

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतने मोठी कामगिरी आपल्या नावावर केली. त्याने वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाच्या चेंडूवर ऑली पोपचा झेल घेत एका विशेष विक्रमाला गवसणी घातली. पोपचा झेल पकडताच तो कसोटी क्रिकेटमध्ये 150 झेल पूर्ण करणारा केवळ तिसरा भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे.
यापूर्वी हा पराक्रम केवळ भारताचे माजी यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी आणि सय्यद किरमाणी यांनी केला आहे. पंतने 44 सामन्यांमध्ये 150 झेलांचा टप्पा पूर्ण केला, तर धोनीने 90 सामन्यांमध्ये 256 झेल घेतले आहेत. सय्यद किरमाणी यांच्या नावावर 88 सामन्यांमध्ये 160 झेल आहेत.
याचबरोबर, लीड्स कसोटीत पंतने आणखी एका विक्रमाची नोंद केली आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी त्याने 3000 धावांचा टप्पा पार केला. तर, दुसऱ्या दिवशी सातवे कसोटी शतक झळकावत, त्याने भारतीय यष्टीरक्षकातर्फे सर्वाधिक कसोटी शतके करण्याच्या बाबतीत महेंद्रसिंग धोनीला मागे टाकले. या यष्टीरक्षक-फलंदाजाने 44 कसोटी सामन्यांच्या 76 डावांमध्ये सुमारे 44 च्या सरासरीने 3000 हून अधिक धावा केल्या आहेत. यामध्ये 7 शतके आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे.
भारताचे माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी यांनी 90 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्यांनी 256 झेल आणि 38 यष्टिचित केले आहेत. धोनीने 144 डावांमध्ये 38.09 च्या सरासरीने 4876 धावा केल्या असून, त्यात 6 शतके आणि 33 अर्धशतकांचा समावेश आहे. तर, सय्यद किरमाणी यांनी 88 कसोटी सामन्यांमध्ये 160 झेल आणि 38 यष्टिचित केले आहेत. किरमाणी यांनी कसोटी सामन्यांमध्ये 2 शतकांसह एकूण 2759 धावा केल्या आहेत.