

नवी दिल्ली: भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिलने इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी उपहारापूर्वी (लंच ब्रेक) केवळ १५ धावा करताच त्याने महान फलंदाज सुनील गावसकर यांचा ४७ वर्षे जुना विक्रम मोडीत काढला. या कामगिरीसह, गिल आता एका कसोटी मालिकेत कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या या संपूर्ण मालिकेत गिलच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला आहे. ओव्हल कसोटीच्या पहिल्या डावात आपल्या नाबाद १५ धावांच्या खेळीदरम्यान त्याने हा इतिहास रचला. गिल केवळ एका कसोटी मालिकेत कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा फलंदाजच नाही, तर इंग्लंडच्या भूमीवर एका मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीतही त्याने आपले स्थान निर्माण केले आहे.
यापूर्वी, एका कसोटी मालिकेत भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सुनील गावसकर यांच्या नावावर होता. त्यांनी १९७८-७९ साली वेस्ट इंडिज दौऱ्यावर ७३२ धावांची अभूतपूर्व खेळी केली होती. गावसकर यांचा हा विक्रम गेल्या ४७ वर्षांपासून अबाधित होता, जो आता शुभमन गिलने आपल्या नावे केला आहे.
इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत, हे वृत्त लिहीपर्यंत, शुभमन गिलने एकूण ७३३ धावा केल्या आहेत. यामुळे तो आता भारतीय कर्णधारांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. या यादीत सुनील गावसकर दुसऱ्या स्थानी घसरले आहेत, तर तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर विराट कोहलीचे वर्चस्व आहे.
७३३ धावा – शुभमन गिल विरुद्ध इंग्लंड, २०२५
७३२ धावा – सुनील गावस्कर विरुद्ध वेस्ट इंडिज, १९७८/७९
६५५ धावा – विराट कोहली विरुद्ध इंग्लंड, २०१६/१७
६१० धावा – विराट कोहली विरुद्ध श्रीलंका, २०१७/१८
५९३ धावा – विराट कोहली विरुद्ध इंग्लंड, २०१८
टॉस गमावल्यानंतर भारतीय संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. संघाची धावसंख्या 38 असताना केएल राहुलच्या रूपात दुसरा गडी बाद झाला. कर्णधार गिल फलंदाजीसाठी आला. आपल्या डावातील सहाव्या चेंडूवर पहिली धाव घेत खाते उघडताच, या मालिकेतील त्याच्या एकूण धावांची संख्या 723 झाली.
याबरोबरच, ‘सेना’ (SENA) देशांमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) कर्णधार म्हणून एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून गिलने आपले नाव कोरले. यापूर्वी हा विक्रम वेस्ट इंडिजचे महान खेळाडू सर गॅरी सोबर्स यांच्या नावावर होता. सोबर्स यांनी 1966 साली इंग्लंड दौऱ्यावर कर्णधार म्हणून खेळताना एका मालिकेत 722 धावा केल्या होत्या.
गिलच्या या सातत्यपूर्ण आणि विक्रमी कामगिरीमुळे केवळ एक फलंदाज म्हणून त्याचे संघातील स्थान अधिक भक्कम झाले नाही, तर त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी क्रिकेटच्या एका नव्या आश्वासक पर्वाची ही नांदी मानली जात आहे.