

पुढारी ऑनलाईन डेस्क : Arshdeep Singh Performance : इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाची कामगिरी आतापर्यंत उत्कृष्ट राहिली आहे. कोलकाता आणि चेन्नई येथे झालेल्या सामन्यांमध्ये विजय मिळवून सूर्यासेनेने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता राजकोटमध्ये होणारा टी-20 सामना जिंकून मालिका विजयाचा मानस भारतीय संघाचा आहे. हा सामना 28 जानेवारी (मंगळवार) रोजी सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाईल.
इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेत भारतीय संघाच्या फिरकीपटूंनी धुमाकूळ घातला आहे, तर अर्शदीप सिंगने वेगवान गोलंदाजी युनिटमध्येही चमकदार कामगिरी केली आहे. दोन्ही सामन्यांमध्ये अर्शदीपने भारतीय संघाला सुरुवातीचे यश मिळवून दिले, ज्यामुळे उर्वरित गोलंदाजांचे काम सोपे झाले. अर्शदीपने केवळ या मालिकेतच नाही तर मागील अनेक मालिकांमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
जसप्रीत बुमराह भारताकडून टी-20 स्वरूपात क्वचितच खेळताना दिसतो, तर मोहम्मद शमी देखील फिट नसल्याने सामने खेळू शकत नाही. अशा परिस्थितीत, अपेक्षांचा भार पूर्णपणे अर्शदीपवर येतो. अर्शदीपनेही अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. फलंदाजांना फसवण्यासाठी तो स्विंगचा अचूक वापर करतो. कोलकाता येथील टी-20 सामन्यात त्याने बेन डकेटला ज्या पद्धतीने बाद केले ते उत्तम होते.
जर एखाद्या गोलंदाजाकडे चेंडू स्विंग करण्याची क्षमता नसेल तर तो फुल लेन्थ चेंडू टाकण्याचे धाडस करू शकत नाही, परंतु अर्शदीपकडे स्विंगचे कौश्यल्य आहे. सध्या, टी-20 क्रिकेटमध्ये बाउन्सरचा चांगला वापर करणारे गोलंदाज खूप कमी आहेत. अर्शदीप स्लोअर बाउन्सर आणि स्लोअर चेंडू देखील हुशारीने टाकतो.
अर्शदीपला सध्या टी-20 फॉरमॅटमधील सर्वोत्तम डावखुरा वेगवान गोलंदाज म्हणता येईल. तो खूप किफायतशीर असल्याचे सिद्ध होत आहे. उलटपक्षी, मिचेल स्टार्क, शाहीन शाह आफ्रिदी, ट्रेंट बोल्ट यांसारख्या वेगवान गोलंदाजांमध्ये क्रिकेटच्या सर्वात लहान स्वरूपात आता सातत्य दिसून येत नाही. बोल्ट फक्त फ्रँचायझी क्रिकेट खेळत आहे, तर स्टार्क आणि शाहीन हे अनेकदा टी-20 क्रिकेटमध्ये महागडे ठरतात.
अर्शदीप सिंगने नवीन चेंडूने भरपूर विकेट्स घेतल्या आहेत. तर डेथ ओव्हर्समध्ये तो सातत्याने किफायतशीर असल्याचे सिद्ध झाले आहे. अर्शदीपची हाय आर्म ॲक़्शन आणि चेंडू उसळवण्याची क्षमता त्याला एक संपूर्ण पॅकेज बनवते. 2024 मध्ये त्याने स्वत:ला टी20 मध्ये जागतिक दर्जाचा गोलंदाज म्हणून सिद्ध केले.
गेल्या वर्षी, टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अर्शदीपपेक्षा फक्त चार गोलंदाजांनी जास्त विकेट्स घेतल्या. त्यात सौदी अरेबियाचा उस्मान नजीब (38), श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा (38), युएईचा जुनैद सिद्दीकी (40) आणि हाँगकाँगचा एहसान खान (46) यांचा समावेश आहे. त्या सर्वांनी अर्शदीपपेक्षा जास्त सामने खेळले.
अर्शदीप हा टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याने आतापर्यंत 62 टी-20 सामन्यांमध्ये 8.27 च्या इकॉनॉमी रेटने 98 विकेट्स घेतल्या आहेत. अशा परिस्थितीत, तो 2 विकेट घेताच टी-20 मध्ये 100 विकेट पूर्ण करेल. अशी करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरेल.
अर्शदीपची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. उत्कृष्ट कामगिरीचे त्याला एकप्रकारे बक्षिस मिळाले आहे. अर्शदीपला एकदिवसीय क्रिकेटमध्ये फारसा अनुभव नाही, पण जर त्याला संधी मिळाली तर तो केवळ एकदिवसीयच नाही तर कसोटीतही चमक दाखवू शकतो. बऱ्याच काळानंतर भारतीय संघाला डावखुरा वेगवान गोलंदाज मिळाला आहे, ज्याची सातत्यपूर्ण कामगिरी आहे.