

मुंबई : भारतीय क्रिकेट संघ २०२६ मधील पहिला खेळत आहे. सध्या न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर आहे. उभय संघांतील एकदिवसीय मालिका सध्या रंगतदार स्थितीत पोहोचली आहे. पहिल्या दोन सामन्यांनंतर मालिका १-१ अशी बरोबरीत असून, आता तिसरा आणि निर्णायक सामना भारतीय कर्णधार शुभमन गिलसाठी मोठी कसोटी ठरणार आहे. भारतीय भूमीवर न्यूझीलंडने आजवर कधीही एकदिवसीय मालिका जिंकलेली नाही; हा इतिहास कायम राखून गिल आपली आणि टीम इंडियाची प्रतिष्ठा जपणार की न्यूझीलंड नवा इतिहास रचणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने दमदार विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले होते. मात्र, दुसऱ्या सामन्यात चित्र पालटले. या सामन्यात केएल राहुलने झुंजार शतक झळकावले खरे, पण इतर फलंदाजांनी साथ न दिल्याने भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. दुसरीकडे, न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेलने शानदार शतक आणि विल यंगने दमदार फलंदाजी करत भारताकडून विजय हिसकावून घेतला.
न्यूझीलंडच्या क्रिकेट इतिहासात त्यांना एकदाही भारताला भारताच्याच भूमीत एकदिवसीय मालिकेत हरवता आलेले नाही. भारताचा हा 'अभेद्य गड' सर करणे न्यूझीलंडसाठी नेहमीच कठीण राहिले आहे. मात्र, यंदाच्या मालिकेसाठी न्यूझीलंडने आपला सर्वात बलाढ्य संघ पाठवलेला नसतानाही त्यांनी मालिका बरोबरीत आणली आहे, ही भारतीय संघासाठी नक्कीच चिंतेची बाब आहे. अशा स्थितीत युवा कर्णधार शुभमन गिलसमोर विजयाची परंपरा कायम राखण्याचे मोठे आव्हान आहे.
निर्णायक तिसरा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियमवर रंगणार आहे. भारतीय संघासाठी हे मैदान अत्यंत नशीबवान मानले जाते, कारण भारताने या स्टेडियमवर आतापर्यंत एकही एकदिवसीय सामना गमावलेला नाही. ही आकडेवारी गिलला मानसिक दिलासा देणारी असली, तरी मैदानात प्रत्यक्ष कामगिरी करणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विजयाची हॅट्ट्रिक साधण्यासाठी भारतीय फलंदाजांना धावांचा डोंगर उभा करावा लागेल आणि गोलंदाजांना न्यूझीलंडचे गडी लवकर बाद करावे लागतील. इंदूरच्या रणधुमाळीत टीम इंडिया विजयाचा झेंडा फडकवून मालिका खिशात घालते का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.