IND vs SA : 549 धावांचा पाठलाग करताना भारताची दाणादाण! सामना अनिर्णीत राखण्यासाठी तिन्ही सत्रे खेळून काढण्याचे आव्हान

द. आफ्रिकन संघ भारतीय भूमीत तब्बल 25 वर्षांनंतर मालिकाविजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.
IND vs SA : 549 धावांचा पाठलाग करताना भारताची दाणादाण! सामना अनिर्णीत राखण्यासाठी तिन्ही सत्रे खेळून काढण्याचे आव्हान
Published on
Updated on

गुवाहाटी : दक्षिण आफ्रिकेने चौथ्या दिवशी पाच तास फलंदाजी करत 5 बाद 260 धावांवर आपला दुसरा डाव घोषित करत भारतासमोर चौथ्या डावात विजयासाठी 549 धावांचे आव्हानात्मक लक्ष्य ठेवले असून, प्रत्युत्तरात यजमान संघाची दिवसअखेर 2 बाद 27 अशी दाणादाण उडाली. यासह दक्षिण आफ्रिकन संघ भारतीय भूमीत तब्बल 25 वर्षांनंतर मालिकाविजयाच्या उंबरठ्यावर पोहोचला. या लढतीत आता भारतासमोर किमान सामन्यातील पराभवाची नामुष्की तरी टाळण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.

दक्षिण आफ्रिकेचा संघ या 2 क सोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशा फरकाने आघाडीवर असून, आता ‌‘क्लीन स्विप‌’च्या दिशेने वाटचाल करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा असेल, हे स्पष्ट आहे. मात्र, 2 बाद 27 या धावसंख्येवरून 549 धावांचे टार्गेट सर करता आले, तर भारतासाठी ते चमत्काराहून वेगळे नसेल. या सामन्यात पहिल्या डावातील 288 धावांच्या भक्कम आघाडीमुळे जागतिक कसोटी विजेत्या दक्षिण आफ्रिकेने सामन्यावर आपली पकड मजबूत केली. दुसऱ्या डावात स्टब्स 94 धावांवर बाद होताच, आफ्रिकेने 5 बाद 260 धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला.

दिवसअखेर भारतीय संघ अजूनही 522 धावांनी पिछाडीवर आहे. हा सामना अनिर्णीत राखण्यासाठी भारताला बुधवारी खेळाची तीनही सत्रे खेळून काढावी लागणार आहेत. मंगळवारी चौथ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला, त्यावेळी साई सुदर्शन 2 धावांवर आणि ‌‘नाईटवॉचमन‌’ कुलदीप यादव 4 धावांवर खेळत होते.

फिरकीचे वर्चस्व

तत्पूर्वी, बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर होत असलेल्या या पहिल्यावहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने बिनबाद 26 धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरुवात केली. मात्र, चेंडू वळण्यास सुरुवात झाल्यानंतर आफ्रिकेच्या आघाडीच्या फळीला संघर्ष करावा लागला.

रिकेलटन (35) आणि एडन मार्करम (29) यांनी पहिल्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली; मात्र डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाने (62 धावांत 4 बळी) या दोघांनाही माघारी धाडले. रिकेलटन कव्हरमध्ये झेलबाद झाला, तर मार्करामला जडेजाने चकवा दिला; क्रिजच्या बाहेरून आत वळलेला हा चेंडू बॅटला हुलकावणी देत थेट ऑफ स्टंपवर आदळला.

ऑफ स्पिनर वॉशिंग्टन सुंदरने दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाला लेग स्लिपमध्ये झेलबाद केले. ऋषभ पंतने स्टंपिंगची संधी दवडली नसती, तर सुंदरला स्टब्सची विकेटही मिळाली असती. टोनी डी झोर्झी (49) अर्धशतकास मुकला, त्याला जडेजाने पायचित पकडले. मात्र, वियान मुल्डर (नाबाद 35) आणि स्टब्स यांनी दक्षिण आफ्रिकेचा डाव सावरला. अखेर जडेजाने स्टब्सचा त्रिफळा उडवत त्याची नऊ चौकार आणि एका षटकारासह सजलेली खेळी संपुष्टात आणली. यानंतर बवुमाने तत्काळ डाव घोषित केला.

भारताची खराब सुरुवात

धावांच्या डोंगराचा पाठलाग करताना भारताच्या दुसऱ्या डावाची सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर यशस्वी जैस्वालने (13) मार्को यान्सेनच्या गोलंदाजीवर ‌‘अप्पर कट‌’ मारून प्रेक्षणीय षटकार वसूल केला. मात्र, पुढच्याच षटकात तसाच फटका मारण्याच्या नादात तो यष्टिरक्षकाकडे झेल देऊन बाद झाला. त्याचा जोडीदार के. एल. राहुल 6 धावांवर असताना फिरकीपटू सायमन हार्परच्या जबरदस्त वळण घेतलेल्या चेंडूने त्याचा त्रिफळा उडवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news