

पाकिस्तानी डाव सुरू असताना रोहितने गोलंदाजीत जे कल्पकतेने बदल केले ते लाजवाब होते. सौद शकीलसाठी 'डीआरएस' घेणे असो वा रिझवानची विकेट घेण्यासाठी बुमराहला मध्येच गोलंदाजीला आणणे असो, हे सगळे परिपक्व कर्णधाराची कल्पकता दर्शवतात. (IND vs PAK)
पहिली आठ षटके झाली तरी भारताला यश मिळत नव्हते. अशावेळी कर्णधार तीन षटकांनंतर गोलंदाजीत बदल करतो. कर्णधार रोहित शर्माने मोहम्मद सिराजवर विश्वास ठेवून त्याला सलग चौथे षटकही दिले अन् सिराजने शफीकला पायचित करून भारताला पहिले यश मिळवून दिले. याच सिराजने पुढच्या स्पेलमध्ये बाबरचा त्रिफळा उडवला आणि पाकिस्तानी संघाला गळती लागली.
कुलदीप यादवने सौद शकीलला पायचित केले. पंचांनी नाकारलेले अपील 'डीआरएस'मध्ये तिसर्या पंचांनी मान्य केले. याच षटकात कुलदीपने इफ्तिखार अहमदचा लेग साईडने त्रिफळा उडवला. या चेंडूने शेन वॉर्नने माईक गॅटिंगला टाकलेल्या त्या 'बॉल ऑफ सेंच्युरी'ची आठवण आली.
भारतासाठी धोकादायक ठरणार्या मोहम्मद रिझवानला जसप्रीत बुमराहने त्रिफळाचित केले. बुमराहचा हा चेंडू सरळ येणारा वाटला, पण तो ऑफकटर निघाला त्यामुळे रिझवान गोंधळला. पुढे खेळू की मागे खेळू, या द्विधा मन:स्थितीत त्याची दांडी गूल झाली. बुमराहचा हा चेंडू रिझवानच्या पुढील अनेक वर्षे लक्षात राहील. नंतर बुमराहने शादाब खानचाही त्रिफळा उडवला. (IND vs PAK)
मोटेराच्या पाटा विकेटवर गोलंदाजांना स्विंग मिळत नव्हता. त्यामुळे सुरुवातीला पाकिस्तान आरामात खेळत होते. पहिली विकेट पडल्यानंतर दुसर्या विकेटसाठीही भारतीय गोलंदाज तरसताना दिसले; पण हार्दिक पंड्याने भारताला दुसरे यश मिळवून देताना इमामला बाद केले. त्याने बाबर आणि इमाम-उल-हकची बहरत जाणारी जोडी फोडली. त्यानंतर मोहम्मद नवाजलाही बाद केले.
आघाडीच्या गोलंदाजांनी पाकिस्तानची फलंदाजी फळी मोडून काढली होती. त्यामुळे जडेजाला या सामन्यात करण्यासारखे काहीच नसले, तरी त्याने शेवटचे दोन फलंदाज बाद करून शेपूट वळवळणार नाही, याची काळजी घेतली.
या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्याच सामन्यात शून्यावर बाद झालेल्या रोहित शर्माने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात फॉर्मात आल्याचे दाखवून दिले. तोच फॉर्म कायम ठेवताना त्याने पाकिस्तानी गोलंदाजांचाही समाचार घेतला. त्याने 86 धावांच्या खेळीत 6 चौकार आणि 6 षटकार ठोकताना पाक गोलंदाजांच्या फुग्यातील हवा काढून घेतली.
संघातील निवडीवरून टीकेची झोड उठवण्यात आलेल्या श्रेयस अय्यरने या महत्त्वाच्या सामन्यात अर्धशतकी खेळी करून टीकाकारांना गप्प केले. रोहित एका बाजूने फटकेबाजी करीत असताना गिल (16) आणि विराट (16) हे लवकर बाद झाले. लक्ष्य छोटे असले, तरी रोहितला दुसर्या बाजूने टेकू देणे गरजेचे होते. ते काम श्रेयसने केले. त्याने अर्धशतक करताना चौथ्या क्रमांकावर आपण फिट असल्याचे दाखवून दिले.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली नेहमीच 'मॅच विनर' राहिला आहे. 'चेसमास्टर' समजला जाणारा विराट यावेळी मात्र फलंदाजीत अपयशी ठरला. पाकिस्तानचा डाव सुरू असताना तो रोहित शर्माशी सतत संवाद साधत होता. रोहितला तो क्षेत्ररक्षण लावण्याबरोबरच बॉलिंग चेंजमध्येही सल्ला देत होता. तो सतत गोलंदाजांशीहीबोलत होता, त्यांना टप्पा कोठे टाकायचा याचे मार्गदर्शन करीत होता. तो स्वत: चपळ फिल्डिंग तर करीत होताच; पण सहकार्यांनाही चिअरअप करीत होता. (IND vs PAK)