

कोलकाता : बहुप्रतीक्षित 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना शुक्रवार (दि. 14) पासून सुरू होत असून या मालिकेत दक्षिण आफ्रिकेच्या दर्जेदार फिरकी गोलंदाजीसमोर भारतीय आघाडीवीरांचा कस लागू शकतो. गतवर्षी भारताला मायदेशात पत्कराव्या लागलेल्या मानहानीकारक पराभवाची सल आताही कायम असून या अनुषंगाने भारतीय आघाडीवीरांचा पवित्रा विशेष महत्त्वाचा ठरू शकतो. आज पहिल्या दिवसाच्या खेळाला सकाळी 9.30 वाजता सुरुवात होईल.
भारताला गतवर्षी मायदेशात न्यूझीलंडच्या एजाझ पटेल, मिचेल सँटेनर आणि ग्लेन फिलिप्स या फिरकी त्रिकुटाने चांगलेच जेरीस आणले होते. त्या मालिकेतील 3 कसोटी सामन्यांत त्यांनी 36 बळी घेत भारताचा मायदेशातील अपराजित मालिका खंडित करत 0-3 असा व्हाईट वॉश दिला होता. या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकन संघही फिरकी आक्रमणावर अधिक भिस्त राखून असल्याने भारतीय संघाला विशेष दक्ष राहावे लागणार आहे.
ऐतिहासिकदृष्ट्या जलद गोलंदाजांसाठी ओळखला जाणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ, सध्या जगातील सर्वोत्तम फिरकी गोलंदाजांसह येथे दाखल झाला आहे, हे येथे लक्षवेधी ठरते. यापूर्वी, पाकिस्तानविरुद्धची मालिका दक्षिण आफ्रिकन संघाने 1-1 अशी बरोबरीत सोडवली आणि त्यावेळी टेम्बा बवुमासारखा अव्वल फलंदाज या संघात समाविष्ट नव्हता, हे देखील दखलपात्र आहे. त्या मालिकेत केशव महाराज, सायमन हार्मर आणि सेनूरन मुथुसामी या दक्षिण आफ्रिकेच्या फिरकी त्रिकुटाने एकूण 39 पैकी तब्बल 35 बळी घेतले. याच पार्श्वभूमीवर भारताचे सहायक प्रशिक्षक रायन टेन डोशचे यांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. दक्षिण आफ्रिकन संघात 4 फिरकीपटू असून त्यापैकी 3 फिरकीपटूंना अंतिम संघात समाविष्ट केले जाऊ शकते, याचाही त्यांनी उल्लेख केला आहे.
कारकिर्दीत 1 हजार प्रथमश्रेणी बळी खात्यावर असलेल्या 36 वर्षीय अनुभवी सायमन हार्मरला भारतीय परिस्थिती नवीन नाही. 2015 च्या दौऱ्यावर त्याने दोन कसोटी खेळले होते आणि चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा तसेच वृद्धिमान साहा यांसारख्या भारतीय फलंदाजांचे महत्त्वाचे बळी घेतले होते. हार्मरचा अचूक मारा आणि वेगातील बदल डावखुरा फिरकी गोलंदाज केशव महाराजसाठी पूरक ठरू शकतो. केशव महाराज आधुनिक क्रिकेटमधील सर्वात अचूक आणि आक्रमक फिरकी गोलंदाजांपैकी एक मानला जातो.
दोन्ही संघांचे बलाबल पाहता, या सामन्यात ईडन गार्डन्सची खेळपट्टी सर्वांत महत्त्वाची ठरेल. बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी खेळपट्टी अतिरिक्त वळण घेणारी नसेल असे यापूर्वीच म्हटले आहे.
येथील कसोटी सामन्यांचा इतिहास पाहता, येथील खेळपट्टी सुरुवातीला जलद गोलंदाजी आणि नंतर रिव्हर्स स्विंग गोलंदाजीसाठी पूरक ठरत आली आहे. या पार्श्वभूमीवर, जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह भारताचा ‘हुकमी एक्का’ ठरू शकतो. भारत दोन वेगवान गोलंदाजांसह उतरण्याची शक्यता असून, स्थानिक आकाश दीपला संधी मिळू शकते.
शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील युवा भारतीय संघाने इंग्लंडमध्ये 2-2 अशी मालिका बरोबरीत साधत आपली क्षमता दाखवली. मात्र, मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवाची सल अजूनही कायम आहे. भारतासाठी, फिरकी गोलंदाजी खेळताना तांत्रिक कौशल्याचा योग्य वापर आणि संयम हीच विजयाची गुरुकिल्ली असेल, हे देखील स्पष्ट आहे. ऋषभ पंत तंदुरुस्त असल्याने आणि फॉर्ममध्ये असलेला ध्रुव ज्युरेल स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून खेळणार असल्याने मधली फळी अधिक स्थिर ठरू शकते. वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजीतील ‘ड्रिफ्ट’सह फलंदाजी आणखी मजबूत करण्यासाठी पूरक ठरेल, असे संकेत आहेत.
भारत : शुभमन गिल (कर्णधार), के. एल. राहुल, यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, ऋषभ पंत (यष्टिरक्षक, उपकर्णधार), ध्रुव ज्युरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, आकाश दीप, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, अक्षर पटेल, देवदत्त पडिक्कल.
दक्षिण आफ्रिका : टेम्बा बवुमा (कर्णधार), एडन मार्कराम, रायन रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स, कायल व्हेरीयन, डेवाल्ड ब्रेविस, झुबायर हमजा, टोनी डी झोर्झी, कॉर्बिन बॉश, विआन मुल्डर, मार्को जॅन्सन, केशव महाराज, सेनूरन मुथुसामी, कागिसो रबाडा, सायमन हार्मर.
हेड टू हेड
एकूण सामने : 44
भारत विजयी : 16
द. आफ्रिका विजयी : 18
अनिर्णीत : 10
सामन्याचे ठिकाण : कोलकाता
वेळ : सकाळी 9.30 पासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टस् नेटवर्क
लाईव्ह स्ट्रीमिंग : जिओ हॉटस्टार
डिसेंबर 2012 : विरुद्ध इंग्लंड : भारत 7 गड्यांनी पराभूत : 5 दिवसात निकाल
नोव्हेंबर 2013 : विरुद्ध विंडीज : भारत 1 डाव, 51 धावांनी विजयी : 3 दिवसात निकाल
सप्टेंबर 2016 : विरुद्ध न्यूझीलंड : भारत 178 धावांनी विजयी : 4 दिवसात निकाल
नोव्हेंबर 2017 : विरुद्ध श्रीलंका : अनिर्णीत : पावसाच्या व्यत्ययासह 5 दिवस
नोव्हेंबर 2019 : बांगला देश : भारत 1 डाव, 46 धावांनी विजयी : 3 दिवसात निकाल