

बंगळूर ; वृत्तसंस्था : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील पाच सामन्यांची टी-20 मालिका सध्या 2-2 अशी बरोबरीत असून, मालिकेतील पाचवा आणि निर्णायक सामना आज, रविवारी बंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जात आहे. सामना जिंकणारा संघ मालिका विजयाचा मानकरी ठरणार असल्याने दोन्ही बाजूंनी विजयासाठी जोरदार प्रयत्न केले जातील. परंतु, पाहुण्या संघाचा कर्णधार टेम्बा बवुमा हा जखमी झाल्याने या सामन्यात खेळण्याबाबत साशंकता असल्याने पाहुण्या संघात चिंतेचे वातावरण आहे.
सलग 12 सामने जिंकल्यानंतर 13 वा सामना जिंकून विश्वविक्रम करण्याच्या इराद्याने भारतीय संघ पहिल्या सामन्यात उतरला; परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर दुसर्या सामन्यातही त्यांना विजय मिळवता आला नसल्याने मालिका गमावण्याची टांगती तलवार डोक्यावर लटकू लागली. परंतु, तिसर्या आणि चौथ्या सामन्यात भारताने बाऊन्सबॅक करीत मालिका बरोबरीत आणली. त्यामुळे पाचव्या सामन्यात चुरस निर्माण झाली आहे.
संघाचा विचार करता भारतीय संघाने बदल करण्याचे टाळले आहे. चौथ्या सामन्यात दमदार कामगिरी करणारा संघच पाचव्या सामन्यात कायम असण्याची शक्यता आहे. फक्त उमरान मलिकचे पदार्पण उद्या होणार का, याचीच उत्सुकता आहे. पाहुण्या संघासाठी कर्णधाराच्या समावेशाचा निर्णय सामन्यापूर्वी घेतला जाईल. बवुमा खेळू शकला नाही, तर रिझा हेन्रिकला संघात स्थान मिळू शकेल आणि केशव महाराज संघाचे नेतृत्व करेल.
पावसाची शक्यता
बंगळूरमध्ये शुक्रवारी रात्री जोराचा पाऊस पडला असून, शनिवारीही दिवसभर रिपरिप सुरू होती. हवामान खात्याने येथे पावसाची शक्यता वर्तवली आहे.
खेळपट्टी
कोरोना काळापासून चिन्नास्वामी स्टेडियमवर पांढर्या रंगाच्या चेंडूने सामना झालेला नाही. हे मैदान छोटे असल्याने आणि खेळपट्टी फलंदाजीस पोषक असल्याने येथील सामने नेहमीच मोठ्या धावसंख्येचे होतात.