

IND vs SA 2nd T20 Hardik Pandya Nears Historic Milestone
चंदीगड : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्याकडे क्रिकेट जगताचे लक्ष लागले आहे. कटक येथील पहिल्या सामन्यात दिमाखदार विजय मिळवल्यानंतर, आता टीम इंडियाची नजर सलग दुसरी लढत जिंकण्यावर असेल. दरम्यान, या सामन्यात भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या एक अनोखा इतिहास रचण्यासाठीही सज्ज झाला आहे.
चंदीगडजवळील मुल्लांपूर येथे नवनिर्मित क्रिकेट स्टेडियमवर हा दुसरा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना रंगणार आहे. पुरुष क्रिकेट संघाचा या मैदानावरचा हा पहिला आंतरराष्ट्रीय सामना आहे. या ऐतिहासिक क्षणी, टीम इंडिया कटक येथील आपला विजयी सिलसिला कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.
हार्दिक पंड्या या सामन्यात जो विक्रम करणार आहे, तो टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यापूर्वी मोजक्याच खेळाडूंनी केला आहे. मात्र, हार्दिक जेव्हा या यादीत सामील होईल, तेव्हा तो इतरांपेक्षा सर्वात वेगळा ठरणार आहे.
द. आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मध्ये फक्त 1 विकेट घेताच हार्दिक पंड्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 100 बळींचा टप्पा पूर्ण करेल. 100 बळी घेताच, तो टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 100 षटकार आणि 100 बळी मिळवणारा जगातील चौथा खेळाडू ठरेल. विशेष म्हणजे... या यादीतल सध्याचे खेळाडू फिरकी अष्टपैलू आहेत. परंतु, हार्दिक पंड्या असा पराक्रम करणारा जगातील पहिला 'जलदगती अष्टपैलू' खेळाडू ठरणार आहे.
सिकंदर रजा : झिम्बाब्वे
मोहम्मद नबी : अफगाणिस्तान
विरनदीप सिंग : मलेशिया
1 विकेट घेताच हार्दिक पंड्या T20 आंतरराष्ट्रीयमध्ये 1000+ धावा आणि 100 बळी घेणारा देखील चौथा क्रिकेटपटू ठरेल. या यादीतही हार्दिक हा एकमेव जलदगती अष्टपैलू असेल.
शाकिब अल हसन : बांग्लादेश
मोहम्मद नबी : अफगाणिस्तान
सिकंदर रजा : झिम्बाब्वे
पहिल्या टी-20 सामन्यात हार्दिक पंड्याने धुवांधार आणि नाबाद अर्धशतकी खेळी साकारली होती. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही तो आपला फॉर्म कायम राखत, कटक येथे सोडलेल्या ठिकाणाहूनच फलंदाजीची गाडी पुढे नेण्यासाठी उत्सुक असेल. त्याच्या अप्रतिम फलंदाजी आणि गोलंदाजीच्या जोरावर हार्दिक हा सामना आपल्या नावावर करून भारतीय क्रिकेटच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.