

IND vs NZ Big blow to Team India Rishabh Pant ruled out of ODI series against New Zealand
बडोदा : न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा तडाखा बसला आहे. धडाकेबाज यष्टिरक्षक-फलंदाज रिषभ पंत सरावादरम्यान झालेल्या गंभीर दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर पडला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रविवारी (दि. ११) पंतच्या जागी युवा खेळाडू ध्रुव जुरेलचा संघात समावेश केल्याची घोषणा करण्यात आली.
शनिवारी (दि. १०) दुपारी बडोद्याच्या बीसीए (BCA) स्टेडियमवर सराव करत असताना थ्रोडाऊन स्पेशालिस्टचा सामना करताना पंतच्या कमरेच्या वरच्या भागात चेंडू लागला. चेंडू लागताच पंत वेदनेने विव्हळताना दिसला. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि वैद्यकीय पथकाने तातडीने धाव घेत त्याला मैदानाबाहेर नेले.
बीसीसीआयने जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, ''शनिवारी सराव करताना ऋषभ पंतच्या उजव्या बाजूच्या पोटाच्या स्नायूंमध्ये अचानक तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्यानंतर तातडीने त्याचे एमआरआय (MRI) स्कॅन करण्यात आले. वैद्यकीय पथकाने दिलेल्या अहवालानुसार, पंतला 'साईड स्ट्रेन' (Oblique Muscle Tear) म्हणजेच पोटाचे स्नायू फाटल्याची दुखापत झाली असून तो या मालिकेला मुकणार आहे.''
पंतच्या अनुपस्थितीत ध्रुव जुरेलला भारतीय संघात पाचारण करण्यात आले आहे. जुरेलने अलीकडेच विजय हजारे ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेशकडून खेळताना सात सामन्यांत ९० पेक्षा जास्त सरासरीने ५५८ धावा कुटल्या होत्या. या शानदार कामगिरीचे फळ म्हणून त्याला ही संधी मिळाली आहे.
ऋषभ पंतची कारकीर्द गेल्या काही काळापासून दुखापतींच्या सावटाखाली आहे. २०२२ मधील भीषण कार अपघातानंतर तो दीर्घकाळ क्रिकेटपासून दूर होता. त्यानंतर गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्ध खेळताना त्याच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. ऑगस्ट २०२४ मध्ये श्रीलंकेविरुद्ध त्याने आपला शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. निवड समितीने त्याच्यावर विश्वास दाखवून या मालिकेत पुनरागमन करण्याची संधी दिली होती, मात्र दुखापतीने पुन्हा एकदा त्याचा रस्ता रोखला आहे.
शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा, कुलदीप यादव, नितीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल.