

इंदूर : न्यूझीलंडचा मधल्या फळीतील स्टार फलंदाज डॅरिल मिचेलने रविवारी (दि. १८) क्रिकेटच्या इतिहासपुस्तकात सुवर्ण अक्षरांनी आपले नाव कोरले. भारतीय भूमीवर भारतासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध सलग पाच एकदिवसीय सामन्यांत ५० हून अधिक धावांचा टप्पा ओलांडणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.
आयसीसी एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर विराजमान असलेल्या ३४ वर्षीय मिचेलने इंदूरच्या होळकर स्टेडियमवर सुरू असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात हा भीमपराक्रम केला. हॅमिल्टनच्या या उजव्या हाताच्या फलंदाजाने आपल्या प्रगल्भ फलंदाजीने भारतीय गोलंदाजांसमोर तगडे आव्हान उभे केले.
या तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडसाठी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मिचेलने २१ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कुलदीप यादवला चौकार मारून आपले अर्धशतक पूर्ण केले. या अर्धशतकासह त्याने भारताविरुद्ध सलग पाच सामन्यांत पन्नास किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा विक्रम प्रस्थापित केला.
डॅरिल मिचेलने भारतीय भूमीवर भारताविरुद्ध सलग ५ वेळा हा टप्पा ओलांडून केन विल्यमसनच्या २०१४ मधील विक्रमाची बरोबरी केली आहे आणि भारतीय मैदानांवरील असा विक्रम करणारा तो एकमेव फलंदाज ठरला आहे. भारताविरुद्ध सलग सर्वाधिक वेळा ५० हून अधिक धावा करणाऱ्या किवी फलंदाजांची यादी खालीलप्रमाणे आहे.
डॅरिल मिचेल : ५ (२०२५-२६)
केन विल्यमसन : ५ (२०१४)
ग्लेन टर्नर : ३ (१९७५-७६)
स्टीफन फ्लेमिंग : ३ (१९९४-९५)
रॉजर टूज : ३ (१९९९)
रॉस टेलर : ३ (२०१९-२०)