

भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सेनुरन मुथुसामी (Senuran Muthusamy) याने आपल्या बॅटची कमाल दाखवत एक अविस्मरणीय शतक झळकावले. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने भारतीय गोलंदाजांच्या नाकीनऊ आणले आणि द. आफ्रिकेचा डाव मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्यात सिंहाचा वाटा उचलला. मुथुसामीच्या या ऐतिहासिक खेळीमुळे तो आता द. आफ्रिकेच्या महान फलंदाजांच्या खास यादीत सामील झाला आहे.
दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली ती मुथुसामी आणि काइल वेरेने यांच्या भागीदारीने. रविवारी (दि. २३) या जोडीने आफ्रिकेचा डाव पुढे नेला. दोघांनी सातव्या विकेटसाठी तब्बल ८८ धावांची भागीदारी रचली. सकाळच्या पहिल्या सत्रात भारतीय गोलंदाजांना एकही विकेट घेता आली नाही, ज्यामुळे हे सत्र पूर्णपणे पाहुण्या संघाच्या नावावर राहिले. मुथुसामी आणि वेरेने यांनी संयमी आणि आक्रमकतेचा समतोल साधत भारतीय गोलंदाजांना अक्षरशः विकेटसाठी हतबल केले.
दुसऱ्या सत्रात रवींद्र जडेजाने वेरेनेला बाद करत भारताला दिवसाचे पहिले यश मिळवून दिले. मात्र, वेरेने बाद झाल्यानंतरही मुथुसामीचे मनोधैर्य खचले नाही. त्याने मार्को यानसेन याच्या साथीने आणखी एक महत्वपूर्ण भागीदारी केली आणि संघाचा स्कोर ४०० धावांच्या पलिकडे नेला. याच दरम्यान मुथुसामीने आपले पहिले आंतरराष्ट्रीय कसोटी शतकाचा टप्पा पार केला आणि या यशाचे जोरदार सेलिब्रेशन केले.
आपले पहिले कसोटी शतक झळकावताना मुथुसामी एका विशिष्ट आणि ऐतिहासिक यादीत सामील झाला आहे. तो दक्षिण आफ्रिकेचा तिसरा फलंदाज ठरला आहे, ज्याने भारताविरुद्ध ७व्या किंवा त्यापेक्षा खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना शतक ठोकले. यापूर्वी लांस क्लूजनर आणि क्विंटन डिकॉक यांनी अशी कामगिरी केली होती.
लांस क्लूजनर : १९९७ मध्ये नाबाद १०२ धावा.
क्विंटन डिकॉक : २०१९ मध्ये १११ धावा.