षटकांच्या अखेरीस भारताने १ बाद ४४ धावा केल्या.
वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या भारत विरुद्ध अमेरिका सामन्यात आज भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील एका दुर्मिळ विक्रमाची नोंद झाली. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रथमच भारताचे पहिले तिन्ही फलंदाज (इशान किशन, अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा) डावखुरे फलंदाज म्हणून मैदानात उतरले आहेत. यापूर्वी असा योग भारतासाठी १९९९ मध्ये दोनदा एकदिवसीय सामन्यांत जुळून आला होता.
डावाच्या चौथ्या षटकात अमेरिकेचा गोलंदाज शेडली व्हॅन शालकविक गोलंदाजीसाठी आला. या षटकातील शेवटच्या चेंडूवर एक चित्तथरारक प्रसंग पाहायला मिळाला. टिळक वर्माने मारलेला चेंडू रॉकेटच्या वेगाने गोलंदाजाच्या दिशेने परतला. व्हॅन शालकविककडे प्रतिक्रिया द्यायला वेळ फार कमी होता, त्याने चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला पण तो त्याच्या हातातून निसटला. सुदैवाने, या वेगवान चेंडूमुळे गोलंदाजाला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही.
वानखेडेची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक मानली जात असली, तरी चौथ्या षटकातील काही चेंडू पाहता चेंडू बॅटवर म्हणावा तसा येत नसल्याचे जाणवले. तिलक वर्माने या षटकात स्क्वेअर लेगच्या दिशेने एक चौकार वसूल केला, मात्र त्याचे इतर काही फटके नीट 'टाईम' होऊ शकले नाहीत. फलंदाजांना धावा काढण्यासाठी चांगलाच संघर्ष करावा लागत आहे.
चार षटकांच्या अखेरीस भारताने १ बाद ३३ धावा केल्या.
सुरुवातीला अभिषेक शर्माचा बळी गमावल्यानंतर भारतीय संघ काहीसा दडपणाखाली येईल असे वाटत होते, मात्र युवा फलंदाज तिलक वर्माने आपल्या आक्रमक खेळीने अमेरिकेचा आनंद फार काळ टिकू दिला नाही. डावाच्या तिसऱ्या षटकात तिलक वर्माने अनुभवी गोलंदाज सौरभ नेत्रावळकरवर हल्लाबोल करत तब्बल १६ धावा वसूल केल्या आणि भारताच्या धावगतीला वेग दिला.
दुसऱ्या षटकात भारताने केवळ २ धावा केल्या होत्या, पण तिसऱ्या षटकात तिलक वर्माने मैदानाचा ताबा घेतला.
पहिल्याच चेंडूवर तिलकने क्रीजच्या बाहेर येत 'साईड स्क्रीन'च्या दिशेने एक उत्तुंग षटकार खेचला.
दुसऱ्या चेंडूवर त्याने अत्यंत हुशारीने फाईन लेगच्या दिशेला चेंडू वळवून चौकार मिळवला.
षटकाच्या शेवटच्या चेंडूवर टिळकचा फटका हवेत होता, मिड-ऑनवर हरमीत सिंगने उडी मारून झेल घेण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या हाताला लागून सीमारेषेबाहेर गेला.
तज्ज्ञांच्या मते, वानखेडेची खेळपट्टी फलंदाजीसाठी अत्यंत पोषक आहे. जरी भारताची सुरुवात संथ झाली असली, तरी भारतीय संघ या डावात १४ पेक्षा जास्त षटकार खेचू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. टीम इंडियाकडे खालच्या फळीत असणारे 'पॉवर हिटर्स' पाहता, धावसंख्येचा आलेख वेगाने वाढण्याची शक्यता आहे.
या महागड्या षटकानंतर भारताची धावसंख्या १ बाद २५ अशी झाली.
अभिषेक बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेल्या तिलक वर्माने सावध सुरुवात केली आहे. अली खानने आपल्या पहिल्याच षटकात केवळ २ धावा देऊन १ बळी मिळवला आणि अमेरिकेचे पारडे जड केले. दोन षटकांच्या समाप्तीनंतर भारताची धावसंख्या १ बाद ९ अशी होती.
टी-२० विश्वचषकात अमेरिकेविरुद्ध मोठ्या धावसंख्येची अपेक्षा असलेल्या अभिषेक शर्माच्या चाहत्यांची साफ निराशा झाली आहे. आपल्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा अभिषेक शर्मा पहिल्याच सामन्यात 'गोल्डन डक' (पहिल्याच चेंडूवर बाद) होऊन माघारी परतला आहे.
भारतीय डावाच्या दुसऱ्या षटकात अली खान गोलंदाजीसाठी आला. अमेरिकेच्या संघ व्यवस्थापनाने अभिषेक शर्मासाठी मैदानावर अत्यंत चतुर आणि असामान्य क्षेत्ररक्षण लावले होते. डावाच्या सुरुवातीलाच 'डीप कव्हर'ला क्षेत्ररक्षक ठेवणे ही एक दुर्मिळ चाल होती. दुर्दैवाने, अभिषेकला या सापळ्याचा अंदाज आला नाही.
अभिषेकने आपल्या पहिल्याच चेंडूवर (षटकातील १.२ चेंडू) कव्हरच्या वरून फटका मारण्याचा प्रयत्न केला. त्याने फटका चांगला मारला होता, परंतु चेंडू थेट तिथेच तैनात असलेल्या संजय कृष्णमूर्ती याच्या हातात विसावला. संजयने डावीकडे सरकत एक सुरेख झेल टिपला.
अभिषेक शर्मा बाद होताच वानखेडे स्टेडियमवर उपस्थित असलेल्या प्रेक्षकांमध्ये एकच शांतता पसरली. आपला पहिलाच विश्वचषक सामना खेळणारा अभिषेक शून्यावर बाद झाल्याने निराश होऊन डगआऊटमध्ये परतला. अभिषेक बाद झाल्यामुळे भारताला सुरुवातीलाच मोठा धक्का बसला आहे. आता तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या तिलक वर्मा आणि इशान किशन यांच्यावर डावाला सावरण्याची मोठी जबाबदारी आहे.
भारताच्या डावाला सुरुवात झाली असून पहिल्या षटकात भारताने ७ धावा जमवल्या. भारतासाठी आज इशान किशन आणि अभिषेक शर्मा ही डाव्या हाताच्या फलंदाजांची जोडी सलामीला उतरली. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात २०१२ नंतर (गंभीर-पठाण) सलामीला दोन डावखुरे फलंदाज उतरण्याची ही पहिलीच वेळ आहे.
अमेरिकेतर्फे मुंबईकर सौरभ नेत्रावळकरने गोलंदाजीची धुरा सांभाळली. त्याने पहिल्या चार चेंडूंवर इशान किशनला आपल्या स्विंग आणि अचूक टप्प्याने चांगलेच अडचणीत आणले होते. एकदा तर चेंडू इशानच्या पॅडला लागला, पण चेंडू यष्टीच्या वरून जात असल्याने तो थोडक्यात बचावला. मात्र, पाचव्या चेंडूवर इशान किशनने आपला आक्रमक पवित्रा घेत सौरभला एक षटकार खेचला आणि दडपण झुगारून दिले. पहिल्या षटकानंतर भारताची धावसंख्या बिनबाद ७ अशी झाली.
टी-२० विश्वचषकाच्या महत्त्वाच्या सामन्यात यजमान अमेरिकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितले की, जसप्रीत बुमराहची प्रकृती ठीक नसल्यामुळे तो या सामन्यात खेळू शकणार नाही. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा संघात समावेश करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त संजू सॅमसन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनाही अंतिम ११ मध्ये स्थान मिळालेले नाही.
अमेरिकेचा कर्णधार मोनांक पटेलने 'चेस' करण्यावर विश्वास दर्शवला आहे. "हे मैदान धावांचे असून आम्हाला लक्ष्याचा पाठलाग करायला आवडेल. अमेरिकेला आमच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत आणि आम्ही त्यासाठी सज्ज आहोत," असे मोनांकने नाणेफेकीवेळी म्हटले.
एका आठवड्यापूर्वी मोहम्मद सिराज भारताच्या टी-२० वर्ल्ड कप संघातही नव्हता. पण हर्षित राणाची गुडघ्याची दुखापत झाल्यामुळे ऐनवेळी संघात बदल करावा लागला आणि आयसीसीने (ICC) सिराजच्या नावावर अधिकृत बदली खेळाडू म्हणून शिक्कामोर्तब केले. अनपेक्षितपणे तो 'योजनेचा भाग नसण्यापासून' थेट 'बॅगा भरा' इथपर्यंत पोहोचला आहे. आता, जसप्रीत बुमराहला ताप आल्याने तो अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. अशा परिस्थितीत, भारताच्या पहिल्याच सामन्यात सिराजला नवीन चेंडूने गोलंदाजी करण्याची जबाबदारी दिली जाऊ शकते.
अभिषेक शर्माची T20I मधील आकडेवारी थक्क करणारी आहे. ३७.०५ ची सरासरी आणि १९४.७४ चा स्ट्राईक रेट. तो खऱ्या अर्थाने एक 'बाउंड्री मशीन' आहे. तो सरासरी प्रत्येक ३.२ चेंडूंनंतर चौकार आणि प्रत्येक ७ चेंडूंनंतर एक षटकार मारतो. त्याच्या या धडाकेबाज शैलीमुळे प्रतिस्पर्धी कर्णधारांना सुरुवातीलाच बचावात्मक पवित्रा घ्यावा लागतो. याचा फायदा असा होतो की, त्याच्या जोडीदाराला सहजपणे 'सिंगल्स' मिळतात आणि टीम इंडिया कोणत्याही अतिरिक्त जोखमीशिवाय धावगतीमध्ये आघाडीवर राहते.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत संजू सॅमसनला सलामीची (ओपनिंग) जबाबदारी देण्यात आली होती, पण तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. दुसरीकडे, इशान किशनने त्याच मालिकेत तिसऱ्या क्रमांकावर मिळालेल्या संधींचे सोने केले.
त्यानंतर, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात त्याला सलामीला उतरवण्यात आले. तिथे इशानने धडाकेबाज खेळी करत आपली निवड सार्थ ठरवली. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष संघ व्यवस्थापनाच्या निर्णयाकडे असेल: ते सॅमसनवर विश्वास दाखवतात की अभिषेक शर्मासोबत इशान किशनला सलामीला उतरवतात?
भारतीय संघ : ईशान किशन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, शिवम दुबे, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर.
अमेरिका संघ : मोनांक पटेल (कर्णधार), अँड्रिज गॉस (यष्टीरक्षक), साईतेजा मुक्कामल्ला, शयन जहांगीर, मिलिंद कुमार, शुभम रांजणे, हरमीत सिंग, मोहम्मद मोहसीन, अली खान, नॉथुश केंजीगे, सौरभ नेत्रावळकर, शेडली व्हॅन शाल्क्विक, शेहान जयसूर्या, जसदीप सिंग, संजय कृष्णमूर्ती.
सामन्याची पहिली सहा षटके अत्यंत महत्त्वाची असतील. भारताची आक्रमक सुरुवात विरुद्ध अमेरिकेची रणनीती असा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. वानखेडेची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक असली तरी, सुरुवातीच्या काही षटकांत चेंडूला मिळणारी हालचाल फलंदाजांची परीक्षा घेऊ शकते. बुमराहच्या अनुपस्थितीत भारतीय वेगवान गोलंदाजीच्या फळीत कोणते बदल केले जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर होणारा हा सामना कागदावर जरी सोपा वाटत असला, तरी सलामीच्या सामन्याचा दबाव दोन्ही संघांवर असेल. २०२४ च्या विश्वचषकानंतर भारतीय संघात मोठे बदल झाले असून, ही नवी पिढी आपली छाप पाडण्यासाठी उत्सुक आहे. भारताचे मुख्य उद्दिष्ट केवळ गुण मिळवणे नव्हे, तर नेट रनरेटमध्ये सुरुवातीलाच मोठी आघाडी घेणे हे असेल. दुसरीकडे, काहीही गमावण्यासारखे नसलेला अमेरिकेचा संघ शिस्तबद्ध गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर भारतीय फलंदाजांना रोखण्याचा प्रयत्न करेल.
टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय संघाचा पहिला सामना आज, शनिवारी (दि. ७) अमेरिकेविरुद्ध (USA) रंगणार आहे. मात्र, या महत्त्वाच्या सलामीच्या लढतीपूर्वीच भारतासाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आजारपणामुळे या सामन्यात खेळू शकणार नाही. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील 'न्यू लूक' टीम इंडिया या स्पर्धेत आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने करण्यासाठी सज्ज झाली आहे.