

नागपूर : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-२० मालिकेचा थरार बुधवारपासून (२१ जानेवारी) सुरू होत आहे. नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदानावर होणाऱ्या या पहिल्या सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्या नावावर एका ऐतिहासिक विक्रमाची नोंद होणार आहे. या सामन्यासाठी टॉसला मैदानात उतरताच सूर्या आपल्या आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीतील शतकी सामना खेळेल. यासह १०० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तो भारताचा चौथा खेळाडू ठरणार आहे.
भारतासाठी सर्वाधिक टी-२० सामने खेळण्याचा विक्रम माजी कर्णधार रोहित शर्माच्या नावावर आहे; त्याने १५९ सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. या यादीत विराट कोहली १२५ सामन्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. अष्टपैलू हार्दिक पंड्या १२४ सामन्यांसह तिसऱ्या स्थानी असून, उद्याच्या सामन्यात तो विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची शक्यता आहे. आता या दिग्गजांच्या मांदियाळीत सूर्यकुमार यादवचे नाव जोडले जाणार असून, १०० सामन्यांचा टप्पा गाठणारा तो चौथा भारतीय ठरेल.
केवळ सामन्यांचे शतकच नव्हे, तर सूर्यकुमारला या मालिकेत षटकारांचा एक मोठा टप्पा गाठण्याची संधी आहे. सूर्याने आतापर्यंत ३४६ टी-२० सामन्यांच्या ३२० डावांत ३९५ षटकार ठोकले आहेत. या मालिकेत त्याने आणखी ५ षटकार लगावल्यास, टी-२० क्रिकेटमध्ये ४०० षटकारांचा टप्पा ओलांडणारा तो तिसरा भारतीय फलंदाज ठरेल. सध्या या यादीत रोहित शर्मा (५४७ षटकार) अग्रस्थानी, तर विराट कोहली (४३५ षटकार) दुसऱ्या स्थानावर आहे.
वैयक्तिक विक्रम समोर असले तरी, सूर्यकुमार यादव सध्या धावांसाठी झगडताना दिसत आहे. २०२५ हे वर्ष त्याच्यासाठी निराशाजनक ठरले. गेल्या वर्षी खेळलेल्या २१ टी-२० सामन्यांत त्याला केवळ १३.६२ च्या सरासरीने २१८ धावा करता आल्या. विशेष म्हणजे, संपूर्ण वर्षात त्याला एकही अर्धशतक किंवा शतक झळकावता आले नाही. आगामी टी-२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर, कर्णधार सूर्याला या मालिकेद्वारे आपला जुना 'फॉर्म' परत मिळवून मोठ्या खेळी करण्याचे आव्हान असेल.