

जोहान्सबर्ग : वृत्तसंस्था
भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND Vs SA) यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना डर्बनच्या किंग्समीड मैदानावर पावसामुळे होऊ शकला नाही. आता उभय संघांमधला दुसरा टी-20 सामना गकेबेरहा शहरातील सेंट जॉर्ज पार्क क्रिकेट स्टेडियमवर आज खेळला जाणार आहे, पण या सामन्यातही पावसाचा धोका आहे. जून 2024 मध्ये होणार्या वर्ल्डकपपूर्वी भारताचे मोजकेच सामने उरले आहेत. तेच जर पावसामुळे रद्द झाले तर संघाला विश्वचषकाची मॅच प्रॅक्टिस मिळणार नाही.
पहिला टी-20 सामना पावसामुळे गेला होता वाहून
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना डर्बनच्या किंग्समीड क्रिकेट स्टेडियमवर होणार होता. मात्र, पावसामुळे हा सामना रद्द झाला. सततच्या पावसामुळे या सामन्यात नाणेफेक होऊ शकली नाही. अशा स्थितीत मालिकेतील उर्वरित दोन सामने दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
टी-20 मध्ये दोन्ही संघांचे हेड टू हेड रेकॉर्ड (IND Vs SA)
भारत आणि दक्षिण आफ्रिका टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 24 वेळा आमने-सामने आले आहेत. यापैकी टीम इंडियाने 13 वेळा विजय मिळवला असून 10 सामने दक्षिण आफ्रिकेच्या नावावर आहेत. त्याचवेळी एक सामनाही अनिर्णीत राहिला. दक्षिण आफ्रिकेतील टीम इंडियाचे आकडेही खूपच प्रभावी आहेत. दक्षिण आफ्रिकेत दोन्ही संघांमध्ये 7 टी-20 सामने खेळले गेले आहेत. यापैकी टीम इंडियाने 5 टी-20 सामने जिंकले आहेत आणि फक्त 2 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे.
गकेबेरहामध्ये कसे असेल हवामान?
दोन्ही संघांमधील दुसरा सामना आज (12 डिसेंबर) होणार आहे. मात्र, हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार मंगळवारी गकेबेरहा शहरात पावसाची 60 टक्के शक्यता आहे. त्याचबरोबर गकेबेरहाचे तापमान 21 अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते.
संघ यातून निवडणार
भारत : यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, इशान किशन, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, दीपक चहर.
दक्षिण आफ्रिका : एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमॅन, मॅथ्यू ब्रीट्जके, नांद्रे बर्गर, जेराल्ड कोएत्जी, डोनोवन फरेरा, रिझा हेंड्रिक्स, मार्को जान्सेन, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, अँडिले फेहलुक्वायो, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, लिझाद विलियम्स, ब्यूरन हेंड्रिक्स.