विराट कोहली सर्वात संथ! 9000 धावांसाठी खेळले 197 डाव

Virat Kohli 9000 Runs : भारताचा चौथा फलंदाज ठरला
Virat Kohli 9000 Runs
Virat Kohli 9000 Runs : विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये 9 हजार धावा पूर्ण केल्याFilr Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Virat Kohli 9000 Runs : भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये 9 हजार धावा पूर्ण केल्या. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावून त्याने हा नवा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने दुसऱ्या डावात 53वी धावा करताना हा आकडा गाठला.

कसोटीत 9,000 कसोटी धावा करणारा कोहली हा भारताचा चौथा फलंदाज ठरला आहे. या यादीत सचिन तेंडुलकर (15,921) अव्वल स्थानी आहे. त्यानंतर राहुल द्रविड (13,265) आणि सुनील गावस्कर (10,122) यांचा क्रमांक लागतो. जगातील सक्रिय खेळाडूंपैकी फक्त इंग्लंडचा जो रूट (12,716) आणि ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ (9,685) यांनी कोहलीपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. कोहलीने ही कामगिरी 197 व्या डावात केली. तसेच तो कसोटीत नऊ हजार किंवा त्याहून अधिक धावा करणारा जगातील 18वा फलंदाज ठरला आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीपूर्वी कोहलीला 9 हजार धावांचा आकडा गाठण्यासाठी 53 धावांची गरज होती. पहिल्या डावात तो खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र दुसऱ्या डावात त्याने सावध सुरुवात केली आणि 15व्या चेंडूवर पहिली धाव घेतली. त्याने आपले अर्धशतक 70 चेंडूत पूर्ण केले. याआधी विराट कोहलीने 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अर्धशतक झळकावले होते.

कोहली सर्वात संथ

कोहलीने आपल्या कसोटी कारकिर्दीत 116 सामन्यांच्या 197व्या डावात 9000 कसोटी धावांचा आकडा गाठला आहे. त्याने भारतीय फलंदाजांमध्ये सर्वाधिक डावात धावांचा हा टप्पा पार केला आहे. भारतीय खेळाडूंमध्ये द्रविडने सर्वात कमी 176 डावांमध्ये ही कामगिरी केली होती. तेंडुलकरने 179 डावांमध्ये तर गावस्कर यांनी 192 डावांमध्ये 9,000 कसोटी धावा पूर्ण केल्या.

कोहलीच्या किवींविरुद्ध 900 धावा

कोहलीने न्यूझीलंडविरुद्ध 900 धावा पूर्ण केल्या. या संघाविरुद्ध 900 हून अधिक धावा करणारा तो केवळ तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. द्रविड आणि तेंडुलकर यांनी किवी संघाविरुद्ध अनुक्रमे 1,659 आणि 1,595 धावा केल्या आहेत. कोहली आता न्यूझीलंड-भारत कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा पाचवा खेळाडू आहे. त्याच्या पुढे न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅक्युलम (1,224) आणि ग्रॅहम डॉलिंग (964) आहेत.

कोहलीची कसोटी कारकीर्द

कोहलीने 2011 मध्ये कसोटी कारकिर्दीला सुरुवात केली. आतापर्यंतच्या कसोटी कारकिर्दीत त्याने 116 सामन्यांच्या 197 डावांमध्ये सुमारे 50 च्या उत्कृष्ट सरासरीने 9,000 हून अधिक धावा केल्या आहेत. दरम्यान, त्याने 29 शतके आणि 31 अर्धशतके फटकावली आहेत. कर्णधार म्हणून त्याने 68 कसोटी सामन्यांच्या 113 डावांमध्ये 54.80 च्या सरासरीने 5,864 धावा केल्या आहेत. या काळात त्याने 20 शतके आणि 18 अर्धशतके केली आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news