

पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने इतिहास रचला. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात किंग कोहली आपला 300 वा एकदिवसीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला. यासह, त्याने मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीच्या खास क्लबमध्ये प्रवेश केला.
कोहली हा त्याच्या कारकिर्दीत 300 एकदिवसीय सामन्यांचा टप्पा ओलांडणारा सातवा भारतीय आणि जगातील 22 वा खेळाडू बनला आहे. मात्र, कोहलीला या सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. शुभमन गिल बाद झाल्यानंतर तो मैदानावर उतरला. पण तो फक्त 11 धावांवर मॅट हेन्रीचा बळी ठरला. त्याने 7 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर ऑफ साईडवर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण तिथे क्षेत्ररक्षण करणाऱ्या ग्लेन फिलिप्सने हवेत झेपावत अवघ्या 0.69 सेकंदात सर्वोत्तम झेल पकडला.
जर आपण क्रिकेट इतिहासात सर्वाधिक एकदिवसीय सामने कोणत्या खेळाडूने खेळले आहेत याबद्दल बोललो तर हा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने त्याच्या दीर्घ कारकिर्दीत एकूण 463 एकदिवसीय सामने खेळले आहेत. तर, श्रीलंकेचा महेला जयवर्धने दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने एकूण 448 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या यादीत तिसऱ्या स्थानावर श्रीलंकेचा सनथ जयसूर्या आहे ज्याने 445 एकदिवसीय सामने खेळले आहेत.
सचिन तेंडुलकर : 463
महेंद्रसिंग धोनी : 347
राहुल द्रविड : 340
मोहम्मद अझरुद्दीन : 334
सौरव गांगुली: 308
युवराज सिंग : 301
विराट कोहली : 300