IND vs NZ 4th ODI : रोहित शर्माचा नवा सलामीचा जोडीदार कोण? 'हिटमॅन'सोबत ऋतुराज की इशान; टीम इंडियात मोठे फेरबदल

टीम इंडियाची धुरा आता श्रेयस अय्यरच्या खांद्यावर; गिल-राहुलच्या एक्झिटमुळे 'प्लेइंग इलेव्हन'चे समीकरण बदलले
ind vs nz 4th odi match rohit sharma may Possibility of obtaining new opening partner
Published on: 
Updated on: 

वेलिंगटन : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा याला आता एक नवा सलामीचा जोडीदार मिळणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना येत्या १३ नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार असून, या लढतीत भारतीय संघाच्या अंतिम अकरा खेळाडूंमध्ये (प्लेइंग इलेव्हन) मोठ्या प्रमाणात बदल पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे, नियमित कर्णधार शुभमन गिल आणि अनुभवी फलंदाज के. एल. राहुल हे दोघेही या महत्त्वाच्या सामन्यातून बाहेर असतील.

श्रेयस अय्यरकडे नेतृत्वाची धुरा

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चौथा एकदिवसीय सामना शुक्रवारी पार पडणार आहे. मालिकेतील उर्वरित दोन्ही सामन्यांना शुभमन गिल आणि के. एल. राहुल मुकणार असल्याची घोषणा यापूर्वीच करण्यात आली होती.

एकदिवसीय मालिकेनंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार असून, त्याच्या पूर्वतयारीसाठी गिल आणि राहुल रवाना झाले आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आली आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची श्रेयस अय्यरची ही पहिलीच वेळ असेल. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात कोण करणार, असा प्रश्न क्रीडावर्तुळात उपस्थित केला जात आहे.

सलामीसाठी ऋतुराज-इशान पर्याय

शुभमन गिलच्या गैरहजेरीत भारतीय संघ व्यवस्थापनाकडे सलामीच्या जागेसाठी ऋतुराज गायकवाड आणि इशान किशन हे दोन सक्षम पर्याय उपलब्ध आहेत. मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांसाठी इशान किशनची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली असल्याने, त्याचे अंतिम अकरा खेळाडूंमधील स्थान जवळपास निश्चित मानले जात आहे. दुसरीकडे, रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करण्याची संधी ऋतुराज गायकवाडला मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. गायकवाडने आतापर्यंत फारसे एकदिवसीय सामने खेळलेले नसले, तरी मिळालेल्या प्रत्येक संधीचे त्याने सोने करत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. जर इशान किशनने सलामीला फलंदाजी केली नाही, तर मधल्या फळीत के. एल. राहुलच्या जागी त्याची वर्णी लावली जाऊ शकते.

संपूर्ण भारतीय संघ: रोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, श्रेयस अय्यर (कर्णधार), अक्षर पटेल, इशान किशन (यष्टीरक्षक), नमन धीर, औकिब नबी, गुरनूर ब्रार, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, तिलक वर्मा, कुलदीप यादव, कुमार कुशाग्र आणि यश ठाकूर.

संपूर्ण न्यूझीलंड संघ: विल यंग, फिन ॲलन, निक केली, टिम सायफर्ट (यष्टीरक्षक), डीन फॉक्सक्रॉफ्ट, मिचेल सँटनर (कर्णधार), काईल जेमिसन, क्रिस्टियन क्लार्क, जेकब डफी, मॅथ्यू फिशर, मॅट हेन्री, मायकेल ब्रेसवेल, मिचेल हे आणि ब्रेट रँडेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.