
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना आज इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. मालिकेतील १-१ अशा बरोबरीनंतर, आजचा सामना उभय संघांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवत न्यूझीलंडला सुरुवातीलाच धक्के दिले.
भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडच्या वरच्या फळीला खिंडार पाडले असले, तरी डॅरिल मिचेलने मात्र आपला 'जबरा फॉर्म' कायम राखत टीम इंडियाच्या अडचणी वाढवल्या आहेत. २१ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर एक नजाकतदार चौकार खेचत मिचेलने आपले अर्धशतक पूर्ण केले.
फिरकीपटू कुलदीप यादवने २१ व्या षटकाचा शेवटचा चेंडू ८७.३ किमी वेगाने टाकला, मात्र त्याचा टप्पा चुकला. लेगब्रेकच्या प्रयत्नात चेंडू थेट मिचेलच्या पॅड्सवर पडला. मिचेलने या संधीचा पुरेपूर फायदा घेत चेंडूला अत्यंत हलक्या हाताने 'ग्लान्स' केले. शॉट इतका अचूक होता की शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाला त्याला रोखण्याची साधी संधीही मिळाली नाही.
या चौकारासह मिचेलने या मालिकेतील आपले सातत्य पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. एका बाजूने गडी बाद होत असताना मिचेलने खिंड लढवत आपले अर्धशतक झळकावले. न्यूझीलंडला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्यासाठी मिचेल सध्या भारतीय फिरकीपटूंसाठी सर्वात मोठे आव्हान ठरत आहे. आता कुलदीप किंवा जडेजा या 'मिस्टर कन्सिस्टंट'ला लवकर बाद करून भारताला पुनरागमन करून देतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
किवी फलंदाज डॅरिल मिचेल आणि विल यंग यांची जोडी जमतेय असे वाटत असतानाच, हर्षित राणा आणि रवींद्र जडेजाने मिळून न्यूझीलंडला तिसरा मोठा धक्का दिला. सेट झालेल्या विल यंगला (३० धावा) बाद करून भारताने ही महत्त्वाची भागीदारी तोडण्यात यश मिळवले आहे.
१३ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर हर्षितने ऑफ-स्टंपच्या बराच बाहेर 'शॉर्ट पिच' चेंडू टाकला. विल यंगने त्यावर जोरदार 'कट' मारला. चेंडू हवेत होता आणि बॅकवर्ड पॉईंटला उभ्या असलेल्या रवींद्र जडेजाच्या आवाक्यात होता. जडेजाने आपल्या उजव्या बाजूला विजेच्या वेगाने डाईव्ह मारली आणि एक कठीण झेल दोन्ही हातांनी अलगद टिपला. हा झेल इतका वेगवान होता की दुसऱ्या कोणत्याही क्षेत्ररक्षकाला तो टिपणे अशक्य झाले असते, पण जडेजाने ते पुन्हा एकदा सहज करून दाखवले.
विल यंग ३० धावांवर खेळत असताना बाद झाला. त्याने आपल्या खेळीत ५ चौकार आणि १ षटकार लगावत भारतीय गोलंदाजांना सतावण्यास सुरुवात केली होती. मात्र, हर्षित राणाच्या हुशारीने आणि जडेजाच्या चपळाईने न्यूझीलंडचा जम बसू पाहणारा डाव पुन्हा एकदा विखुरला आहे. या विकेटसह हर्षित राणाने सामन्यातील आपला दुसरा बळी टिपला.
अर्शदीप सिंगने दिलेल्या धक्क्यानंतर युवा वेगवान गोलंदाज हर्षित राणाने सामन्याच्या दुस-याच षटकात न्यूझीलंडला दुसरा मोठा झटका दिला. हर्षितने डेव्हन कॉनवेला अवघ्या ५ धावांवर बाद करत भारताला स्वप्नवत सुरुवात करून दिली. विशेष म्हणजे, या संपूर्ण मालिकेत हर्षितने तिन्ही सामन्यांत कॉनवेला बाद करण्याची किमया साधली आहे.
दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर (१.१ ओव्हर) हर्षितने 'बॅक ऑफ लेंथ' टप्प्यावर चेंडू टाकला. हा चेंडू ऑफ-स्टंपच्या रेषेतून किंचित सरळ राहिला. चेंडू सोडावा की खेळावा, या संभ्रमात कॉनवेने अर्धवट मनाने बॅट पुढे केली. चेंडूने बॅटच्या खांद्याचा वेध घेतला आणि तो थेट पहिल्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माच्या हातात स्थिरावला.
३-० या मालिकेत हर्षित राणा हा कॉनवेसाठी 'काळ' ठरला आहे. तिन्ही सामन्यांत एकाच गोलंदाजाकडून बाद होण्याची नामुष्की कॉनवेवर ओढवली. अवघ्या दोन षटकांत दोन्ही सलामीवीर बाद झाल्यामुळे न्यूझीलंडचा संघ बॅकफूटवर गेला. भारतीय गोलंदाजांनी सामन्यावर आपली पकड घट्ट केली आहे.
इंदूरच्या मैदानावर सामना सुरू होऊन अवघी काही सेकंद उलटली असतानाच, भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने न्यूझीलंडला असा काही धक्का दिला की किवी संघाचे पाय लटपटू लागले आहेत. डावातील पहिल्याच षटकाच्या चौथ्या चेंडूवर अर्शदीपने सलामीवीर हेन्री निकोल्सचा त्रिफळा उडवून त्याला 'गोल्डन डक'वर माघारी धाडले.
अर्शदीपने टाकलेला तो चेंडू 'गुड लेंथ'वर पडून किंचित बाहेरच्या बाजूला वळत होता. चेंडूचा टप्पा आणि दिशा पाहून निकोल्स पूर्णपणे संभ्रमात पडला. चेंडू खेळावा की सोडावा, या द्विधा मनस्थितीत त्याने शेवटच्या क्षणी बॅट मागे घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता. चेंडू त्याच्या बॅटची आतील कडा घेऊन थेट स्टंपवर आदळला.
पहिल्याच चेंडूवर बाद झाल्याने निकोल्सला काय झाले हे समजायच्या आतच अर्शदीपने आपल्या खास शैलीत जल्लोष साजरा केला. या विकेटमुळे भारताने सामन्याच्या सुरुवातीलाच आपले वर्चस्व निर्माण केले असून इंदूरच्या मैदानात न्यूझीलंडची दाणादाण उडवली आहे.
भारतीय संघ : रोहित शर्मा, शुभमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, आयुष बदोनी, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल.
न्यूझीलंड संघ : डेव्हन कॉनवे, हेन्री निकोल्स, विल यंग, डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, मिचेल हे (यष्टीरक्षक), मायकेल ब्रेसवेल (कर्णधार), झाकरी फाउल्क्स, क्रिस्टियन क्लार्क, काइल जेमिसन, जेडेन लेनॉक्स, निक केली, आदित्य अशोक, जोश क्लार्कसन, मायकेल रे.
निर्णायक सामन्यासाठी इंदूर हे भारतासाठी अत्यंत सकारात्मक ठिकाण मानले जाते. या मैदानावर भारताने आतापर्यंत खेळलेले सर्व ७ एकदिवसीय सामने जिंकले असून आपला अपराजित विक्रम कायम राखला आहे. आजच्या सामन्यात भारतीय फिरकीपटूंना विशेषतः कुलदीप यादवला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करून मिचेल आणि ब्रेसवेलसारख्या आक्रमक फलंदाजांना रोखण्याचे मोठे आव्हान असेल.
या मालिकेची सुरुवात वडोदरा येथील पहिल्या सामन्यात भारताच्या विजयाने झाली होती. विराट कोहलीच्या शानदार ९३ धावांच्या जोडीला सांघिक कामगिरीच्या जोरावर भारताने ३०१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग एका षटकाचा खेळ शिल्लक असताना यशस्वीपणे पूर्ण केला होता. मात्र, राजकोटमध्ये झालेल्या दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने जोरदार पुनरागमन केले. डॅरिल मिचेलने ११७ चेंडूंत नाबाद १३१ धावांची वादळी खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला आणि मालिकेत बरोबरी साधली.
भारतीय वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा यांनी उत्कृष्ट ताळमेळ राखत न्यूझीलंडच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. पहिल्या दोन सामन्यांत संधी न मिळालेल्या अर्शदीप सिंगने पुनरागमन करताच आपल्या पहिल्याच षटकात हेन्री निकोल्सला शून्यावर बाद करून भारताला मोठे यश मिळवून दिले. दुसऱ्या बाजूने हर्षित राणाने डेव्हन कॉनवेला (५) स्वस्तात बाद करत किवी संघाला बॅकफूटवर ढकलले. हर्षितने त्यानंतर धोकादायक ठरू शकणारी डॅरिल मिचेल आणि विल यंग (३०) यांची जोडी फोडून भारताला सामन्यात वरचढ स्थान मिळवून दिले. मोहम्मद सिराजने या जोडीला साथ देत दबावाची रणनीती कायम ठेवली.