

टी-२० विश्वचषक २०२६ च्या रणांगणात भारतीय वाघांनी आपल्या डरकाळीने नामिबियाच्या आव्हानाला अक्षरशः पालापाचोळ्यासारखे उडवून लावले. इशान किशनची वादळी फलंदाजी, हार्दिक पंड्याचा अष्टपैलू तडाखा आणि वरुण चक्रवर्तीच्या फिरकीचे जाळे यांच्या जोरावर भारताने नामिबियावर ९३ धावांनी दणदणीत विजय मिळवला. २०९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नामिबियाचा डाव १८.२ षटकांत अवघ्या ११६ धावांत कोसळला.
नामिबियाने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीचे आमंत्रण दिले, पण हा निर्णय त्यांच्यावरच उलटला. सलामीवीर इशान किशनने (६१ धावा, २४ चेंडू) दिल्लीच्या मैदानात चौकार-षटकारांची आतषबाजी केली. त्याने आपल्या खेळीत ६ चौकार आणि ५ उत्तुंग षटकार खेचत नामिबियाच्या गोलंदाजीची पिसं काढली.
मधल्याफळीत कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा स्वस्तात बाद झाले तरी, हार्दिक पंड्याने (५२ धावा, २८ चेंडू) 'कुंग-फू' स्टाईलने फटकेबाजी करत डावाची सूत्रे हाती घेतली. हार्दिकने ४ चौकार आणि ४ षटकारांसह आपले अर्धशतक पूर्ण केले. शेवटच्या टप्प्यात शिवम दुबेच्या २३ धावांच्या जोरावर भारताने २० षटकांत ९ बाद २०९ धावांचा डोंगर उभा केला. नामिबियाचा कर्णधार गेरहार्ड इरास्मसने ४ बळी घेतले, पण तोपर्यंत भारताने विजयाची पायाभरणी केली होती.
२१० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना नामिबियाची सुरुवात खराब झाली. अर्शदीप सिंगने भारताला पहिले यश मिळवून दिले. मात्र, मधल्या षटकांत वरुण चक्रवर्तीने आपल्या फिरकीच्या जाळ्यात नामिबियाच्या फलंदाजांना असे काही गुंफले की त्यांना डोकं वर काढण्याची संधीच मिळाली नाही. वरुणने अवघ्या ७ धावा देऊन ३ महत्त्वाचे बळी टिपले.
अक्षर पटेलने दोन बळी घेत मधली फळी कापून काढली, तर जसप्रीत बुमराहने आपल्या भेदक माऱ्याने तळाच्या फलंदाजांची दाणादाण उडवली. अखेरच्या षटकांत हार्दिक पंड्याने २ बळी घेत नामिबियाच्या डावावर शिक्कामोर्तब केले. नामिबियाकडून लॉरेन स्टीनकॅम्प (२९) आणि जॅन फ्रिलिंक (२२) यांनी थोडा प्रतिकार केला, पण भारतीय आक्रमणासमोर त्यांचा निभाव लागला नाही.
भारत : २०९/९ (२० षटके) - इशान किशन ६१, हार्दिक पंड्या ५२, गेरहार्ड इरास्मस ४/२०.
नामिबिया : ११६/१० (१८.२ षटके) - लॉरेन २९, वरुण चक्रवर्ती ३/७, अर्शदीप ३/३६, हार्दिक २/१२.
नामिबियाचा कर्णधार गेरहार्ड इरास्मसने १९ व्या षटकात चकित करणारी गोलंदाजी करत भारतीय डावाला खिळ लावली. या एकाच षटकात त्याने ५० धावांवर खेळणाऱ्या हार्दिक पंड्यासह भारताचे तीन महत्त्वाचे गडी बाद केले. भारताने १९ व्या षटकाअखेर ७ बाद २०६ धावा केल्या आहेत.
हे षटक क्रिकेट चाहत्यांसाठी एखाद्या रोलर-कोस्टर राईडसारखे होते. प्रत्येक चेंडूवर नाट्य पाहायला मिळाले:
पहिली धाव (षटकार) : हार्दिक पंड्याने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचत आपले अर्धशतक पूर्ण केले.
दुसरा चेंडू (हार्दिक बाद) : पुढच्याच चेंडूवर इरास्मसने हार्दिकला (५२) बाद केले. सीमारेषेवर बदली खेळाडू डायलन लेइचरने एक उत्कृष्ट झेल टिपला.
तिसरा चेंडू (धावबाद) : फलंदाजीला आलेल्या रिंकू सिंगने शॉट मारला, पण धाव घेण्याच्या गोंधळात सेट झालेला शिवम दुबे (२३) धावबाद झाला.
चौथा व पाचवा चेंडू : इरास्मसने रिंकू सिंगला जखडून ठेवले आणि या चेंडूंत केवळ १ धाव दिली.
सहावा चेंडू (बोल्ड) : षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अक्षर पटेलला भोपळाही फोडू न देता इरास्मसने थेट त्रिफळाचीत केले.
कर्णधार गेरहार्ड इरास्मसने आपल्या ४ षटकांच्या कोट्यात केवळ २० धावा देऊन ४ महत्त्वपूर्ण बळी घेतले. विशेषतः १९ व्या षटकात ७ धावा देत ३ बळी (१ धावबादसह) घेतल्याने भारताची २२०+ धावांकडे जाणारी वाटचाल रोखली गेली.
नामिबियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय डावाच्या १९ व्या षटकात मोठ्या घडामोडी पाहायला मिळाल्या. हार्दिक पंड्याने शानदार अर्धशतक झळकावून भारताला मोठ्या धावसंख्येकडे नेले खरे, मात्र त्यानंतर नामिबियाचा कर्णधार गेरहार्ड इरास्मसने एकाच षटकात भारताचे दोन महत्त्वाचे फलंदाज बाद करून सामन्यात पुनरागमन केले.
१८ व्या षटकाची सुरुवात हार्दिक पंड्याने धमाकेदार केली. गेरहार्ड इरास्मसच्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचत हार्दिकने आपले अर्धशतक (५२ धावा, २८ चेंडू) पूर्ण केले. मात्र, पुढच्याच चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला.
अप्रतिम झेल: लेग स्टंपवर आलेल्या फुल टॉस चेंडूला हार्दिकने फ्लिक केले, पण बाउंड्रीवर बदली खेळाडू डायलन लेइचरने धावत जाऊन सीमारेषेच्या आत चेंडू हवेत उडवत एक अफलातून झेल टिपला.
हार्दिक बाद झाल्यानंतर रिंकू सिंग मैदानात आला. १८.३ षटकावर धाव घेण्याच्या वादातून शिवम दुबे (२३ धावा) धावबाद झाला. रिंकू सिंगने धाव घेण्यास नकार दिला होता, मात्र दुबे क्रीझच्या खूप बाहेर आल्याने तो धावबाद झाला.
भारतीय संघाचा उपकर्णधार हार्दिक पंड्या सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असून त्याने नामिबियाविरुद्धच्या सामन्यात आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. १६ व्या षटकात हार्दिकने बेन शिकोंगोच्या गोलंदाजीवर सलग एक षटकार आणि दोन चौकार मारत भारताचा धाववेग प्रचंड वाढवला. १६ षटकांच्या अखेरीस भारताने ४ बाद १८४ धावा केल्या असून संघ आता २२० धावांच्या पार जाण्याच्या तयारीत दिसत आहे.
१६ व्या षटकाची सुरुवात शिकोंगोने अत्यंत शिस्तबद्ध केली होती. पहिल्या तीन चेंडूंवर त्याने हार्दिक आणि दुबेला फक्त २ धावा दिल्या होत्या. मात्र, त्यानंतर हार्दिकने आपले 'रुद्र' रूप धारण केले:
१५.४ ओव्हर (षटकार): शिकोंगोने यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला पण चेंडू 'स्लॉट'मध्ये पडला. हार्दिकने क्रिजचा वापर करत चेंडू थेट सीमारेषेबाहेर भिरकावला.
१५.५ ओव्हर (चौकार): पुढच्याच चेंडूवर हार्दिकने 'लाँग-ऑफ'च्या दिशेने दमदार चौकार लगावला.
१५.६ ओव्हर (चौकार): षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हार्दिकने चेंडूला दिशा देत 'स्क्वेअर ऑफ द विकेट' चौकार वसूल केला.
सुरुवातीला इशान किशनने फटकेबाजी केल्यानंतर नामिबियाने काही झटपट बळी घेत भारताचा वेग रोखण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता हार्दिक पंड्या २० चेंडूत ४१ धावा आणि शिवम दुबे १० चेंडूत १४ धावा करून खेळत असून या दोघांनी भारतीय डावाला पुन्हा एकदा रुळावर आणले आहे. बेन शिकोंगोने आपल्या ३ षटकांत ४१ धावा दिल्या असून त्याला केवळ १ बळी मिळवता आला आहे.
मैदानावर हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांची जोडी जमली की धावांचा पाऊस पडणार हे निश्चित असते. याचाच प्रत्यय नुकताच आला, जेव्हा भारतीय फलंदाजांनी बर्नार्ड शोल्ट्झच्या एकाच षटकात तब्बल २४ धावा चोपून काढल्या. या फटकेबाजीमुळे १५ षटकांच्या अखेरीस भारताने ४ बाद १६८ धावांपर्यंत मजल मारली आहे.
बर्नार्ड शोल्ट्झसाठी हे षटक एखाद्या स्वप्नवत धक्क्यासारखे ठरले. षटकाची सुरुवातच खराब झाली:
सुरुवात वाईडने: शोल्ट्झने पहिला चेंडू स्वैर टाकला. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर शिवम दुबेने आपली ताकद दाखवत १०७ मीटरचा उत्तुंग षटकार खेचला.
दडपणाखाली गोलंदाजी: दडपणाखाली आलेल्या शोल्ट्झने पुन्हा एक चेंडू लेग स्टंपच्या खूप बाहेर टाकला, जो थेट सीमारेषेबाहेर गेल्याने भारताला ५ वाईड धावा मिळाल्या.
हार्दिकचा तडाखा: दुबेने स्ट्राईक बदलल्यानंतर हार्दिक पंड्याने सूत्रे हाती घेतली. त्याने शोल्ट्झला १०९ मीटर लांब षटकार आणि त्यानंतर एक सुरेख चौकार लगावत गोलंदाजीची पिसं काढली.
१५ षटकांच्या समाप्तीनंतर हार्दिक पंड्या १५ चेंडूत २६ धावांवर तर शिवम दुबे ९ चेंडूत १३ धावांवर खेळत आहे. शोल्ट्झने आपल्या ४ षटकांच्या कोट्यात ४१ धावा देऊन १ बळी मिळवला, मात्र त्याच्या शेवटच्या षटकाने भारताला मोठी धावसंख्या उभारण्यास मदत केली.
सुरुवातीच्या झंझावातानंतर नामिबियाच्या फिरकीपटूंनी भारतीय फलंदाजांना चांगलाच लगाम घातला आहे. कर्णधार गेरहार्ड इरास्मसने अप्रतिम गोलंदाजी करत भारताला तिसरा धक्का दिला असून स्थिरावलेल्या तिलक वर्माला माघारी धाडले आहे.
तिलक वर्माने २१ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने २५ धावा केल्या. इरास्मसने टाकलेल्या फ्लाईटेड चेंडूवर पुढे येऊन मोठा फटका मारण्याचा तिलकचा प्रयत्न फसला. चेंडूला अपेक्षित उंची न मिळाल्याने लाँग-ऑफवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या जे.जे. स्मिटने धावत जाऊन एक सुरेख झेल टिपला.
इरास्मसचा दुसरा बळी : नामिबियाच्या कर्णधाराने आपल्या फिरकीने भारताच्या दोन्ही डावखुऱ्या फलंदाजांना (ईशान किशन आणि तिलक वर्मा) बाद करून सामन्यात पुनरागमन केले आहे.
चेंडू टाकण्याची वेगळी शैली : याही वेळी इरास्मसने पंचांच्या अगदी समोरून (सुमारे २५ यार्डावरून) गोलंदाजी करत फलंदाजाला चकवले.
दुबेचे आगमन : तिलक वर्मा बाद झाल्यानंतर अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे मैदानात आला आहे.
१० व्या षटकापर्यंत धावांचा पाऊस पाडणाऱ्या भारतीय संघाला ११ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मोठा धक्का बसला आहे. भारताचा कर्णधार आणि स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव अवघ्या १२ धावा करून बाद झाला आहे.
नामिबियाचा अनुभवी गोलंदाज बर्नार्ड शोल्ट्झने आपल्या फिरकीच्या जाळ्यात सूर्याला अडकवले. सूर्यकुमारने पुढे येऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, मात्र शोल्ट्झने चेंडूची लांबी हुशारीने कमी केली. चेंडूने चकवा दिल्याने यष्टीरक्षक झेन ग्रीनने कोणतीही चूक न करता सूर्याला यष्टीचीत केले.
पॉवरप्लेमध्ये वादळी फलंदाजी केल्यानंतर आता नामिबियाच्या फिरकीपटूंनी (इरास्मस आणि शोल्ट्झ) भारताला लागोपाठ दोन धक्के देत सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला आहे.
टी-२० विश्वचषकात नामिबियाविरुद्ध खेळताना भारताने १० षटकांच्या अखेरीस २ बाद १२० धावांपर्यंत मजल मारली. ईशान किशनच्या तुफानी खेळीनंतर आता सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी डावाची सूत्रे हाती घेतली.
या सामन्यात ईशान किशनने केवळ २० चेंडूत अर्धशतक झळकावून एक नवा टप्पा गाठला आहे. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात भारतासाठी सर्वात वेगवान अर्धशतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत ईशानने युवराज सिंग आणि रोहित शर्मा यांच्या पंगतीत स्थान मिळवले आहे.
ईशान किशनचा पराक्रम : ईशानने २० चेंडूत केलेले अर्धशतक हे टी-२० विश्वचषकातील भारताचे संयुक्तपणे चौथे वेगवान अर्धशतक ठरले आहे.
सूर्याची फटकेबाजी : १० व्या षटकात सूर्यकुमार यादवने आपला ट्रेडमार्क 'लॅप स्वीप' शॉट मारत गेरहार्ड इरास्मसला षटकार ठोकला. १० षटकांच्या अखेरीस सूर्या १२ धावांवर तर तिलक २३ धावांवर खेळत आहेत.
नामिबियाचा प्रतिकार : कर्णधार गेरहार्ड इरास्मसने आपल्या दोन षटकांत केवळ ११ धावा देऊन १ बळी मिळवत भारताच्या धावगतीवर काहीसा अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
नामिबियाविरुद्धच्या सामन्यात चौफेर फटकेबाजी करणाऱ्या ईशान किशनला बाद करण्यात अखेर नामिबियाला यश आले आहे. नामिबियाचा कर्णधार गेरहार्ड इरास्मसने आपल्या पहिल्याच चेंडूवर ईशानला बाद करत भारताची जम बसलेली जोडी फोडली.
विस्फोटक फलंदाजी करणाऱ्या ईशान किशनने अवघ्या २४ चेंडूत ६१ धावांची (६ चौकार, ५ षटकार) खेळी केली. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो डीप मिड-विकेटवर बेन शिकोंगोच्या हाती झेल देऊन बाद झाला.
इरास्मसचे भेदक षटक: कर्णधार इरास्मसने ८ व्या षटकात केवळ १ धाव देऊन १ बळी घेतला. या षटकामुळे भारताच्या धावगतीला थोडा लगाम बसला आहे.
सूर्याचे आगमन: ईशान बाद झाल्यानंतर 'मिस्टर ३६०' सूर्यकुमार यादव मैदानात आला असून त्याने आपले खाते उघडले आहे.
'डेड बॉल'चा वाद: या षटकात पंच रॉड टकर यांनी इरास्मसचा एक चेंडू 'डेड बॉल' घोषित केला, कारण तो अंपायरच्या खूप जवळून गोलंदाजी करत होता. यावरून इरास्मस आणि पंच यांच्यात थोडी चर्चाही रंगली.
विश्वविक्रमाकडे वाटचाल: ८ षटकांच्या अखेरीस भारताची धावसंख्या १०५/२ अशी आहे. २००७ मध्ये श्रीलंकेने केनियाविरुद्ध केलेल्या २६० धावांचा जागतिक विक्रम मोडीत काढण्याचे भारताचे लक्ष्य आहे.
तिलक वर्मा: २०* (१३ चेंडू)
सूर्यकुमार यादव: १* (३ चेंडू)
बाद फलंदाज: ईशान किशन (६१ धावा)
भारतीय फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडणे सुरूच ठेवले आहे. पॉवरप्लेनंतरही भारताची आक्रमक खेळी कायम असून ७ व्या षटकाच्या अखेरीस भारताने १ बाद १०४ धावा फलकावर लावल्या आहेत.
या षटकात पदार्पण करणाऱ्या मॅक्स हेंगोला भारतीय फलंदाजांनी लक्ष्य केले. हेंगोच्या पहिल्याच षटकात १८ धावा वसूल करण्यात आल्या. यासह भारताने ७ व्या षटकातच १०० धावांचा टप्पा ओलांडला आहे.
तिलक वर्माला जीवदान : ६.३ षटकात तिलक वर्माने मारलेला जोरदार फटका बॅकवर्ड पॉईंटला असलेल्या स्टिनकॅम्पने सोडला. या सोप्या झेलमुळे नामिबियाला मोठे नुकसान सोसावे लागू शकते.
ईशानची फटकेबाजी : अर्धशतक पूर्ण केल्यानंतरही ईशान किशन थांबलेला नाही. त्याने हेंगोच्या षटकात एक उत्तुंग षटकार आणि एक चौकार मारत आपली धावसंख्या २३ चेंडूत ६१ वर नेली आहे.
कोच गंभीरकडून दाद : ईशानच्या या स्फोटक खेळीवर प्रशिक्षक गौतम गंभीरने मैदानात येऊन त्याला दाद दिली.
आजच्या सामन्यात भारताने पॉवरप्लेमध्ये (६ षटके) ८६/१ धावा केल्या, ज्या भारताच्या इतिहासातील तिसऱ्या सर्वोच्च पॉवरप्ले धावा ठरल्या आहेत.
भारतीय यष्टिरक्षक फलंदाज ईशान किशनने आपल्या आक्रमक फलंदाजीने मैदानात चौफेर फटकेबाजी करत केवळ २० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. डावातील ६ व्या षटकात ईशानने नामिबियाच्या जे.जे. स्मिटची (JJ Smit) अक्षरशः पिसं काढली.
या षटकाच्या पहिल्या चेंडूवर धाव मिळाली नसली, तरी त्यानंतर ईशानने सलग ४ षटकार आणि १ चौकार ठोकत एकूण २८ धावा वसूल केल्या. या धमाकेदार कामगिरीसह पॉवरप्लेच्या अखेरीस भारताने १ बाद ८६ धावांपर्यंत मजल मारली आहे.
५.१: निर्धाव चेंडू
५.२: षटकार (लेग साइडला उत्तुंग फटका)
५.३: षटकार (९२ मीटर लांब फटका)
५.४: षटकार (लॉन्ग-ऑनच्या दिशेने)
५.५: षटकार (डीप स्क्वेअर लेगला झेल थोडक्यात हुकला)
५.६: चौकार (पुल शॉट मारत अर्धशतक पूर्ण)
भारत: ८६/१ (६ षटके)
टी-२० सामन्याच्या सुरुवातीच्या षटकांमध्ये भारतीय फलंदाजांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. डावातील ५ वे षटक भारतासाठी अत्यंत फायदेशीर ठरले. नामिबियाचा गोलंदाज रुबेन ट्रम्पेलमनच्या एकाच षटकात तिलक वर्मा आणि ईशान किशन यांनी १५ धावा कुटल्या.
या षटकाची सुरुवात ईशान किशनने चौकाराने केली, त्यानंतर तिलक वर्माने दोन चौकार आणि एका दुहेरी धावेसह ट्रम्पेलमनला बॅकफूटवर ढकलले. ५ षटकांच्या अखेरीस भारताची स्थिती ५८/१ अशी भक्कम आहे. सध्या ईशान किशन २२ (१४) आणि तिलक वर्मा १३ (८) धावांवर खेळत आहेत.
४.१: ईशान किशन - चौकार
४.३: तिलक वर्मा - चौकार
४.४: तिलक वर्मा - २ धावा
४.५: तिलक वर्मा - चौकार
एकूण: १५ धावा
नामिबियाविरुद्धच्या सामन्यात भारतीय सलामीवीरांनी सावध पण आश्वासक सुरुवात केली आहे. डावाच्या पहिल्याच षटकात संजू सॅमसनने आपल्या फलंदाजीची चमक दाखवली.
नामिबियाचा वेगवान गोलंदाज रुबेन ट्रम्पलमन याने डावाचे पहिले षटक टाकले. सुरुवातीच्या काही चेंडूंवर नियंत्रण राखल्यानंतर, षटकाच्या शेवटच्या चेंडूवर संजू सॅमसनने गोलंदाजाचा समाचार घेतला. ट्रम्पलमनने टाकलेला 'फुल लेन्थ' चेंडू संजूने थेट साईटस्क्रीनच्या दिशेने भिरकावून देत प्रेक्षणीय षटकार खेचला.
भारत : ८/०
संजू सॅमसन : ६ धावा (४ चेंडू)
ईशान किशन : १ धाव (२ चेंडू)
संजूच्या या षटकारामुळे भारताने पहिल्या षटकात ८ धावा वसूल करत आपली लय पकडली आहे.
संजू सॅमसनला संधी : अभिषेक शर्माच्या अनुपस्थितीत संजू सॅमसन सलामीला ईशान किशनसोबत दिसणार आहे.
गोलंदाजीची ताकद : भारताने वरुण चक्रवर्तीच्या रूपाने 'मिस्ट्री स्पिनर' आणि बुमराह-अर्शदीपच्या जोडीने वेगवान मारा कायम ठेवला आहे.
फिनिशरची भूमिका : रिंकू सिंह आणि हार्दिक पंड्या यांच्यावर डावाच्या शेवटी वेगाने धावा काढण्याची जबाबदारी असेल.
नामिबियाचा कर्णधार गेरहार्ड इरास्मसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामागील प्रमुख कारण म्हणजे 'फ्लॅट' खेळपट्टी आणि रात्री पडणारे दव. दुसऱ्या डावात चेंडू ओला झाल्यामुळे गोलंदाजी करणे कठीण जाते आणि फलंदाजी सोपी होते, याचाच फायदा घेण्याचा नामिबियाचा प्रयत्न असेल.
भारतीय संघ :
संजू सॅमसन (सलामीवीर), ईशान किशन (यष्टिरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंह, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह
नामिबिया संघ :
लॉरें स्टीमकेम्प, जॅन फ्रायलिंक, जॅन निकोल लोफ्टी-ईटन, गेरहार्ड इरास्मस (कर्णधार), जेजे स्मिट, झेन ग्रीन (यष्टिरक्षक), रुबेन ट्रम्पलमन, मलान क्रुगर, बर्नार्ड शोल्ट्झ, बेन शिकोंगो, मॅक्स हेंगो
टी-२० विश्वचषकातील महत्त्वाच्या लढतीपूर्वी भारतीय गोटातून चिंतेची बातमी समोर येत आहे. सलामीवीर अभिषेक शर्माच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्याच्या सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, त्याच्या अनुपस्थितीत संजू सॅमसनला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
अमेरिकेविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात अभिषेकला खातेही उघडता आले नव्हते. प्रकृती ठीक नसल्यामुळे तो क्षेत्ररक्षणासाठीही मैदानात उतरला नव्हता. दिल्लीत दाखल झाल्यानंतर त्याच्या प्रकृतीत अधिक बिघाड झाला आणि त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. बुधवारी त्याला डिस्चार्ज मिळाला असला, तरी गुरुवारी होणाऱ्या सामन्यात तो खेळणार की नाही, याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. अशा परिस्थितीत फॉमशी झगडणाऱ्या संजू सॅमसनसाठी ही मोठी संधी ठरू शकते.
दिल्लीतील सराव सत्रादरम्यान एक थरारक प्रसंग पाहायला मिळाला. इशान किशन नेटमध्ये उत्कृष्ट फलंदाजी करत असताना, जसप्रीत बुमराहचा एक वेगवान 'योर्कर' थेट त्याच्या पायावर आदळला. प्रचंड वेदनांमुळे इशानला सराव मध्येच थांबवून उपचार घ्यावे लागले. खबरदारीचा उपाय म्हणून त्याने सराव लवकर आटोपला असून, संघ व्यवस्थापन त्याच्या फिटनेसवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
नामिबियाचा कर्णधार गेरहार्ड इरास्मस याने सरावाच्या वेळापत्रकावरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. "आम्हाला भारताविरुद्ध रात्रीचा सामना खेळायचा आहे, पण सराव करण्यासाठी एकदाही रात्रीचे सत्र देण्यात आले नाही. भारताला मात्र दोन रात्रीची सत्रे मिळाली आहेत. हे भेदभावपूर्ण असले तरी आम्ही मैदानात पूर्ण ताकदीने लढू," असे इरास्मस म्हणाला.
यापूर्वीच्या सराव सामन्यात भारताच्या 'अ' संघाने नामिबियाला १०० धावांच्या आत रोखले होते. दोन्ही संघांमधील गुणवत्तेचा फरक लक्षात घेता, गुरुवारी होणाऱ्या सामन्यात टीम इंडियाचेच पारडे जड मानले जात आहे. भारताच्या आक्रमक फलंदाजीला रोखणे नामिबियाच्या गोलंदाजांसमोर मोठे आव्हान असेल. दुसरीकडे, बुमराहचे अचूक योर्कर्स, अर्शदीपचा स्विंग, वरुण चक्रवर्तीची 'मिस्ट्री स्पिन' आणि हार्दिक पांड्याची अष्टपैलू कामगिरी नामिबियाची दाणादाण उडवण्यासाठी सज्ज आहे.